
मयुरी सुधाकर कुलकर्णी
एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचल्यावर माझ्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. इतका आनंद झाला होता, की डोळ्यातून वाहणारे पाणी थांबेचना. पण भावना आवराव्या लागल्या, कारण तिथे असलेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास घेताना ताण येऊ लागला होता. पण त्यावेळी झालेला आनंद अवर्णनीय होता!
प्रत्येक ट्रेकरचे एव्हरेस्ट बेस कॅम्पला (ईबीसी) जाण्याचे स्वप्न असते. माझे हे स्वप्न यावर्षी पूर्ण झाले. २२ एप्रिल ते ८ मे २०२४ यादरम्यान हा योग जुळून आला. काळजीपूर्वक तयारी आणि नियोजन केले.
मी आधी ज्या ट्रेकिंग कंपनीसोबत बरेच ट्रेक्स केले होते, त्यांच्याचसोबत एव्हरेस्ट बेस कॅम्प हा ट्रेकही करण्याचे ठरवले. आम्ही सहा महिने आधीपासूनच तयारीला सुरुवात केली. दररोज योगासने, चालणे सुरू होते. त्यासोबतच आठवड्यातून एकदा सिंहगड चढणे-उतरणेही चालूच होते. प्लस व्हॅली, कलावंतीण दुर्ग, हरिश्चंद्रगड असे काही ट्रेक्सही चालू होते. अखेर ‘तो’ दिवस आला!