Travel experiences
Esakal
झेलम चौबळ
खरंतर मी फक्त प्रवासाबद्दल किंवा ठिकाणांबद्दलच लिहिते, परंतु आज विमान प्रवासात जाग आली आणि काही किस्से, काही माणसं, काही देवमाणसं आठवत गेली आणि त्यांच्याविषयी लिहावंसं वाटलं. थोडं विषयांतर होईल, पण बघा आवडतंय का...!
आर्यन बेटा, देवाला नमस्कार करून शाळेला किंवा बाहेर निघावं...’’ मुलाला सांगत होते... पण, ‘‘मम्मा, या देवावर काही माझा विश्वास नाही, माझ्यासाठी तूच देव आहेस!’’ असा डायलॉग हाणून महाशय शाळेत गेले. मला मात्र प्रश्न पडला, याला कसं समजवू? बहुतेक त्याला देव, देवत्व, देवमाणसं हे सगळं समजवण्यासाठी त्याच्या काळातल्या गोष्टींचे संदर्भ द्यायला हवेत. मग एक दिवस मी त्याला सांगितलं, ‘‘बेटा, माझ्या मते देवावर विश्वास ठेवणं म्हणजे चांगल्या कर्मावर विश्वास ठेवणं.
समाजातील ज्या ज्या लोकांनी समाजाचं भलं होण्यासाठी कार्य केलं ते ते आपल्याला देवासमान असावेत, तीच देवमाणसं... आणि ज्या गोष्टींतून आपल्याला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, ज्यामुळे आपल्या हातून चांगलं कर्म होतं त्या गोष्टी म्हणजे देवत्व!’’ हे ऐकल्यावर मात्र सतत वाद घालणारा, कधीही निरुत्तर न होणारा आर्यन सहमत झाला.