डॉ. उत्क्रांत कुर्लेकर
साधारण बारा वर्षांपूर्वी मी कॉलेजच्या एका रीयुनियनला गेलो होतो. आम्ही सर्वजण साधारण सत्तेचाळीस-अठ्ठेचाळीस वर्षांचे होतो. पन्नासाव्या वर्षी कोणती ध्येये पूर्ण करायची, स्वप्ने साकार करायची असा विषय सुरू होता. मी इतरांचे विचार रस घेऊन ऐकत होतो. कोणाला घर बांधायचे होते, कोणाला शेती करायची होती, कोणाला जगभर प्रवास करायचा होता. ते सर्व ऐकताना माझ्या मनात विचार आला, की पन्नासाव्या वाढदिवसाला स्वतःला फिजिकल फिटनेसची अशी भेट देईन, की मी ४२ किलोमीटरची फुल मॅरेथॉन पळू शकेन. मी तयारीला लागलो.
मी पेशाने शल्यचिकित्सक (सर्जन) म्हणून काम करतो. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात साठी पार करेन. या व्यवसायामध्ये मी गेली ३२ वर्षे कार्यरत आहे. हा व्यवसाय मला अत्यंत आवडतो. मी रोज माझे दिवसाचे काम साधारण सकाळी साडेनऊ वाजता सुरू करतो, ते साधारण रात्री साडेनऊ वाजता संपते. याव्यतिरिक्त बाकीच्या वेळात मला इमर्जन्सी रुग्ण बघावे लागतात. आठवड्यातल्या सात दिवसांपैकी मला सरासरी दोन दिवस तरी रुग्णालयात रात्री पेशंट बघायला जावे लागते.