दिलीप संगत
कोणताही अन्न व्यावसायिक कायद्यातील नियमांचे पालन करूनच आपला व्यवसाय कसा भरभराटीस येर्इल यादृष्टीने प्रयत्न करीत असतो, पण कधीकधी कायद्यातील नियमांची नीट माहिती नसल्याने किंवा अज्ञानापोटी किंवा व्यावहारिक अडचणींमुळे अजाणतेपणी कायद्यातील एखाद्या नियमाचे उल्लंघन होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्न व्यावसायिकांना कायद्यातील नियमांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात व्यवसायात टिकून राहायचे असल्यास ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांना चांगले दर्जेदार अन्नपदार्थ कसे मिळतील याबाबत सदैव प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. अन्न व्यावसायिक म्हणून ग्राहकांना चांगल्या दर्जाचे, सुरक्षित, पौष्टिक व भेसळविरहित अन्नपदार्थ मिळावेत यासाठी जागृत राहणे गरजेचे आहे. अन्नपदार्थांचा दर्जा टिकवण्याबरोबरच योग्य परवाना असणे तसेच विक्री करताना काही नियम पाळणे कायद्याने बंधनकारक आहे.
अन्न व्यवसाय सुरू करण्यामधली एक महत्त्वाची पायरी म्हणजे, व्यावसायिकाकडे योग्य परवाने असणे. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व त्याअंतर्गत नियमन २०११नुसार राज्यातील सर्व अन्न व्यावसायिकांना परवाना अटींचे पालन करावे लागते. या अटी पुढीलप्रमाणे आहेत -
परवाना अद्ययावत असावा आणि हा परवाना आस्थापनाच्या दर्शनी भागावर ग्राहकांना दिसेल असा लावावा.
परवाना/ नोंदणीची मुदत संपण्यापूर्वीच त्याचे नूतनीकरण करावे. आता १८० आधी परवाना/नोंदणीचे नूतनीकरण करता येते.
प्रशासनाकडून मिळालेल्या परवान्याबरोबर असलेल्या परवाना अटींचे व इतर कागदपत्रांचे सखोल वाचन करावे.
आपण विक्री करीत असलेल्या अथवा उत्पादन करीत असलेल्या अन्नपदार्थाची नोंद परवान्यात आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. तसे नसल्यास परवान्यात त्यानुसार त्वरित बदल करून घ्यावेत.