विश्राम ढोले
नवं तंत्रज्ञान आलं की दोन प्रश्न ठरलेले असतात - ते कोणाला कालबाह्य ठरवेल आणि त्याच्याशी जुळवून कसं घ्यायचं? इतिहास पाहिला तर हे प्रश्न सतत पडत आलेत. सुरुवातीला धक्का बसतो, फरफट होते, नंतर आपल्याला सवय होते आणि शेवटी तेच तंत्रज्ञान रूटीन होतं. या प्रवासात अनुभवातूनच उत्तरं सापडत जातात...
कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) तंत्रज्ञान नुसतेच नवे नाही. त्याचे स्वरूप आणि उपयोजन अवाढव्य आणि अनेक पातळ्यांवर आव्हानात्मक आहे. इथे त्या सगळ्यांच्या तपशिलात जाता येणार नाही. पण माध्यमांच्या क्षेत्रापुरते मर्यादित राहून हे प्रश्न विचारता येतात.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माध्यमांच्या क्षेत्रातले काय आणि कोण कालबाह्य ठरेल याचे उत्तर शोधण्यासाठी मुळात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात नेमके काय आणू शकते, याचा शोध घ्यायला हवा.
भाकित करणारी कृत्रिम बुद्धिमत्ता : प्रचंड विदेतून (डेटा) शिकून भविष्यातील परिस्थितीचे भाकीत करणे. म्हणजे भाकीत करणारी (प्रेडिक्टिव्ह).
प्रसवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता : डेटातील वृत्ती-प्रवृत्ती (पॅटर्न) शोधून सांगितलेला नवीन आशय निर्माण करणे. म्हणजे प्रसवणारी (जनरेटिव्ह).