Generation Z
Esakal
रोहन नामजोशी
जेन झी आता समाजाचा एक व्यापक भाग झाले आहेत आणि पुढच्या काळात हे प्रमाण अर्थातच वाढणार आहे. त्यांच्या चांगल्या-वाईट गोष्टींशी जुळवून घेणं हे आधीच्या पिढ्यांना करावंच लागणार आहे (इथे ‘च’ महत्त्वाचा आहे). कारण त्यांच्याविषयी कितीही नाकं मुरडली तरी त्यांच्यातही काही सजग नागरिकसुद्धा आहेतच. त्यांना चांगल्या-वाईटाची जाण आहे. त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणं, त्यांच्याशी एकरूप होणं महत्त्वाचं आहे. विशेषत : ‘बूमर्स’ मंडळींसाठी तर ही काळाची गरज आहे.
एकदा मी आणि माझे दोन मिलेनियल सहकारी ऑफिसमध्ये आलो. शिफ्ट सुरू होऊन पाच-दहा मिनिटंच झाली असतील, गेमिंग झोनमध्ये तीन-चार जेन झी त्वेषानं गेम्स खेळत होते. आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्ही पटकन लॉग-इन करून चटकन काम सुरू करण्याच्या बेतात होतो. त्यानंतर लॉग-इन वगैरे करून नाश्ता करण्यासाठी म्हणून निघालो, तरी ही मंडळी तिथंच! आम्हा तिघांच्या कपाळावर आठ्या पडल्या. हे कसं काय जमू शकतं बुवा असा विचार आला.
एकदा ऑफिसमध्ये एक इव्हेंट होता. समोर कोणीतरी बोलायला लागल्याबरोबर जेन झी कार्यकर्त्यांनी कॅमेरे काढले. सराईतपणे क्लिप्स घेतल्या, फोटो काढले आणि पापणी लवते न लवते तोच ते फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर आलेदेखील होते! सोमवारी सकाळी ऑफिस सुरू होण्याच्या काही मिनिटं आधी सिक लीव्हच्या मेसेजेसचा पाऊस तर नेहमीचाच आहे. बरं त्यातही परवानगी नाहीच. थेट सांगणं, आज येणार नाही. हे आणि असे अनेक प्रसंग रोज घडतात आणि लक्षात येतं, की आपलं ‘जेनझीकरण’ होण्याची खूप गरज आहे आणि त्यासाठी मेंदूचं वायरिंग बदलणं अतिशय गरजेचं आहे. ते जेन झीला समजून घेण्यापेक्षा कठीण आहे.