

Gharapuri Caves
esakal
अमोघ वैद्य
इतिहास, श्रद्धा आणि सत्तेचे अनेक थर अंगी बाळगून एलिफंटाचा लेणीसमूह आजही उभा आहे, मौनातून आपली कथा सांगत! काळ, आक्रमणं आणि विस्मरण यांच्या पलीकडे जाऊन दगडात कोरलेली
ही कला आपल्याला थांबवते, पाहायला भाग पाडते आणि आठवण करून देते, की मानवी सर्जनशीलतेनं घडवलेली स्मृती काळालाही तोंड देऊ शकते.
इतिहासातली काही स्थळं अशी असतात, की त्यांच्याविषयी कितीही लिहिलं, तरी पुरेसं नसतं. प्रत्येक काळात पाहणाऱ्याला ती नव्यानं काहीतरी सांगतात. काळाच्या ओघात अनेक अभ्यासक, प्रवासी, संशोधक आणि इतिहासप्रेमी या स्थळांकडे वळले; त्यांनी पाहिले, लिहिले, अर्थ लावले. तरीही त्या दगडांत कोरलेल्या रचना आजही अनेक प्रश्न विचारत उभ्या आहेत. ही स्थळं केवळ स्थापत्यकलेचे नमुने नसतात, तर त्या काळातील श्रद्धा, सत्ता, समाज आणि विचारविश्व यांचे मौन साक्षीदार असतात.