

Anglo-American Historical Relations
esakal
क्रॉमवेलच्या नंतर क्वेकरांनी पुन्हा एकदा राजकीय व्यवहारांपासून अलिप्त राहून तटस्थाचे धोरण स्वीकारले. १६७५नंतर वातावरण थोडेसे निवळले. शिवाय क्वेकरांना अमेरिकेत जाऊन वसाहती करायचा नवा मार्गही आता उपलब्ध झाला होता, जो नेमका पेनने चोखाळला. या काळात खुद्द इंग्लंडमधील क्वेकरपंथीय राजकारणाला पुरतेपणे उबगलेले दिसून येतात.
अमेरिकेचा इतिहास इंग्लंडच्या इतिहासाशी इतक्या अतूटपणाने जोडला गेला आहे, की इंग्लंडच्या इतिहासाला अमेरिकेची ‘Prehistory’ (पूर्वेतिहास) म्हणायला हरकत नसावी. महाभारतात कृष्णाने वापरलेल्या शब्दाचा उपयोग करून सांगायचे झाल्यास (अमेरिकेचे इंग्लंडशी सशस्त्र संघर्ष करून स्वतंत्र होणे गृहीत धरूनही) इंग्लंड म्हणजे अमेरिकेचा स्वाभाविक मित्र (जसे यादव आणि पांडव). अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर आलेल्या कटुतेची तीव्रता कमी झाल्यानंतरच्या काळात निदान एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपासून तरी अनेकांनी इंग्लंड आणि अमेरिका यांनी परस्पर सहकार्य करावे अशा मर्यादित भूमिकेपासून ‘अँग्लोअमेरिकन’ संघराज्य निर्माण करावे अशा व्यापक भूमिकेची मांडणी केल्याचे दिसून येते. ही मांडणी व त्यानुसारची कृती चर्चिलने टोकाला नेण्याचा प्रयत्न केला असल्याचे आपण जाणतो. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर इतिहासाचे फासे असे काही पडले, की अमेरिकेला इंग्लंडचीच काय, परंतु युरोप खंडातील अन्य राष्ट्रांचीही काळजी घ्यावी लागली; जी राष्ट्रे तसे पाहिले तर वांशिक व सांस्कृतिकदृष्ट्या इंग्लंडशी जवळची नव्हती! अर्थात, तरीही इतिहासाच्या पुढील टप्प्यावर म्हणजेच इंग्लंडसह इतर युरोपीय राष्ट्रे युद्धामुळे झालेल्या हानी-नुकसानीच्या सावटातून बाहेर पडल्यावर एकत्र येत युरोपियन युनियन - म्हणजे युरोपीय राष्ट्रांचा महासंघ स्थापन करती झाली. विशेष म्हणजे इतिहासाच्या त्यापुढील टप्प्यावर इंग्लंड या युनियनशी फारकत घेऊन बाहेर पडला. ‘ब्रेक्झिट’ या नावाने गाजलेल्या या प्रक्रियेनंतर इंग्लंड आणि अमेरिका यांची स्वाभाविक जवळीक जेवढी वाढायला हवी होती तेवढी वाढली असे म्हणता येत नसले, तरी इतर युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत इंग्लंडने अनेक राजकीय पेचप्रसंगांत अमेरिकेची पाठराखण केली असल्याचे दिसून येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सध्याच्या म्हणजे दुसऱ्या कारकिर्दीत मात्र हे प्रमाण कमी झालेले आहे. त्याला कारण अर्थात ट्रम्पच्या राजकारणाची विशिष्ट शैली.