

Gen Z’s Changing Money Mindset
esakal
मधुरा डोंगरे
जेन-झीसाठी गुंतवणूक म्हणजे फक्त पैशातून पैसा निर्माण करणे नाही, तर भविष्यातील पर्याय निर्माण करणे. केवळ पैसा कमावण्यापेक्षा मानसिक स्वास्थ्य आणि लवचिक काम करण्याचे स्वातंत्र्य असणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य होय. थोडक्यात जेन-झीसाठी आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे स्वयंपूर्ण होणे, आवडते काम करण्यावर भर देणे, नावडती गोष्ट करण्याला स्पष्ट नकार देता येणे आणि मनात आलेली गोष्ट त्याचवेळी करता येणे हे आहे.
‘‘अगं बघितलंस का, माझ्या मैत्रिणीची मुलगी युरोप सहलीला गेली आहे. पंचविशीची आहे ती. आम्ही तिच्याएवढे होतो, तेव्हा आम्ही असा विचारसुद्धा केला नव्हता!’’ माझी आई म्हणाली. मग मी विचार करू लागले, आताच्या तरुणाईकडे परदेश प्रवास करण्यासाठी एवढे पैसे कसे असतात? मला दिसलेली याची मुख्य कारणे ती अशी - रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक न करण्याकडे वाढणारा कल, वाढता व्यक्तिवाद, नोकऱ्यांमधील अस्थिरता, बदलती कुटुंबव्यवस्था आणि गुंतवणुकीचे नवे मार्ग ही आहेत. पूर्वीची पिढी मुलांचे शिक्षण, पालकांचे आजारपण, घर घेणे या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास प्राधान्य देत असे. त्यानंतर, म्हणजे साधारण निवृत्तीनंतर हातात पैसा आला, की मग मोठमोठ्या सहलींना जात असे आणि स्वतःच्या मनासारखे खर्च करत असे. परंतु सध्या नोकऱ्यांची शाश्वती नाही, आज मिळत आहे तेवढा पैसा उद्याही मिळत राहीलच असेही नाही. त्यामुळे हाती आलेला पैसा आवडत्या गोष्टींवर लगेच खर्च करण्याची प्रवृत्ती वाढत आहे, असे मला वाटते.