कुंड्या, वाफे भरताना...

कुंड्या आणि वाफे भरण्याचे तंत्र एकदा समजून घेतले की त्यानंतरचे लागवडीचे काम अधिक सोपे होईल. यासाठी पावसाळा हा सर्वोत्तम काळ आहे.
plants
plantssakal

आशा उगांवकर

परसबागेची तयारी कशी करावी, बागेसाठी झाडांची निवड करण्यासाठी कोणते निकष वापरावेत हे आपण मागील लेखांत पाहिले. आता आपण कुंड्या आणि वाफे कसे भरावे याकडे वळणार आहोत.

पावसाळा दाराशी खुणावत असताना रोपांची नव्याने लागवड करणे आणि नैमित्तिक कामे उरकणे अगत्याचे असते. कुंड्या आणि वाफे भरण्याचे तंत्र एकदा समजून घेतले की त्यानंतरचे लागवडीचे काम अधिक सोपे होईल. यासाठी पावसाळा हा सर्वोत्तम काळ आहे. ऋतुमानानुसार आपल्याकडील पद्धती विकसित होऊन स्थिरावल्या आहेत.

परसबाग आपल्याला समाधान आणि निर्मितीचा आनंद देते. पण परसबागेचे तंत्र गणिती पद्धतीने चालत नसून त्यामध्ये अनेक गुंतागुंतीचे विषय सामावलेले आहेत. हाताशी असणारे साहित्य, संशोधन, आडाखे, नवनवे प्रयोग आणि लहरी निसर्ग यांचा मेळ घालत आपल्याला पुढे जायचे आहे.

निसर्ग एका दाण्यापासून हजार दाणे तयार करण्याइतका सक्षम आहे. आपल्याकडे उन्हाची रेलचेल आहे. त्यामुळे कीड नियंत्रणाचे काम सोपे होते. आपल्याला सुवासिक फुले मिळतात आणि पाश्चात्त्य देशांप्रमाणे केवळ त्यांच्या रंगरूपांवर समाधान मानावे लागत नाही.

काही पथ्ये पाळल्यास आणि विचारपूर्वक काम केल्यास यश नक्की मिळते. सर्वसमावेशक परसबाग करताना प्रत्येक झाडासाठी वेगळे तंत्र वापरणे शक्य नसते, त्यामुळे सरधोपट मार्ग अवलंबावा लागतो.

गच्चीवरील वाफे भरण्याची पद्धत आणि कुंड्या भरण्याची पद्धत सारखीच आहे. हँगिंग बास्केट, व्हर्टिकल गार्डन, पाणवनस्पती, कॅक्टस, सक्युलंट, ऑर्किड यांचे तंत्र काहीसे वेगळे आहे. हायड्रोपोनिक्स हे नवे तंत्रज्ञानही आता वापरले जात आहे.

गच्चीवरील वाफे अनेक प्रकारे करता येतात. तळाला प्लॅस्टिक शीट अंथरून त्यावर विटांचे थर रचून वाफे करू शकता. पक्के बांधकाम न करता आपला हेतू साध्य करता येतो. जुने टायर एकावर एक ठेवूनदेखील उंच वाफे करता येतात. भाज्यांच्या जुन्या क्रेटना शेडनेटचे अस्तर लावून त्यांचा उपयोग करता येतो.

लहान, मोठे ड्रम वापरूनही लागवड करता येते. योग्य त्या उंचीचे ओटे बांधून अगर स्टँड करून त्यावर नव्याने बाजारात आलेले एचडीपीईचे तयार वाफे ठेवणे असाही पर्याय निवडता येतो. हँगिंग बास्केट, जुन्या बाटल्या टांगून उभी जागा वापरता येते. टब वापरून पाणवनस्पतीही लावता येतात. परसबागेत जमिनीवरील वाफे करणे तुलनेने सोपे असते.

कुंडी अगर वाफे भरताना...

बारा ते चौदा इंच उंचीची कुंडी पुढीलप्रमाणे भरावी. कुंडीच्या तळाशी असलेले भोक मोकळे करून त्यावर खापराचे तुकडे अगर नारळाच्या करवंट्यांचे तुकडे ठेवावेत. ही व्यवस्था जास्तीचे पाणी वाहून जावे परंतु खत, माती वाहून जाऊ नये व हवा खेळती राहावी यासाठी उपयोगी ठरते.

त्यावर नारळाच्या शेंड्या मोकळ्या करून पसराव्यात. शेंड्यांचा टणक भाग वापरल्यास गोगलगायींचा उपद्रव होत असल्यामुळे यांच्या वापरावर मर्यादा येत आहेत. त्यावर भरपूर पालापाचोळा चुरडून व दाबून घालावा.

कुंडीची साधारण अर्धी उंची भरली की त्यावर खालीलप्रमाणे खत-मातीचे मिश्रण घालावे. माती चिकट होऊ नये, पाण्याचा निचरा व्हावा, योग्य ओलावा टिकून राहावा, रोपांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये मिळावीत अशा कळीच्या मुद्द्यांना तोंड देण्यासाठी खालील प्रमाण वापरतात.

खत-माती मिश्रणाचे प्रमाण ः मिश्रणामध्ये ३० टक्के माती आणि इतर सर्व जिन्नस मिळून ७० टक्के असे साधारण प्रमाण असावे. शेणखत, कंपोस्ट, कडुनिंबाची पेंड व कोकोपीट प्रत्येकी ओंजळभर आणि दोन चमचे स्टेरामिल, मूठभर राख व वाळू असे मिश्रण तयार करून कुंडी भरावी.

लाकडाच्या कोळशाची खरदेखील मूठभर वापरू शकता. कुंडीचा वरून तीन इंच भाग मोकळा ठेवावा, म्हणजे पाणी घालताना माती बाहेर येणार नाही. यथावकाश पालापाचोळा खाली बसल्यावर वरून आवश्यक तेवढी खत-मातीची भर घालावी. हे प्रमाण कमी जास्त झाले तरी चालते. एखादा जिन्नस मिळाला नाही तरी चालेल.

परंतु प्रत्येकाचे महत्त्व आहे हे मात्र नक्की! जसे शेणखत हिरव्या वाढीसाठी, कोकोपीट ओलाव्यासाठी आणि कंपोस्ट, स्टेरामील विविध पोषक घटकांचा पुरवठा करण्यासाठी महत्त्वाचे असते. कडुनिंबाची पेंड खत आणि कीटकनाशक असे दुहेरी काम करत असल्यामुळे तिचा वापर अनिवार्य आहे.

गच्चीवर फळझाडांची रोपे लावण्याकरिता मोठे ड्रम अगर उंच वाफे करावेत. ड्रमला वरपर्यंत लहान आकाराची जास्त भोके पाडावीत. ते वर दिलेल्या पद्धतीने भरावेत. गच्चीवर केळी लावण्यासाठी सुरुवातीला चार विटांच्या उंचीचा वाफा करावा व केळीच्या वाढीनुसार त्याची उंची वाढवावी.

जमिनीवरील वाफे याच प्रकारे भरावेत. खड्ड्यातील मातीची गुणवत्ता खराब असल्यास त्यामध्ये चांगली माती आणि अधिक जैवभार घालावा. नीमपेंड, राख यांचे प्रमाण वाढवावे.आल्याची लागवड करण्यासाठी माती अधिक मोकळी राहणे जरुरीचे असते. यासाठी विटांचा चुरा जास्त घालावा. पाणी साठल्यास मूळ कुजते.

कॅक्टस आणि सक्युलंट यांना पाणी कमी लागते म्हणून यासाठीच्या कुंड्या भरतानादेखील विटांचा चुरा जास्त वापरावा. शोभेसाठी वरून दगड, गोटे, मार्बलचे तुकडे इत्यादी ठेवल्यास त्यांची शोभा वाढते.

जमिनीवर अगर गच्चीवर कुंड्या अगर ड्रम ठेवताना त्याखाली विटा ठेवाव्यात. त्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते आणि कुंडीखाली माती साठून त्यामध्ये होणाऱ्या मुंग्या, गोगलगायी इत्यादींचा उपद्रव टाळता येतो.

हँगिंग बास्केट भरण्यासाठी वेगळे तंत्र वापरावे. हँगिंग बास्केट वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात. जाळीच्या बास्केट असल्यास तळाला शेडनेट अगर तरटाचा तुकडा घालावा म्हणजे खत-माती वाहून जाणार नाही. प्लॅस्टिकच्या हँगिंग बास्केट तकलादू असतात. हँगिंग अधिक हलके होणे गरजेचे आहे. त्यासाठी अत्यल्प माती; आणि पालापाचोळा, कोकोपीट, खते यांचे प्रमाण अधिक असे मिश्रण घ्यावे. हँगिंग बास्केट काठोकाठ भरू नयेत.

पाणवनस्पती

हे परसबागेतील आणखी एक वेगळे दालन आहे. परसबागेचा एखादा कोपरा कमळे, कमलिनी आणि पाणवनस्पती लावून सुशोभित करता येतो. फुलापानांची शोभा आणि भोवतीचे पाणी यामुळे एका आगळ्यावेगळ्या निसर्गाची अनुभूती घेता येते.

मात्र त्यासाठी वेगळी पद्धत वापरली जाते. पाण्यातील डासांना गट्टम करण्यासाठी टबामध्ये गप्पी मासे सोडावेत. त्यांच्या पाण्यातील रंगीबेरंगी विहारामुळे आपल्याला दृष्टीसुखाचाही अनुभव घेता येतो.

पाणवनस्पती लावण्यासाठी मर्यादित खोली असणारे पसरट टब वापरतात. फायबर ग्लासचे, सिरॅमिकचे अगर प्लॅस्टिकचे प्लान्टर उपलब्ध आहेत. विटा आणि प्लॅस्टिकचा वापर करूनदेखील वाफे तयार करता येतात.

तळाशी थोडीशी माती, माफक सेंद्रिय खते, पाच ते सहा तास ऊन आणि शुद्ध पाणी ही त्यांची गरज आहे. मूठभर कोळशाची खर वापरल्यास फायदा होतो. टबमध्ये पाणी काठोकाठ भरू नये. पाण्यातील शेवाळे, कुजलेली पाने वेळोवेळी काढून टाकून पाणी स्वच्छ ठेवावे. कालांतराने पूर्ण पाणी बदलावे अगर आठपंधरा दिवसांनी थोडे थोडे ताजे पाणी मिसळत राहावे.

व्हर्टिकल गार्डन : या पद्धतीमध्ये उभी रचना केली जाते. त्यासाठी योग्य असे प्लॅस्टिकचे स्टँड मिळतात. त्यामध्ये काढ-घाल करता येतील अशी लहान कप्पेवजा रचना असते. कप्पे भरण्यासाठी कोकोपीट, माफक माती व खते वापरावीत. लहान आकारामुळे लागवडीस मर्यादा येते, त्यामुळे त्यामध्ये शोभेच्या लहान वनस्पती लावाव्यात. परसबागेत यामध्ये पालक, सॅलड अशी लागवड करून जागेच्या कमतरतेवर मात करता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com