

Prakrit literature of Maharashtra
esakal
डॉ. नागनाथ बळते
गाथासप्तशती आणि सेतुबंध या दोन्ही ग्रंथांमधून प्राकृत भाषेचे सौंदर्य, काव्यवैभव आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा स्पष्ट होते. त्यामुळे हे ग्रंथ साहित्याबरोबरच इतिहास, समाजजीवन आणि भाषाविकासाच्या अभ्यासासाठीही अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
महाराष्ट्राच्या प्राचीन साहित्य परंपरेत गाथासप्तशती आणि सेतुबंध या ग्रंथांना महत्त्वाचे स्थान आहे. हे दोन्ही ग्रंथ महाराष्ट्री प्राकृत भाषेतील उत्कृष्ट साहित्यनिर्मिती मानले जातात. सातवाहन आणि वाकाटक काळातील सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवनाचे दर्शन या ग्रंथांतून घडते. त्यामुळे हे ग्रंथ केवळ साहित्यिक नव्हे, तर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे मानले जातात.
महाराष्ट्री, पैशाची, मागधी आणि शौरसेनी अशा चार प्राकृत भाषा असल्याचे उपलब्ध संदर्भावरून दिसून येते. शौरसेनी म्हणजेच सूरसेनी होय. पिशाची म्हणजे पैशाची भाषा मानले जाते. सूरसेनी भाषेत स्वतंत्र स्वरूपाचे ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. पिशाची भाषेत बृहत्कथा हा महत्त्वाचा ग्रंथ रचला गेला होता. पुढे त्याच ग्रंथाच्या आधारे संस्कृत भाषेत बृहत्कथेची निर्मिती झाली आणि तीच आज प्रसिद्ध आहे; परंतु मूळ पिशाची भाषेतील ग्रंथ मात्र उपलब्ध नाही. सुमारे साडेबावीसशे वर्षांपूर्वी पैठण येथे शालिवाहन कुळातील एका चक्रवर्ती राजाच्या दरबारात गुणाढ्य नावाचा विद्वान मंत्री होता. त्याने ही बृहत्कथा पिशाची भाषेत लिहिल्याचे मानले जाते.