मल्हार मेहेत्रे
फूड टेक्नॉलॉजी म्हणजे केवळ स्वयंपाक नव्हे, तर विज्ञानाच्या माध्यमातून अन्नाची गुणवत्ता, टिकवणूक आणि पोषणमूल्यांवर काम करणं! बदलत्या जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणाऱ्या अन्नप्रक्रिया उद्योगात करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. त्यांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप...
‘‘तु ला कोण कोणते पदार्थ करता येतात?’’
मी जेव्हा लोकांना सांगतो, की मी फूड टेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेत आहे, तेव्हा मला सर्वांत आधी विचारला जाणारा हा प्रश्न असतो. त्यावर आता माझं ठरलेलं उत्तर मी देतो. ‘‘खाद्यपदार्थ तयार करणं म्हणजे कलिनरी आर्ट् स किंवा हॉटेल मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी नव्हे.’’
फूड टेक्नॉलॉजी म्हणजे केवळ स्वयंपाकघरात पदार्थ करणे नव्हे, तर खाद्यपदार्थांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रक्रिया करणे. ही संकल्पना समजून घ्यावी लागेल.
फूड टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण खात असलेल्या अन्नपदार्थांची गुणवत्ता, पोषणमूल्ये, टिकाऊपणा (शेल्फ लाइफ) यामध्ये सुधारणा करण्यासाठी केला जातो. म्हणजे ह्या अभ्यासक्रमात अन्नपदार्थ तयार करण्यापेक्षा त्याच्या विज्ञानामागचं तंत्रज्ञान शिकवलं जातं, हे प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे.
उदाहरणार्थ, आज आपल्याला सहज मिळणारे रेडी टू कुक आणि रेडी टू ईट पदार्थ. इन्स्टंट नूडल्स, बिस्किटे, पॅक्ड चिप्स हे सगळं फूड टेक्नॉलॉजिस्टच्या संशोधनाचं फलित आहे. किंवा अंतराळात वापरण्यायोग्य अन्न, जे कमी जागेत साठवता येतं, पोषक असतं आणि दीर्घकाळ टिकतं, हेसुद्धा फूड टेक्नॉलॉजीमधील संशोधनातूनच शक्य झालं आहे.