Raigad Fort : बघाच एकदा रायगड, वेड लागेल त्याचे!

आजपर्यंत किल्ले रायगडावर चार वेळा गेलो. मनाने मी अजूनही तिथेच असतो...
chhatrapati Shivaji Maharaj
chhatrapati Shivaji Maharaj esakal

मिलिंद धनावडे

राजदरबारात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि मग धुक्यात हरवलेल्या वाटेवरून, गुलाबी थंडीला कवेत घेऊन आणि हळूहळू एकएक वळण पाठी पडणाऱ्या रायगडला कडकडून मिठी मारून आम्ही घरची वाट पकडली.

आजपर्यंत किल्ले रायगडावर चार वेळा गेलो. मनाने मी अजूनही तिथेच असतो. तुम्ही पण जा, बघाच एकदा रायगड, वेड लागेल त्याचे!

हा  एक लक्षात राहणारा रायगड ट्रेक होता... हो-नाही करता करता मी, अमित (जो नेहमीप्रमाणे ह्या ट्रेकला पण आपटला), बळीराम, भिवाजी, दीपक, किरण, निलेश, प्रसाद गावडे, प्रसाद कदम, राकेश, शशिकांत, सुरेंद्र असे तब्बल बाराजण तयार झाले... आपल्या माहेरी यायला.

तेव्हा आम्ही सडेफटिंग होतो. कोणावरही कसलीच जबाबदारी नव्हती. बारापैकी फक्त दोघांचीच लग्नं झाली होती आणि बाकी दहाजणांची कोणी गर्लफ्रेंड वगैरे नव्हती, त्यामुळे कुठे आहेस? काय करतो आहेस? फोन का नाही उचलत? ह्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आई-वडिलांशिवाय कोणालाही बांधील नव्हतो.

डिसेंबर २००९मधल्या एका शनिवारची तारीख ठरली. सर्व बाराजण आदल्या रात्री बारा वाजता म्हणजे शुक्रवारी महाडला (रायगड) जाणारी एसटी पकडणार होते आणि ह्यावेळेला मात्र सर्वजण खरेच आले होते.

बुकिंग आधीच केले असल्यामुळे बसायला नीट जागा मिळाली. आधी एसटीत बसल्यावर सर्वांची ओळख परेड झाली. डिसेंबर महिना असल्यामुळे थोडी थोडी थंडी जाणवत होती. जसे पनवेल पार केले, तसे मी आणि भिवाजी सोडून सर्व झोपी गेले.

आम्हाला खर्चाचा ताळमेळ बसवायचा होता म्हणून आम्ही जागे होतो. नंतर काही वेळाने एसटीने दहा मिनिटांचा हॉल्ट घेतला.

मी, प्रसाद आणि भिवाजी प्रथम महाड एसटी स्टँडला जाऊन आलेलो असल्यामुळे तिथे पोट खाली करण्याची काय व्यवस्था आहे ते आम्हाला माहिती होते आणि तशा सूचना आम्ही सर्वांना दिल्या होत्या.

पण त्या बाकी नऊजणांनी मनावर घेतल्या नाहीत. त्या दहा मिनिटांत दोन दिवस उपाशी असल्यासारखे खा खा खाल्ले आणि नंतर एसटी निघाली.

हळूहळू आता एसटीने जोर पकडला होता आणि तेव्हाचे रस्ते एकसारखे आम्हाला जाणीव करून देत होते... शरीरात एकूण २०६ हाडे असतात.

मजल दरमजल करत एसटी महाड स्टँडवर तीन वाजता पोहोचली. एसटीचे कर्मचारी वगळता तेव्हा तिथे आम्ही बाराजण आणि तीन कुत्री असे फक्त पंधराजण होतो.

एसटी थांबल्या थांबल्या आमच्यामधले काहीजण बॅग खाली टाकून जिथे पोट रिकामे करण्याची व्यवस्था होती तिथे धावत सुटले.

मगाशी न ऐकण्याचा परिणाम... आणि हाडांची कळ आपसूक सर्वांच्या पोटापाशी पोहोचली होती. सगळ्यांचे आटपेपर्यंत निवांत थांबलो. आम्हाला घाई नव्हतीच. साडेचारची रायगड पायथा एसटी होती.

पण नंतर कळले ती एसटी रद्द झाली होती.. झाला ना लोचा! आता काय करायचे अशा विचारात असताना आमच्या सर्वांच्या नशिबाने सव्वाचारला एक एसटी आली. चौकशी केल्यावर कळले की ती पाचाड गावी जाणारी एसटी आहे.

नंतर रायगड पायथा एसटी होती सकाळी आठ वाजता. मग सर्वानुमते पाचाड गावच्या एसटीत जाऊन बसलो. एसटी निघायला अजून थोडा वेळ होता.

मग काय, आमच्या गप्पा रंगल्या... विषय राजे आणि रायगड...! अहो विचार करा, पहाटे चार वाजता मुंबईपासून दूरच्या एका गावी गावी आम्ही थंडीत कुडकुडत एसटीत गप्पा रंगवत होतो.

एसटी निघाली. पुन्हा तेच, मी आणि भिवाजी सोडून सर्व झोपी गेले. काय करणार, आम्ही ट्रेक लीडर ना. फक्त बाराजणच एसटीत होतो.

रिकाम्या सिटांवर बाकी सर्व ताणून झोपले आणि थोड्या वेळाने एसटीने कचकचून ब्रेक लावला तेव्हा सीटवर आडवे झोपी गेलेले सर्व धाडकन खाली आपटले.

त्यात आमच्यापैकी एकजण ‘चोर चोर’ असेही ओरडला. एसटीने साधारण अर्ध्या तासातच आम्हाला पाचाडला सोडले. तिथून तुम्हाला रायगडला जाण्याऱ्या गाड्या मिळतील, असे कंडक्टरने आम्हाला सांगितले होते.

पण उतरल्यावर फक्त दोन बैल उभे होते. त्यांनी आमच्याकडे अगदी तुच्छतेने पाहिले आणि परत चरायला लागले. आता पुढे...? पण आमच्या नशिबात काहीतरी वेगळेच होते. अगदी समोरच राजमाता जिजाऊ यांची समाधी होती.

पण बंद होती. तिथला असणारा राजमाता जिजाऊंचा पंचधातूंचा पुतळा चोरीला गेला होता, असे समजले. आम्ही तिथली देखरेख करणाऱ्याच्या जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटे हातापाया पडलो तेव्हा आम्हाला आत प्रवेश मिळाला.

समाधीचे दर्शन घेऊन निघालो. तरीही एसटीचा पत्ता नव्हता. मग काय पाचाड ते रायगड अशी जवळजवळ एक ते दीड तास आम्ही मस्त रपेट केली. आसपासचे गाव मिट्ट काळोखात आणि गुलाबी थंडीच्या कुशीत मस्त झोपले होते.

सकाळचे पाच-सव्वापाच वाजले असतील... रस्त्यावर मिट्ट काळोख आणि सोबतीला वेडे मित्र! काय क्षण होते ते... कधीच विसरता न येण्यासारखे!

चालून चालून खूप दमलो होतो आणि गावाकडच्या निरोगी हवेत रपेट केल्याने मस्त भूकही लागली होती. पण करणार काय.

आता हळूहळू उजाडत होते आणि एका डोंगरामागून रायगडाच्या टकमक टोकाने दर्शन दिले. आम्ही धावतच सुटलो रायगडाकडे. रायगड पायथ्याशी असणाऱ्या हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि गड चढायला सुरुवात केली.

साधारण नऊ-साडेनऊला आम्ही वर पोहोचलो. मनात विचार येत होते, ‘त्या पुरुषोत्तमाच्या पायरवाने इथली राने, ही जमीन अनेकदा मोहरली असेल, त्याचे श्वास इथल्या वातावरणात आहेत अजून.’ तिथली राने, वळणदार रस्ते पाठी टाकत, थोडा आराम करत जवळजवळ दोन तासांनी आम्ही महादरवाजाजवळ पोहोचलो.

आम्ही त्या दरवाजाच्या पायरीवर डोके टेकले... अहो अनेक शूरवीरांचे पाय लागले आहेत तिथे.

धर्मशाळेत बॅगा टाकल्या आणि मग प्रथम शिरकाई देवीचे दर्शन घेतले. तिथून पुढे हत्तीतलाव, गंगासागर तलाव, राणीवसा, राजदरबार, जगदिश्वर मंदिर, टकमक टोक असे पाहत आम्ही दोन-तीन तास रायगडावर खूप भटकलो. आता दुपार झाली होती.

मग बाजारपेठेच्या पाठी असणाऱ्या झोपडीत गरम गरम पिठले, भाकरी आणि लसणीची चटणी अक्षरशः हादडली. कुठल्याही पंचतारांकित हॉटलाच्या तोंडात मारेल अशी ती चव होती.

ती चव अजूनही जिभेवर आहे. वाढता वाढता आजी सांगत होत्या, ‘आम्ही धनगर. आमच्या दहा पिढ्या येथे वाढल्या. आमच्या बापजाद्यांनी हा गड जागता ठेवला.’ बोलताना डोळे चमकत होते त्यांचे.

chhatrapati Shivaji Maharaj
Raigad News : इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात; वृध्द इसम निम्स बादल यांची हत्या करून त्याची गाडी व दागिने घेवुन फरार

जेवण झाल्यावर आम्ही धर्मशाळेत ताणून दिली. संध्याकाळीच उठलो. नंतर असेच विजयस्तंभच्या इमारतीत जाऊन बसलो. रात्री राजांची गाणी गात गात झोपून गेलो. रात्री तीनच्या सुमारास एकाएकी आरडाओरडा ऐकू आला.

सर्व खडबडून जागे झालो. एक ग्रुप आला होता, त्यांच्यापैकी एकाच्या अंगावरून साप गेला होता. तो बाकी कोणाला दिसला नाही, पण नंतर शोधाशोध केल्यावर एक मेलेले झुरळ मात्र सापडले. सकाळी पाच वाजता सर्वजण उठलो.

आता अंघोळ करावी म्हणून एकाने टाक्यातल्या पाण्यात हात घालून पहिला. पाणी थंडगार! ते पाणी अंगावर घ्यायची कोणाची हिंमत झाली नाही.

मग सर्वानुमते दात तरी घासू असे ठरले. प्रसादने बळीरामकडे दात घासायला पेस्ट मागितली. बळीरामने त्याला झोपेतच ती काढून दिली, आणि नंतर एकदम तो प्रसादच्या मागे धावला आणि ओरडू लागला, ‘प्रसाद, प्रसाद, थांब!’ त्याने चुकून प्रसादला क्रॅक क्रीम दिले होते.

थोड्यावेळाने आम्ही आमचे चंबूगबाळे आवरले. निघण्याआधी राजदरबारात जाऊन छत्रपती शिवरायांना मुजरा केला आणि मग धुक्यात हरवलेल्या वाटेवरून, गुलाबी थंडीला कवेत घेऊन आणि हळूहळू एकएक वळण पाठी पडणाऱ्या रायगडला कडकडून मिठी मारून आम्ही घरची वाट पकडली. परतल्यावर एवढे दमलो होतो की पडल्या पडल्या अंथरुणात विरघळून गेलो.

आजपर्यंत किल्ले रायगडावर चार वेळा गेलो. मनाने मी अजूनही तिथेच असतो. तुम्ही पण जा, बघाच एकदा रायगड, वेड लागेल त्याचे!

कसे जाल : सर्वप्रथम महाड गाठावे. तिथून पाचाड किंवा रायगड पायथ्याला एसटी आहेत. किंवा आता रोपवेसारखे आणखीही पर्याय उपलब्ध झाले आहेत. स्वतःची चारचाकी असेल, तर अतिउत्तम. गाडी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी नेता येते.

काय खाल : गडावर मुबलक प्रमाणात पाणी आहे. ताक, लिंबू सरबत घेऊन बसलेले खूपजण गड चढताचढता भेटतील. गडावर हॉटेल आहे आणि बाजारपेठेच्या पाठी असणाऱ्या झोपडीत जेवणाची व्यवस्था होते.

काय पाहाल : अहो सर्व गड पाहण्यासारखा आहे.

कुठे राहालः मुक्कामाला आता परवानगी नाही. मुक्काम करायचा असेल तर फक्त रोपवेच्या खोल्यांमध्येच करता येतो.

-----------------

chhatrapati Shivaji Maharaj
Raigad Festival: ‘हॅपिनेस इंडेक्‍स’ वाढवण्यासाठी कोट्यवधी खर्च पण प्रेक्षकांची पाठ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com