लयनकथा । अमोघ वैद्य
गणपती गडद हा सात लेण्यांचा एक समूह असून, त्यामधलं मध्यवर्ती लेणं विशेष महत्त्वाचं आहे. तिथं शांतता आणि भक्ती यांचं दर्शन घडवणारी मनोहर गणेशमूर्ती विराजमान आहे. या मूर्तीच्या आजूबाजूला गावकऱ्यांनी भक्तीभावानं अनेक गणेशप्रतिमा उभारल्या आहेत. सभामंडपाच्या खांबांवर अतिशय सुशोभित कलाकृती दिसतात.
भाद्रपद महिन्यात वातावरणात प्रसन्नता दरवळते. प्रत्येक हृदयात, प्रत्येक घरात एक आगळंवेगळं समाधान डोकावतं, कारण नकळत प्रत्येकाच्या ओठांवर अवचित प्रकटतो तो मंगल नामोच्चार - गणपती बाप्पा मोरया! गावागावांत सजलेले मंडप, रंगीबेरंगी देखावे, घरोघरी गंध-धुपांचा सुवास, ढोल-ताशांचा गजर, मोदकांचा गोडवा आणि आरतीच्या पारंपरिक स्वरांची माधुर्यगंगा हे सर्वकाही जणू एका अदृश्य धाग्यात गुंफलं जातं. संपूर्ण महाराष्ट्र भक्ती, आनंद व ऐक्याच्या रंगांत न्हाऊन निघतो.
गणपती म्हणजे केवळ विघ्नहर्ताच नव्हे, तर तो आहे बुद्धीचा अधिपती, कलेचा आश्रयदाता, आरंभाचा मंगलसूचक. संकटात मार्ग दाखवणारा, साधकाला जणू आपल्या मोठ्या सोंडेनं योग्य दिशेला वळवणारा देव. म्हणूनच या उत्सवाचा चैतन्यस्पर्श डोळ्यांत पाणी आणतो, हृदयात कृतज्ञतेची उमाळी निर्माण करतो. टिळकांनी या उत्सवाला दिलेलं समाजजागृतीचं भान आजही आपल्या शहरा-गावातील उत्सवी वातावरणात जाणवतं.