

Gen Z Lifestyle
esakal
शंतनु वेल्हाळ
जेन-झीला ‘सेटल कधी होणार?’ हा प्रश्न आवडत नाही. कारण त्यांच्या मते सेटल होणं ही एखाद्या ठरावीक कालमर्यादेत घडणारी घटना नाही, ती सतत बदलणारी अवस्था आहे. आपण जे आयुष्य जगतोय, ते आपल्याला मनापासून मान्य आहे का? हा प्रश्न त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे.
‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’, असं संतवाङ्मय आपल्याला शिकवतं. पण जेन-झीला हा विचार सांगितला, तर कदाचित त्यांचा पुढचा प्रश्न असेल, ‘पण का राहावं तसंच? परिस्थिती बदलत असेल, तर आपणही बदलायला नको का?’
हीच कदाचित जेन-झीची सर्वात ठळक ओळख आहे, प्रश्न विचारण्याची वृत्ती! परंपरा मान्य करण्याआधी तिचं प्रयोजन तपासणं आणि एखादी गोष्ट फक्त ‘सगळे करतायत’ म्हणून न स्वीकारणं. भारतीय जेन-झी म्हणजे केवळ मोबाईल, सोशल मीडिया, रील्स आणि इंटरनेटच्या वेगात वाढलेली पिढी नाही. ही अशी पिढी आहे जिनं एका बाजूला पालकांची स्थिर नोकरी, स्वतःचं घर, लग्न आणि मुलंबाळं अशी जीवनाची चौकट पाहिली; आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक मंदी, महासाथ, नोकरीतली अस्थिरता, महागाई, तंत्रज्ञानातली उलथापालथ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा झपाट्यानं वाढणारा वापर अनुभवला. त्यामुळे त्यांच्या डोक्यातली ‘सेटल्ड लाइफ’ची व्याख्याच बदलली आहे. पूर्वी स्थैर्य म्हणजे कायमस्वरूपी नोकरी. आज स्थैर्य म्हणजे कौशल्यं, आर्थिक स्वावलंबन, मानसिक शांतता आणि परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता. इथूनच जेन-झीच्या नात्यांची, विवाहाची आणि करिअरची कथा सुरू होते.