कॉन्स्पिरसी फाइल्स ।रवि आमले
वडाची झाड पिंपळाला लावून अशी काही मांडणी करायची, की सामान्यांना त्याचा अर्थ न कळाल्याने ते काहीतरी भारी आहे असे वाटावे. षड्यंत्र सिद्धांतांच्या रचनेत सर्रास आढळणारा हा प्रकार. यातून आजही हिटलरविषयीच्या कटकाल्पनिका जिवंत आहेत.
अंदाज अपना अपना या छानशा विनोदीपटात क्राइममास्टर गोगोला अमर म्हणतो, ‘तुम्ही ज्ञानी आहात. अंतर्यामी आहात. खूप मोठे स्वामी, शक्तिमान, बुद्धिमान आहात. मी तर असे म्हणतो, की तुम्ही पुरुषच नाही.’ गोगो चमकतो. मग अमर म्हणतो, ‘तुम्ही महापुरुष आहात.’ गोगो ते ऐकून खूश होतो. त्याला कळतच नाही, की अमरने आपली खिल्ली उडवलेली आहे. पण सगळेच ‘अमर’ असे हुशार नसतात.
काही श्रद्धाळूही असतात. त्यांची आपल्या नेत्याबद्दल मनापासून अशीच भावना असते. त्यांची अशी श्रद्धा असते, की आपला नेता - मग तो राजकीय असो वा धार्मिक - हा साधा नाही. तो असामान्य आहे. जगाच्या, राष्ट्राच्या, धर्माच्या, वंशाच्या वगैरे उद्धारासाठी त्याचा जन्म झालेला आहे. त्याच्यात दैवी गुण आहेत. अशा लोकांना भक्त म्हटले जाते. त्यांची श्रद्धा अमर असते.