स्नेहल बाकरे
गौरायांचं रूप खुलून दिसावं म्हणून गौरायांना सौभाग्यालंकारांनी, आभूषणांनी व वस्त्रप्रावरणांनी सजवलं जातं. त्यांच्यासमोर विविध खाद्यपदार्थांची आरास मांडली जाते. घरोघरी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांतून आनंदाची लयलूट केली जाते. पण तीन दिवसांनी मात्र त्यांना निरोप देताना लेकीची पाठवणी करताना कसं काळीज जड होतं ना, अगदी तसंच गहिवरून येतं, डोळ्यात हलकेच पाणी तरळतं. पण मग बापाच्या आरतीमध्ये मन पुन्हा हरखून जातं.
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
आकार तो ब्रह्मा
ऊकार तो विष्णू
मकार महेश...
असं संत तुकारामांनी गणपतीच्या स्वरूपाचं वर्णन केलं आहे.
श्रावण संपता संपता शूर्पकर्ण, गजमुख, तुंदिलतनू, चतुर्भुज, पाशांकुश धारी, मूषकारूढ असणाऱ्या बाप्पाच्या आगमनाची आपल्या सर्वांना उत्सुकता लागते. गणपती हे भक्ती, शक्ती आणि कृपेचं प्रतीक आहे. काही दिवसांसाठी येणारा हा बाप्पा सगळं वातावरण मंगलमय करतो. विघ्नहर्त्या बाप्पानं आपलं आयुष्य ज्ञानानं व सुखानं भरून टाकावं म्हणून प्रत्येकजण त्याला आपापल्या परीनं प्रसन्न करण्यासाठी खास तयार करू लागतो.