

Wild Vegetables Benefits
esakal
डॉ. मंदार दातार
बरेचदा रानभाज्या त्यांना फुले येण्यापूर्वी गोळा करण्याचे पथ्य पाळले जाते. कारण एकदा वनस्पतीला फुले आली, की त्यांना संरक्षणाची जास्तीची गरज भासते आणि त्यांच्यामध्ये संरक्षक रसायनांचे प्रमाण वाढते. अंतर्भूत कडवटपणामुळे कच्च्या रानभाज्या खाण्याची मात्र प्रथा नाही.
ऋग्वेदातील अरण्यसुक्तात वनभूमीचे वर्णन असे आहे, वनपुष्पांच्या सुरभीने गंधित, नांगरल्याविण बहूअन्ना पशुपक्षांची तू तर माता, अरण्यदेवी नमोस्तुते या वर्णनामधला माणसाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे ‘बहूअन्ना’ म्हणजे भरपूर अन्न देणारी, पण त्यातही अशी भूमी जी कधी नांगरली जात नाही. ही ‘अकृषीवला’ म्हणवली जाणारी वनभूमी नांगर चालवलेल्या जमिनीपेक्षा अन्नउत्पादनात जास्त विविधता बाळगते. ही विविधता म्हणजेच वन्य कंदवर्गीय खाद्यवनस्पती आणि रानमेवा म्हणवली जाणारी रसदार रानटी फळे तसेच रानभाज्या. केवळ कंदमुळे खाऊन जगण्याची साधना करणाऱ्यांचे संदर्भ तर पुराणात वारंवार येतात. अरण्यभूमीत वाढणाऱ्या या वनस्पती शेतात आणि फळांच्या भागात लावल्या जाणाऱ्या कृषी वनस्पतींपेक्षा हटकून वेगळ्या आहेत. एकेकाळी रानटी असणाऱ्या फळ-भाज्या-धान्यांच्या विविधतेमधूनच खरेतर आपल्या सगळ्या कृषी वनस्पती आल्या आहेत. आपल्या संस्कृतीच्या इतिहासात माणसाने अनेक रानटी वनस्पती हाताळल्या, माणसाळवल्या (डोमेस्टिकेशन), जंगलातून शेतात आणल्या.