मैत्रीचा पाऊस..

पावसाळा हा ऋतू नाही, ती एक भावना आहे.
rain
rainsakal

पावसाळा हा ऋतू नाही, ती एक भावना आहे. हा पाऊस जसं शेतकऱ्याचं पीक पिकवण्याची किमया साधतो, तसं मानवी मन प्रगल्भ करण्याची जादूदेखील त्याला जमते. म्हणूनच कदाचित आपला अनुभव समोरच्याहून जास्त आहे हे....

-सुजित काळे

पावसाळा हा ऋतू नाही, ती एक भावना आहे. हा पाऊस जसं शेतकऱ्याचं पीक पिकवण्याची किमया साधतो, तसं मानवी मन प्रगल्भ करण्याची जादूदेखील त्याला जमते. म्हणूनच कदाचित आपला अनुभव समोरच्याहून जास्त आहे हे

rain
Kolhapur Rain : 22 तासांत पंचगंगेची तब्बल 'इतकी' पाणी पातळी झाली कमी; कोल्हापुरातील 14 धरणांत काय आहे स्थिती?

‘मी तुझ्याहून चार पावसाळे जास्त पाहिलेत’ असं म्हणत असावेत..पाऊस आला की जसा मातीला अंकुर फुटतो तसे लेखणीलाही शब्द फुटू लागतात. मला वाटतं प्रत्येकाच्या पावसाशी निगडित अनंत आठवणी असतील. अगदी शाळेपासूनच्या. आता माझंच बघा ना; कोकणात असताना शाळेतून घरी येताना भाताची शेतं लागत असत.

एक दिवस खूप पाऊस पडला आणि भाताची शेतं पाण्यानं गच्च भरली. मी, माझी बहीण आणि तिची एक मैत्रीण आम्ही एका शेतापाशी आलो. दीदीच्या मैत्रिणीनं त्यात उडी मारली आणि खूप जोर लावून चिखलात रुतलेला पाय वर उचलला. मला ते पाहून मजा वाटली.

मीसुद्धा तो खेळ सुरू केला. पण एका उडीनंतर फक्त माझा पायच वर आला, पायातली चप्पल चिखलात हरवली. आम्ही तसेच घरी गेलो.

बाबांनी दार उघडलं आणि चप्पल कुठे आणि कशी हरवली ऐकल्यावर ‘चप्पल सापडल्याशिवाय घरी यायचं नाही’ असं म्हणाले. आम्ही तिघं परत त्या शेतापाशी गेलो, तासभर शोधाशोध केल्यावर चप्पल सापडली. शाळेत पहिल्या नंबरचं बक्षीस मिळाल्यावर झाला नसता एवढा आनंद आम्हा तिघांना झाला.

बाकी पावसाळ्यात शाळेत जायची वेगळीच मजा असायची. एकतर नवा रेनकोट नाहीतर नवी छत्री मिळायची. पण रंगीत छत्र्यांपेक्षा मला नाव घातलेली आजोबांच्या दांडीसारखी दांडी असलेली काळी छत्रीच आवडत असे. मधल्या सुट्टीत आम्ही चार-पाच छत्र्या शेजारी शेजारी लावून भूगोलातल्या पुस्तकात टुंड्रा प्रदेशात असतं तसं ‘इग्लू’ तयार करून त्याखाली डबा खायला बसायचो.

पावसाळ्यात जिभेचेही भरपूर लाड होतात. असं म्हणतात, की या मोसमात हलकं अन्न खाल्लं पाहिजे. पण जरा कुठे ढग गडगडले की घराघरातून भजी सोडा अशा फर्माइशी व्हायला लागतात. भज्यांबरोबर वाफाळता चहा किंवा कॉफी. पण माझी आठवण मात्र भुईमुगाशी जोडलेली.

माझे बाबा कितीही पाऊस असला तरी दर रविवारी मंडईत जाऊन भाजी आणायचे. मग संध्याकाळी त्यांनी आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा भाजून खाणे हा ठरलेला कार्यक्रम असे. मला भाजलेल्या शेंगांपेक्षा कोवळे दाणे कच्चे खायला जास्त आवडतं.

पहिल्या पावसानंतर मृद्‍गंधावर अनेक कविता झाल्या असतील, पण भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगांचा सुवास उदबत्तीलाही लाजवेल आणि शेंगेला चिकटलेली माती नारळ खडीसाखरेच्या प्रसादाहून चवदार!

रविवारची मंडई करून बाबा नोकरीच्या गावी निघून जायचे. मग आठवडाभर मी, दीदी आणि आई असे तिघेच घरी असायचो. अशा वेळी शाळेला जायच्यावेळी पाऊस आला की आई ‘उगीच पावसात भिजून आजारी पडायला नको’ असं म्हणत आम्हाला घरीच ठेवून घ्यायची. मग आई आमची आवडती बटाट्याची रस्सा भाजी करायची.

rain
Sangali : सांगलीच्‍या विकासासाठी ९४ कोटी,आमदार सुधीर गाडगीळ यांनी घेतली फडणविसांची भेट

मसाला भाजताना रेडिओवर गाणी ऐकायची. तेव्हा कळायचं नाही आई इतकी आनंदी का असायची; नंतर कळलं, आम्ही शाळेत गेलो की ती घरी एकटी कंटाळायची. पावसाचं निमित्त करून ती आम्हाला घरी थांबवायची आणि मग आम्ही दिवसभर खूप धमाल करायचो.

पावसातली खरी धमाल म्हणजे पावसातली भ्रमंती. कोकणात आमच्या घरासमोर एक तळ होतं. त्या तळ्याच्या बाजूनं एक पायवाट मल्लिकार्जुनच्या टेकडीवर जायची. पावसाळ्यात या टेकडीवरून दूरपर्यंत हिरवी भातशेतं आणि त्यातून लांबलचक साप गेल्यासारखा कोकण रेल्वेचा रूळ दिसायचा.

माझी आणि रेल्वेची हीच पहिली ओळख. केव्हा केव्हा एखादी रेल्वेपण जाताना दिसायची. दुसरी-तिसरीत असताना पाहिलेल्या कोकण रेल्वेत बसण्याचा योग जवळजवळ वीस वर्षांनी आला. तोही पावसाळ्यातच.

माझ्या पहिल्या नोकरीसाठी मला केरळला जायचं होतं. पनवेलवरून नेत्रावती एक्सप्रेसनं निघालो. सुरुवातीला खिडकीतून पाऊस पाहायला मजा आली, पण नंतर रेल्वेच्या संथ प्रवासाचा कंटाळा आला.

गाडीत मित्रांबरोबर अखंड बडबड करता करता कधीतरी ते त्रिवेंद्रम आलं. त्रिवेंद्रममध्ये स्थिरस्थावर झाल्यावर एका रविवारी आम्ही जवळच असलेल्या पुंमुडी या थंड हवेच्या ठिकाणी गेलो. जीप किंवा वडापसारखी गाडी होती. दाटीवाटी करून बसलो. दोनेक तासांचा अवघडलेला प्रवास करत आम्ही माथ्यावर पोहोचलो तेव्हा छान ऊन होतं. परतीच्या प्रवासाला मात्र आभाळ भरून आलं. एका वळणावर पाऊस सुरू झाला आणि क्षणात वातावरणाचा सूर पालटला...

तेव्हा वाटलं, मला पावसासारखं होता आलं तर किती बरं होईल. मल्लिकार्जुनची टेकडी असो, महाबळेश्वर, माथेरानसारखं मोठं थंड हवेचं ठिकाण असो किंवा पुंमुडीसारखी छोटी जागा. पाऊस बरसला की सारा आसमंत कसा सुंदर होतो, आल्हाददायक होतो. मी मात्र रेल्वेच्या संथपणामुळे, वडापच्या दाटीवाटीमुळे कुरकुरत होतो.

rain
Satara Crime : रात्रीत असं काय घडलं? अख्खं कुटुंबच अंथरुणात मृत्युमुखी पडलं; साताऱ्यात हादरून सोडणारी घटना

पावसाकडनं ही कला शिकण्यासारखी आहे. त्याचे रंगहीन थेंब हिरव्या रंगाच्या अनंत नेत्रसुखद छटा निर्माण करतात. आपल्यालाही आपल्या वागण्यातनं, बोलण्यातनं, हसण्यातनं अशी अगणित हिरवीगार नाती निर्माण करता आली तर भांडण, तंटा हे शब्द फक्त शब्दकोडं सोडवतानाच उपयोगी येतील. पण पाऊस फक्त हिरव्या रंगापुरताच मर्यादित नाही.

लहानपणी आमचं घर ज्या गल्लीत होतं, तिथल्या रस्त्याला गुलमोहर रस्ता असं नाव होतं. उन्हाळ्यात झाडांच्या शेंड्यावर डोलणारी गुलमोहराची फुलं पहिल्या पावसानंतर रस्त्यावर लाल रंगाची चादर अंथरायची. माझ्या आयुष्यातलं ते पहिलं ‘रेड कार्पेट’. जगाचा निरोप कसा दिमाखात घ्यावा हे त्या गुलमोहराच्या फुलांकडून शिकावं.

इंद्रधनूचे सात रंग उधळणारा हा पाऊस माझ्या आयुष्याचा एक कोपरा गुलाबी करून गेला. पावसात अनेक प्रवास झाले पण त्यातला एक निराळा प्रवास म्हणजे माझ्या ऑफिस बसच्या थांब्यापासून माझ्या घरापर्यंतचा. माझ्या पूर्ण झालेल्या काही थोड्या स्वप्नांपैकी एक स्वप्न म्हणजे कंपनीच्या बसनं ऑफिसला जाणं.

माझ्या घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर बसचा थांबा होता. पावसाळ्यात मी ज्या ज्या दिवशी छत्री घेऊन ऑफिसला जायचो त्यादिवशी अजिबात पाऊस पडत नसे, पण ज्या दिवशी मी छत्री न्यायला विसरायचो त्या दिवशी भिजतच घरी यावं लागे. हे कोडं मला आजपर्यंत उलगडलेलं नाही. मग मी पुण्यात पाणीप्रश्न उद्‍भवू नये म्हणून छत्री घरीच ठेवायला लागलो. बऱ्याचदा मी पावसात भिजत घरी यायचो.

एक दिवस ‘लिफ्ट हवी का माझ्या छत्रीत?’ असं खट्याळ हसत ‘तिनं’ विचारलं. इतके दिवस जिच्याशी बोलेन बोलेन असं ठरवीत होतो ते त्या पावसाच्या सरीनं सोप्पं करून दिलं. इतके दिवस मी पावसात फक्त ओला होत होतो, पण तिनं भिजायला शिकवलं.

वाऱ्यामुळे उडणाऱ्या छत्रीला पकडताना दोघांचा एकमेकांना झालेला स्पर्श म्हणजेच तो गुलाबी क्षण. पण पावसात उगवतात त्या गंधाळ रानफुलांसारखी जशी ती नकळत भेटली तशी अचानक हरवलीसुद्धा.

rain
Jaipur-Mumbai Exp Firing : बोगीमध्ये मृतदेह पडले होते, हातात पिस्तुल घेऊन फिरत होता कॉन्स्टेबल; वाचा थरारक घटनाक्रम

*

गुलमोहराची फुलं पाडणारा पाऊस अनेक रानफुलांचा जन्मदाता होतो. विविध रंगाची, आकाराची, गंधाची माझ्यासाठी अनामिक असलेली ही फुलं मी पावसाळ्यात केलेल्या अनेक ट्रेकमध्ये पाहिलीत. गड, किल्ले आणि डोंगराचं वेड मला चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकानं आणि पावसानं लावलं.

माझं बरंचसं आयुष्य कोकणात आणि सह्याद्रीच्या कुशीत गेलं. पूर्वजन्मीचं कुठलं पुण्य होतं कुणास ठाऊक, ज्यामुळे सिंहगड, राजगड, तोरणा यांसारख्या प्रसिद्ध गडांवरील भटकंतीबरोबरच तिकोना, तुंग, चावंड आणि हडसर परिसरातले छोटेखानी ट्रेकदेखील भरपूर केलेत. यातला अविस्मरणीय ट्रेक म्हणजे पेठ भीमाशंकरचा.

सन २०१७च्या एका शनिवारी आम्ही शिवाजीनगर स्टेशनवरून हा ट्रेक सुरू केला. कर्जतला उतरून शेअर रिक्षाने आम्ही पेठ गावाच्या पायथ्याशी पोहोचलो. १२-१४जण असू आम्ही. दुपारचं जेवण करून कोथळीगड पाहायचा आणि रात्री पेठला मुक्काम करायचा असा कार्यक्रम होता. आमच्यातला एकजण जरा जास्तच जेवला. त्यातच पाऊस लागू नये म्हणून तो जाडजूड सूट घालून आला होता.

आम्ही पेठकडे प्रयाण केलं. वातावरण ढगाळ होतं. घामानं आम्ही सारे चिंब ओले झालो. हे सुटाबुटातले महाशय तर जरा जास्तच अस्वस्थ झाले. जड अंतःकरणानं आम्ही त्याला, त्याच्या जाडजूड सुटाला आणि त्याहून जड बॅगेला अलविदा केलं. पुण्याचा परतीचा प्रवास कसा करायचा हे त्याला सांगून आम्ही पुढे निघालो.

बराच वेळ झाला तरी ना पेठ दिसेना ना पाऊस बरसेना. तशातच एकमेकांना अवसान देत आम्ही जशी चढण संपवली, तसा समोर कोथळीगडाचा सुळका दिसला. आतापर्यंतच्या प्रवासाचा शीण क्षणात गेला. छायाचित्रणाची हौस भागवून आम्ही नव्या दमानं पुढच्या प्रवासास लागलो. मजल दरमजल करत पेठ गावात पोहोचलो. तिथं चहा घेऊन आम्ही तडक कोथळीगड चढायला सुरुवात केली.

गडाच्या सुळक्यातून कोरलेल्या पायऱ्या चढताना कुठल्यातरी गूढ वाटेनं खजिना शोधायला चाललोय, असं वाटत होतं. गड उतरताना वरुणराजा आमच्यावर प्रसन्न झाला. भिजत भिजत आम्ही पेठ गावात आलो. रात्रीचं जेवण करून तिथल्या मारुतीच्या देवळात आम्ही डेरा टाकला.

rain
PM Modi Pune Visit : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी पुण्यात राजकीय वातावरण तापलं! विरोधात झळकले बॅनर्स

त्या देवळाला एक छोटी खिडकी होती. तिची झडप तुटली होती. तिथून छान गार हवा येत होती. थकल्यामुळे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत कधी झोप लागली ते कळलंच नाही. रात्री पावसानं रुद्रावतार धारण केला. प्रचंड विजा कडाडत होत्या नि मुसळधार पाऊस पडत होता.

वीज चमकली की त्या उघड्या खिडकीतून कॅमेऱ्याचा फ्लॅश पडावा तसा उजेड येत होता. त्यातल्याच एका फ्लॅशमध्ये माझ्या मित्रानं मला इशारा केला, ‘हा पाऊस जर असाच सुरू राहिला तर भीमाशंकरला न जाता उलटपावली पुण्याला जावं लागेल.’ सकाळ होता होता पाऊस थांबला. काल कोरड्या असलेल्या रस्त्यांवर आज जणू मोठं चहाचं पातेलं सांडलंय असे लाल रंगाचे पाट वाहत होते.

उघड्या बोडक्या डोंगरावर असंख्य धबधब्यांनी जन्म घेतला होता. सकाळचे सर्व विधी आटपून आम्ही भीमाशंकरकडे निघालो. या प्रवासात आम्ही कितीदा भिजलो आणि पुन्हा कोरडे झालो याची गणतीच नाही. १५-२० किलोमीटरचा ट्रेक करून आम्ही भीमाशंकरच्या गाभाऱ्यात पोहोचलो.

यादरम्यान जिथं जिथं थकवा जाणवला तिथं जुन्या ट्रेकच्या किश्‍श्‍यांनी, एखाद्या विनोदानं, सिनेमातल्या गाण्यानं एकमेकांना उभारी देत होतो. जेव्हा काहीच मात्रा चालली नाही, तेव्हा अवचित पावसाची सर यायची. मन आणि शरीर प्रफुल्लित करून जायची. एखाद्या जिवलग मित्रासारखी त्यादिवशी पावसानं साथ दिली.

बाकी पावसामुळे बऱ्याचजणांची नाती मैत्रीच्या पुढे गेलीत.

काही रुजली आणि काही नसतीलही, पण त्यातल्या प्रत्येकाला कविता करण्याची प्रेरणा जरूर दिली. माझ्या मते, प्रेमानंतर

सर्वात जास्त कविता पावसावरच केल्या गेल्या असतील.

पावसाळा हा ऋतू नाही, ती एक भावना आहे. हा पाऊस जसं शेतकऱ्याचं पीक पिकवण्याची किमया साधतो, तसं मानवी मन प्रगल्भ करण्याची जादूदेखील त्याला जमते. म्हणूनच कदाचित आपला अनुभव समोरच्याहून जास्त आहे हे सांगण्यासाठी ‘मी तुझ्याहून चार पावसाळे जास्त पाहिलेत’ असं म्हणत असावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.