डॉ. शिशीर जोशी
मानवाच्या कल्पकतेने चाकाला गती दिली आणि तीच गती स्पोर्ट्स कारच्या थरारक वेगापर्यंत पोहोचली. पहिली मोटारगाडी, युद्धातील जीप, फॉर्म्युला वन रेसिंग आणि ऑफ-रोडिंगच्या साहसातून वाहन उद्योगाने तंत्रज्ञान, वेग व रोमांच यांचा अद्भुत
प्रवास घडवला.
मानवाच्या प्रगतीचा इतिहास हा शोध, प्रयोग आणि सतत सुधारणा यांचा अनोखा संगम आहे. यात सर्वांत महत्त्वाचा शोध म्हणजे चाकाचा. कारण त्याने वाहतुकीच्या क्षेत्रात क्रांती घडवली. सुरुवातीला माणूस आणि मालवाहतुकीसाठी प्राण्यांचा उपयोग केला जात होता. घोडागाडी, बैलगाडी, उंटगाडी यांनी प्रवास प्रचलित होता. पण यामुळे गती मर्यादित होती आणि प्रवासाला वेळ जास्त लागत असे.
चाकाच्या वापरातून रथ आणि पुढे गाड्या तयार झाल्या. मात्र युरोपात औद्योगिक क्रांती झाल्यानंतर मानवी बुद्धिमत्तेने आणखी एक मोठा टप्पा पार केला. यंत्राद्वारे चालणाऱ्या वाहनांचा शोध. जर्मनीतील कार्ल बेंझ यांनी १८८५मध्ये पहिली मोटारगाडी तयार केली. पेट्रोलवर चालणारी ही गाडी सुरुवातीला फक्त प्रयोगापुरतीच होती. तिचा वेग अत्यंत कमी होता. परंतु ती यंत्रनिर्मितीच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा ठरली. कारण यानंतर वाहन उद्योगाने कधीही मागे वळून पाहिले नाही.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४०मध्ये जीपचे आगमन झाले. युद्धभूमीवरील कठीण मार्ग, खडकाळ रस्ते, चिखलमय प्रदेश आणि डोंगराळ भाग ओलांडण्यासाठी मजबूत, विश्वासार्ह आणि सहज दुरुस्त करता येईल असे वाहन आवश्यक होते. ह्याच गरजेतून जीपची निर्मिती झाली. जीपने आपल्या साधेपणा, टिकाऊपणा आणि दणकटपणामुळे लष्करी तसेच नागरी वापरासाठी नवे दालन उघडले.
सन १९४०मधील जीपच्या आगमनानंतर वाहन उद्योगाने झेप घेतली. त्यानंतर केवळ प्रवासाच्या साधनापुरता मर्यादित न राहता; साहस, वेग, स्पर्धा आणि आलिशान जीवनशैलीचे प्रतीक म्हणूनही वाहनांचा उपयोग होऊ लागला.