

Gen Z Behavioral Traits
esakal
जानेवारी २०२५ उजाडलं तेव्हा एका नवीन पिढीची सुरुवात झाली, ‘जनरेशन बीटा’. धाकटं बाळ जन्माला आलं की पहिलं मूल जसं उगाचच मोठं झाल्यासारखं वाटतं, तशी आता जेन-झी जराशी जुनी, प्रौढ वाटायला लागेल. पण खरंतर ही मुलं तशी लहानच, म्हणजे साधारण तेरा ते अठ्ठावीस वर्षांची आहेत! पंधरा वर्षांच्या या कालखंडात बदल मात्र अफाट झाले आहेत. या वयातल्या काहींनी मागचं सहस्रक ओलांडलं आहे, y2kचं स्थित्यंतर अनुभवलंय. बोटांनी फिरवायच्या संथ फोनपासून शाब्दिक आज्ञा पाळणाऱ्या आणि आपल्या चिमुकल्या कुडीत विश्व सामावून घेणाऱ्या आधुनिक फोनपर्यंतचं थक्क करणारं वेगवान तंत्रज्ञान विकसित होताना पाहिलंय. संदर्भासाठी आणि माहितीसाठी लायब्ररीत पुस्तकंही धुंडाळली आहेत आणि आता नुसत्या मौखिक आज्ञेनुसार ‘जी हुजूर’ म्हणून तयार असलेला, सल्ल्यापासून माहितीपर्यंत काहीही चुटकीसारशी हजर करणारा कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीय दासही ते अनुभवत आहेत.
दळणवळणाचा हा पट स्थानिक ते वैश्विक असा विस्तारत गेलेला आहे! आपल्या मेंदूला सवय आहे हळूहळू विकसित होण्याची. एकेका छोट्या बदलाला सामावून घ्यायला तो काहीशे वर्षं घेतो. अचानक काही दशकांमध्ये होणारे मोठे बदल स्वीकारायचे आणि त्यांच्याशी जुळवून घ्यायचं हे आपल्या शरीर आणि मेंदूसाठी खूप आव्हानात्मक आहे. जरी वरवर आपण या बदलांना सहजपणे हाताळत आहोत असं दिसलं, तरी त्याचे काही सद्यपरिणाम आपण पाहतो आहोत. दूरगामी परिणाम काय होतील हे काळच सांगेल. दैनंदिन शारीरिक, मानसिक कामांसाठी मेंदूचा, अवयवांचा, स्नायूंचा, पंचेंद्रियांचा जो वापर व्हायचा, त्यात बदल झाला आहे. अगदी साधं कॅलक्युलेटरचं उदाहरण घेऊ. किती सहजपणे आपण मनातल्या मनात हिशोब करणं बंद केलं! मग शाळेत अभ्यास करत असताना दोन गोष्टी व्हायला लागल्या - एक म्हणजे मुलांना वाटायला लागलं कशाला उगीच पाढे पाठ करायचे? काही गरजच नाही. हाच वेळ आपण दुसऱ्या कुठल्यातरी चांगल्या गोष्टीसाठी वापरू. आणि अशा करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेतही - वेगवेगळी कौशल्यं शिकणं, मैदानावर खेळणं, अगदी घरात मदत करणं, गप्पा मारणं अशांसारख्यासुद्धा. कारण काही असो, पण ते पर्याय मुलांना पुरेसे उपलब्ध झाले नाहीत. मग त्या अतिरिक्त वेळात स्क्रीनचा वापर आवाक्याबाहेर गेला. म्हणजे वाटत होतं तसा मेंदूचा विधायक वापर झाला नाही. दुसरं म्हणजे पाढे पाठ करताना इतर बरेच गुण विकसित व्हायचे. एकाग्रता, स्मरणशक्ती, एकाजागी शांतपणे बसणं, मेंदूचा व्यायाम, समयसूचकता आणि माइंडफुल, क्षणस्थ राहता येणं. आता पाढे पाठ करणं हे जरी शाळेत सक्तीचं केलं, तरी मुलं ते अत्यंत मनाविरुद्ध आणि कशीबशी करतात असं दिसून येतं. म्हणजे ही कौशल्यं आत्मसात करण्याची संधी हातची निसटली. नवीन पिढीच्या अनेक वर्तनसमस्या आणि मानसिक अनारोग्य यांचा उगम या गुणांच्या अभावामध्ये असल्याचं आढळून आलंय.