

Eye health in old age
esakal
जे गमावलं ते गेलं, पण आता उरलेल्या दृष्टीचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा आणि डोळ्यांना ताण येऊ न देता ती दृष्टी कशी राखायची ते महत्त्वाचं. शक्यतो स्वावलंबी राहता येईल असा प्रयत्न असावा. उत्साह वाटेल अशा अर्थपूर्ण उपक्रमांमध्ये सहभाग वाढवावा, त्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतील. घरात एक माणूस अपंग असेल, तर कुटुंबातील सर्वांनाच मनासिक तयारी करून आणि संवेदनशीलता वाढवून नवं प्रशिक्षण घ्यावं लागतं.
‘चला राहू आनंदात’ हेच आनंदी उत्तरायुष्याचं ध्येय आहे. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जितका निकोप आणि नितळ, तेवढा आनंद अधिक. आज या निकोप दृष्टीकडे आपण वेगळ्या दृष्टीने पाहणार आहोत. स्वच्छ दिसायला मदत करणाऱ्या आपल्या डोळ्यांकडे ही दृष्टी वळवायची आहे. आपले डोळे हे आपल्या शरीरातलं किती महत्त्वाचं इंद्रिय आहे हे नव्यानं सांगायला नको.
आपल्याला सगळ्यात आधी धोक्याची जाणीव करून देणारं आणि अन्य कोणत्याही इंद्रियापेक्षा जलद गतीनं माहिती देणारं हे इंद्रिय. आपलं ८० ते ९० टक्के शिक्षण डोळ्यामुळे होतं. दृष्टी अधू असणं याची एक व्याख्या आहे. चष्मे, कॉन्टॅक्ट लेन्सेस, शस्त्रक्रियेद्वारे दुरुस्त न होणारा दृष्टिदोष म्हणजे अधू दृष्टी. असं पंगुत्व असणं याचा एक वर्णपट आहे. कमी दिसू लागणं इथपासून काहीही न दिसणं म्हणजे जवळजवळ आंधळेपणा. या वर्णपटावर कुठंही असलो, तरी या पंगुत्वामुळं आपल्या दैनंदिन करायच्या गोष्टींमध्ये अडथळा येतो. वृद्धांचं दृष्टिपंगुत्व हा आता चिंतेचा विषय होऊ लागला आहे. अमेरिकेत दृष्टिहीन झालेल्या वृद्धांची संख्या वेगाने वाढत आहे. २०३०पर्यंत ती आत्ताच्या दुप्पट होईल असं अनुमान आहे. सत्तरीनंतर दृष्टी अधू झालेले जवळजवळ ८० टक्के लोक आढळून येतात. भारतात उन्हाचा तडाखा, डोळ्यांचे चष्मे न परवडणं किंवा न घालणं, अज्ञान, अस्वछता अशा अनेक कारणांमुळे हा प्रश्न जास्त गंभीर होत आहे. या वयानंतर डोळ्यांचे मुख्य चार प्रकारचे आजार उद्भवतात आणि त्यामुळं दिसण्याचे प्रश्न वाढतात.