मंगला गांधी
नाचणीचे मोदक
वाढप
९ ते १० मोदक
साहित्य
सारणासाठी : एक वाटी नारळाचा चव, अर्धी वाटी चिरलेला गूळ,
१ टीस्पून साजूक तूप, १ चमचा खसखस, १ टीस्पून वेलची पूड.
आवरणासाठी : एक वाटी नाचणीचे पीठ, १ वाटी पाणी, चिमूटभर मीठ, १ चमचा साजूक तूप, पाव चमचा पिठीसाखर.
कृती
सर्वप्रथम पॅनमध्ये एक चमचा तूप घालावे. तूप वितळल्यावर खसखस घालावी. खसखस तडतडल्यावर नारळाचा चव घालावा व थोडा परतावा. नंतर गूळ घालून मिश्रण मोकळे होईपर्यंत परतावे. तयार झालेले सारण ताटलीत काढून थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर सारणात वेलची पूड घालावी. आवरण करण्यासाठी एका भांड्यात एक वाटी पाणी उकळायला ठेवावे. पाणी उकळल्यावर गॅस मंद करून चाळलेले नाचणीचे पीठ घालावे व चांगले मिसळावे. झाकण ठेवून गॅस बंद करावा. दहा मिनिटांनी हे पीठ परातीत काढून मळावे. पिठाच्या गोळ्याचे छोटे गोळे करावेत. प्रत्येक छोट्या गोळ्याची वाटी करावी व कडांना जवळजवळ कळ्या पाडाव्यात. त्या वाटीत सारण भरावे व मोदकाचा वरचा भाग टोकदार करून बंद करावा. वर येणारे जास्तीचे पीठ काढून टाकावे. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करावेत. नंतर मोदकपात्रातून १० ते १५ मिनिटे मोदक वाफवून घ्यावेत.
टीप : प्रत्येक मोदक आधी पाण्यात बुडवून वाफवायला ठेवू शकता, यामुळे मोदक फुटत नाहीत.