Cinema :प्यारवाली लव स्टोरी पाहून कंटाळलात? पहा हेही चित्रपट

mughale azam
mughale azam

मुग़ल-ए-आझम, संगम, दिल एक मंदिर, बॉबी, एक दुजे के लिये, कयामत से कयामत तक, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, हम दिल दे चुके सनम, जब वी मेट, मनमर्जियां हे चित्रपट तर एव्हरग्रीन आहेतच पण यापलीकडे देखील चित्रपटांची एक मोठी दुनिया आहे... ती तुम्हाला माहिती आहे का?

सुहास किर्लोस्कर

चित्रपटांच्या विविध प्रकारांची माहिती घेऊन सर्व प्रकारचे चित्रपट बघण्याचा उपक्रम हाती घेतल्यास अजून काय बघू शकतो? काय बघायचे राहिले आहे? याचा अंदाज येऊ शकतो.

थिएटरमधला चित्रपट घराघरामध्ये पोहोचवण्याचे श्रेय दूरदर्शनला जाते, कारण १९८०च्या दरम्यान दूरदर्शनवर दर शनिवार-रविवारी चित्रपट दाखवले जाऊ लागले. १९९० साली स्टार मुव्हीज् हे इंग्रजी चित्रपटांचे चॅनेल सुरू झाले, त्यामुळे भारतीयांना अनेक इंग्रजी चित्रपट सबटायटल्ससह बघण्याची सुविधा उपलब्ध झाली.

१९९५ साली झी सिनेमा हे पूर्णपणे हिंदी चित्रपटाला वाहिलेले टेलिव्हिजन चॅनेल सुरू झाले आणि दिवसभर अखंडपणे चित्रपट दाखवले जाऊ लागले. २००८पासून ओव्हर द टॉप - ओटीटी - माध्यम भारतामध्ये हातपाय पसरू लागले आणि २०१६पासून नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार अशा ओटीटी माध्यमांमुळे कोणताही चित्रपट केव्हाही बघणे, पॉझ करणे, पुनश्च आपापल्या सोयीनुसार सुरू करणे अशा सोयी वाय-फाय असलेल्या घराघरामध्ये पोहोचल्या.

पूर्वी टेलिव्हिजनवर ज्या वेळात चित्रपट दाखवला जाईल त्याप्रमाणे आपले शनिवार-रविवारचे वेळापत्रक जुळवून घ्यावे लागायचे. आता ओटीटीमुळे आपल्या वेळेनुसार आपण अनेक चित्रपट बघू शकतो. नेटफ्लिक्सवर तेरा हजारपेक्षा अधिक चित्रपट उपलब्ध आहेत.

प्राईमवर सव्वीस हजार, जिओ सिनेमावर दहा हजार चित्रपट आहेत; मुबी, डिस्ने प्लस हॉटस्टार, सोनी लिव्ह अशा अनेक ओटीटी चॅनेलवर असंख्य चित्रपट उपलब्ध आहेत. इतके मोठे भांडार समोर असताना आता मुख्य प्रश्न आहे की आपण काय बघतो!

लहानपणीच पालकांच्याबरोबर चित्रपट बघता बघता आपली आवड निर्माण होते. वाढत्या वयानुसार शालेय जीवनात हाणामारीचे म्हणजेच अॅक्शन चित्रपट आवडतात. कॉलेजच्या दिवसात साहजिकच प्रेमकथा म्हणजेच रोमँटिक चित्रपट आवडू लागतात. चार घटका करमणूक या स्वरूपात कधी आपण विनोदी चित्रपट बघतो.

धाडस करण्याच्या उद्देशाने कधी रात्री-अपरात्री हॉरर चित्रपट बघतो, तेव्हा तो चित्रपट अनामिक भीती दाखवणारा असल्यास आवडून जातो. पण हजारो चित्रपटांच्या गर्दीमध्ये आपण आपली चित्रपट बघण्याची आवड कशी जपावी याबद्दल संभ्रम असतो. चित्रपट बघण्यासाठी इतकी साधने उपलब्ध असताना काय बघावे? याचा निर्णय घेण्यामध्येच कौशल्य आहे.

अन्यथा रिमोटशी खेळण्यात बराच वेळ जाऊ शकतो आणि तासभर सर्वदूर फिरल्यानंतर हाती काहीच लागत नाही. यासाठी चित्रपटांच्या प्रकारांची माहिती घेऊन सर्व प्रकारचे चित्रपट बघण्याचा उपक्रम हाती घेतल्यास अजून काय बघू शकतो? काय बघायचे राहिले आहे? याचा अंदाज येऊ शकतो.

mughale azam
National Film Awards : दिल्लीत मराठी चित्रपटांचा डंका ‘एकदा काय झालं’ चित्रपटातील अभिनेत्यांचा सन्मान

रोमँटिक

आपल्याआपल्या महाविद्यालयीन जीवनात पाहिलेले रोमँटिक चित्रपट प्रत्येक पिढीला पसंत पडलेले आहेत. मुग़ल-ए-आझम, संगम, दिल एक मंदिर, बॉबी, एक दुजे के लिये, कयामत से कयामत तक, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, हम दिल दे चुके सनम, जब वी मेट, मनमर्जियां असे अनेक चित्रपट प्रत्येक पिढीला त्यांच्या कॉलेजच्या दिवसांत आवडलेले असतात.

यातील अनेक चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या रोमियो ज्युलिएट नाटकावरून प्रेरणा घेऊन तयार केलेले आहेत, परंतु चित्रपटाची भाषा त्यावेळच्या युवावर्गाला साजेशी असते.

प्रीटी वूमन, नोटिंग हिल, स्लीपलेस इन सिएटल असे अनेक उत्तम रोमँटिक इंग्रजी चित्रपट आहेत, जे अनेकवेळा बघितले जातात. त्या दोघांनी एकमेकांना पाहिले, पसंत केले आणि ते दोघे सुखाने नांदू लागले इतकी सरळसोट प्रेमकथा नसते.

त्यामध्ये नाट्यमय प्रसंग असतात, संघर्ष असतो. त्यामुळे प्रेमकथेमध्ये ड्रामा असतो, कधी थरार असतो तर कधी सस्पेन्स असतो. कॅसाब्लांका, साथिया, बिफोर... ट्रायलॉजी हे चित्रपट उत्तम रोमँटिक ड्रामा आहेत. प्राईड ॲण्ड प्रेज्युडिस, गॉन विथ द विंड, मुग़ल-ए-आझम, जोधा अकबर या ऐतिहासिक प्रेमकथा आहेत.

हम दिल दे चुके सनमसारख्या रोमँटिक ड्रामामध्ये दाखवलेला प्रेम प्रकरणामधील तिसरा कोन हा हिंदी चित्रपटांचा आवडता विषय आहे. हम तुम, जब वी मेटसारख्या रोमँटिक चित्रपटांची हाताळणी विनोदाच्या अंगाने केल्यास तो चित्रपट रोमँटिक कॉमेडी अर्थात ‘रॉम-कॉम’ प्रकाराचा ठरतो. रोमँटिक चित्रपटाला थरार नाट्याची जोड दिल्यास रोमँटिक थ्रिलर तयार होतात; अनफेथफुल, रोजा, डर यांसारख्या चित्रपटांना रोमँटिक थ्रिलर म्हणता येईल.

चित्रपटाचा प्रकार ठरवल्यानंतर पटकथा लेखक-दिग्दर्शक त्या चित्रपटाची हाताळणी कशी करावी याबद्दल निर्णय घेतात. त्यामुळे अनफेथफुल, रिबेका, व्हर्टिगोसारख्या इंग्रजी चित्रपटांच्या लेखक-दिग्दर्शकांची बांधिलकी त्या चित्रपटाच्या प्रकाराशी अधिक असल्याचे दिसून येते. रोमँटिक चित्रपटामध्ये सॉफ्ट फोकस लेन्स, क्लोज अप शॉटचा अधिक वापर केल्याचे दिसून येते. या प्रकारच्या भारतीय चित्रपटांमध्ये गाण्यांचा अंतर्भाव करण्याची परंपरा आहे, परंतु गाणी हे चित्रपटाचे अविभाज्य अंग नाही.

mughale azam
69th National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कारावर 'रॉकेट्री' झालं लँड! 'एकदा काय झालं'नं देखील मारली बाजी

कॉमेडी

मंदस्मित, खळखळून हसणे, छद्मी हसणे असे हसण्याचे विविध प्रकार आहेत कारण विनोदाच्या प्रकारानुसार हसण्याची प्रतिक्रिया दिली जाते. विडंबन, व्यक्तिनिष्ठ, नक्कल, अतिशयोक्ती, शाब्दिक कोट्या, अतर्क्य, प्रासंगिक असे विनोदाचे विविध प्रकार आहेत;

त्याचप्रमाणे विनोदी चित्रपटांचे विविध प्रकार आहेत. मिसेस डाउटफायर आणि त्यावर बेतलेल्या चाची ४२० चित्रपटाला कॉमेडी ड्रामा म्हणतात. स्लीपलेस इन सिएटल, वुडी ॲलन दिग्दर्शित ॲनी हॉल असे चित्रपट उत्तम रॉम-कॉम (रोमँटिक कॉमेडी) आहेत.

एखादा गंभीर प्रश्न विनोदाची डूब देऊन मांडल्यास त्यामधील सत्य अंगावर येत नाही आणि खेळकरपणे घेतले जाते (घेतले जाऊ शकते). अशा विनोदाला ‘डार्क कॉमेडी’ किंवा ‘ब्लॅक कॉमेडी’ म्हणतात. राजाने पाळलेला पोपट मेला आहे असे सत्य तितक्या स्पष्टपणे न सांगता तो पोपट पंख-पाय हलवत नाहीये, त्याचे हृदय धडधड करत नाहीये, तो इतक्या शांतपणे झोपला आहे की या राज्यामध्ये तो पुन्हा कधीही उडू शकणार नाही, अशा पद्धतीने सांगण्याला डार्क कॉमेडी म्हणतात.

कुंदन शाह दिग्दर्शित जाने भी दो यारों या चित्रपटाबरोबरच न्यूटन, फार्गो, सिस्टर अॅक्ट, जोजो रॅबिट असे अनेक चित्रपट उत्कृष्ट ब्लॅक कॉमेडी आहेत. परंतु या चित्रपटातील शाब्दिक कोट्या समजण्यासाठी त्या भाषेवर प्रभुत्व असावे लागते, त्याचप्रमाणे त्या देशातील त्या काळातील राजकीय-सामाजिक स्थितीची थोडीफार माहिती असावी लागते. ‘स्लॅपस्टीक कॉमेडी’मध्ये शब्दांपेक्षा शारीरिक अंगविक्षेपाचा वापर केलेला असतो.

द मास्क, लायर लायरसारखे जिम केरीचे चित्रपट, मिस्टर बिन असे चित्रपट या दृष्टिकोनातून बघण्यासारखे आहेत. ‘पॅरडी’ चित्रपटामध्ये एखाद्या कलाकृतीची खिल्ली उडवलेली असते. मिस्टर इंडिया चित्रपटातील पॅरडी साँग आपल्या परिचयाचे आहे. जॉनी इंग्लिश हा चित्रपट बाँड चित्रपटांची पॅरडी (विडंबन) आहे.

हॉट शॉट (भाग १, २) चित्रपटामध्ये रॅम्बोप्रमाणेच काही राष्ट्राध्याक्षांचे विडंबन केले आहे. ‘स्पुफ’ (फसवाफसवी) चित्रपटामध्ये एका संपूर्ण कलाकृतीची पॅरडी असते. स्केअरी (भाग १,२,३), ऑस्टिन पॉवरचे चित्रपट उत्तम चित्रपटांचे उत्तम स्पुफ आहेत.

चार्ली चॅप्लीन दिग्दर्शित अभिनित द ग्रेट डिक्टेटर, जिम केरी अभिनित द ट्रुमन शो यांसह पुष्पक, जॉली एल.एल.बी., पिपली लाइव्ह ही उत्तम ‘सटायर कॉमेडी’ (व्यंगचित्र) चित्रपटाची उदाहरणे आहेत.

काही प्रसंग ओढवल्यामुळे एखाद्या कुटुंबाला/ व्यक्तिसमूहाला कोणत्या विनोदी परिस्थितीला तोंड द्यावे लागते, त्या प्रासंगिक विनोदामुळे निर्माण होणाऱ्या चित्रपटांना ‘सिच्युएशनल कॉमेडी’ म्हणजे सिट-कॉम (Sit-Com) म्हणतात. लिटल मिस सनशाईन आणि त्यावर आधारित दे धक्का हे चित्रपट या प्रकारातील आहेत.

ग्रेट डिप्रेशनमुळे ‘स्क्रूबॉल कॉमेडी’ चित्रपट प्रकार १९३०पासून लोकप्रिय झाला. अशा चित्रपटांमध्ये दोन भिन्न आर्थिक स्तरांमधील युवक-युवती एकत्र आल्यावर त्यांचे प्रेमसंबंध जमण्यामध्ये जे विनोदी प्रसंग रंगवले जातात, त्यामुळे प्रासंगिक विनोद तयार होतात.

इट हॅपन्ड वन नाईटसारखे अनेक चित्रपट त्या काळी तयार झाले, त्यांचे वर्गीकरण या प्रकारामध्ये होऊ शकते. ज्युलिया रॉबर्ट्स अभिनित माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग, रनअवे ब्राईड हे चित्रपट याच प्रकारातील म्हणता येतील. याव्यतिरिक्त कॉमेडी चित्रपटांमध्ये सेक्स कॉमेडी (देअर इज समथिंग अबाउट मेरी), बडी कॉमेडी (रश अवर), रोड कॉमेडी (डम्ब ॲण्ड डम्बर) असे अनेक प्रकार/ उप-प्रकार आहेत.

प्रत्येक देशाच्या विनोद करण्याच्या पद्धतीमध्ये फरक असतो. ब्रिटिश ह्युमर वेगळा आणि अमेरिकन ह्युमर वेगळा असतो. भारतीय लोक विनोद करताना स्वतःच हसतात, परंतु ब्रिटिश लोक विनोद करताना चेहरा शक्य तितका मख्ख ठेवतात. त्यामुळे डेथ ॲट अ फ्युनरलसारखे ब्रिटिश ह्युमर असणारे चित्रपट बघताना त्यातले शब्द, शाब्दिक कोट्या याकडे अधिक लक्ष द्यावे लागते.

असे चित्रपट सबटायटल्स वाचता वाचता बघितल्यास त्यामधील शाब्दिक कोट्या समजतात आणि अशा विनोदांची सवय होते. त्यासाठीच वेगवेगळ्या देशातील/प्रांतामधील विनोदी चित्रपट अवश्य बघावेत.

mughale azam
International Short Film Festival : मुंबईत आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सव संपन्न

अॅनिमेशन

अॅनिमेशन चित्रपट लहान मुलांसाठी असतात, असा गैरसमज आपल्याकडे रूढ आहे. निर्जीव वस्तू अशा कौशल्याने दाखवल्या जातात की जणू काही त्या सजीव आहेत. अॅनिमेट या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘सजीव करणे’, एखाद्यामध्ये ‘जान’ आणणे. फ्लिप बुक, कठपुतळ्यांचे नृत्य/नाट्य एक प्रकारचे अॅनिमेशन असते.

अनेक चित्रे सलग काढून ती चित्रे हालताना दिसतात असा आभास निर्माण करण्यामध्ये आणि तो लोकप्रिय करण्यामध्ये वॉल्ट डिस्नेचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यापूर्वी एडवर्ड मेब्रीज, जे स्टूअर्ट ब्लॅकटोन (१९००), एमिल कोल (१९०८), अर्ल हर्ड आणि जॉन ब्रे (१९१५) अशा कलाकारांनी या कलेचा पाया घातला आणि त्याचा कळसाध्याय वॉल्ट डिस्ने यांनी लिहिला. स्नो व्हाईट अॅण्ड द सेव्हन ड्वार्फ (१९३७) हा दीड तासाचा चित्रपट जगभरात लोकप्रिय झाला.

१९८९ साली अॅनिमेशन क्षेत्रात कॉम्प्युटरची ‘एन्ट्री’ झाली. मॅक्स फ्लेशर यांनी रोटोस्कोपिक तंत्रज्ञानाचा शोध लावला, त्यामुळे अॅनिमेशन चित्रे सजीव असल्याप्रमाणे हालचाल करताना दिसू लागली. ‘स्टॉप मोशन’मध्ये एखाद्या माणसाचे-प्राण्याचे-पक्ष्याचे-सजीवाचे फोटो घेतले जातात आणि त्याचे अॅनिमेशन केले जाते. क्लॅश ऑफ टायटन्स (१९८१), चिकन रन (२०००) सारखे उत्तम स्टॉप मोशन चित्रपट आहेत.

‘पपेट्री’ (पपेट अॅनिमेशन), ‘क्लेमेशन’ (मातीपासून केलेल्या पात्रांचे अॅनिमेशन), ‘कट आउट अॅनिमेशन’ असे काही अन्य अॅनिमेशन प्रकार आहेत. हू फ्रेम्ड रॉजर रॅबीटसारख्या चित्रपटांना ‘लाईव्ह ॲक्शन अॅनिमेशन’ म्हणतात ज्यामध्ये सजीव कलाकारांच्याबरोबर अॅनिमेशन पात्रे दिसतात. सीजीआय म्हणजेच कॉम्प्युटर जनरेटेड इमॅजिनरी चित्रपटामध्ये अॅनिमेशन करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.

फाइंडिंग नीमो, द इन्क्रेडीबल्स, रॅटॅटूईली यांसारखे उत्तम चित्रपट तयार करताना पिक्सरने 3D तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. फाइंडिंग नीमो चित्रपट जैववैविध्याचा अभ्यास करण्यासाठी लहान-थोरांनी एकत्र बसून बघावा. रॅटॅटूईली (Ratatouille) उंदराचा सिनेमा नाही, तो शेफबद्दल आहे. वॉल-ई पर्यावरणाबद्दल आहे.

इनसाईड आउट, एन्कान्तो (Encanto) चित्रपटात मानसिकतेचा अभ्यास आहे. कुंग फू पांडा चित्रपटामधील संवाद म्हणजे सोप्या भाषेत सांगितलेले तत्त्वज्ञानच! आइस एज चित्रपटामधील स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्या पात्रांचे अर्थवाही संवाद कमालीचे आहेत.

द लायन किंग ही कथा शेक्सपिअरच्या हॅम्लेटचे वेगळे रूप आहे आणि त्या चित्रपटामधील संवाद, स्वभाव वैशिष्ट्ये, पार्श्वसंगीत याकडे लक्ष दिल्यास तो चित्रपट मोठ्यांनी अभ्यासपूर्वक बघावा असाच आहे. चित्रपटाच्या इतर प्रकाराबद्दल पुढील लेखामध्ये..

mughale azam
Cannes Film Festival यंदा गाजवला मराठी माणसानं.. अशोक राणेंना 'सत्यजित रे स्मृती' पुरस्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com