Premium|Gertrude Bell Biography : पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान देणारी गर्ट्रुड बेल आणि अरबस्तानातील तिची धाडसी मोहीम

Gertrude Bell Arabian Desert : ब्रिटिश साम्राज्याची समर्थक असूनही पुरुषप्रधान राजकारणात प्रभाव निर्माण करणारी गर्ट्रुड बेल, तिचा १९१४ मधील हाइलचा धाडसी प्रवास आणि अरबस्तानातील राजकीय घडामोडी
Gertrude Bell Arabian Desert

Gertrude Bell Arabian Desert

esakal

Updated on: 

मधुरा खिरे

इतिहासाच्या पानात गर्ट्रुड बेल हे एक अत्यंत गुंतागुंतीचं, वादग्रस्त आणि तितकंच विस्मयकारक व्यक्तिमत्त्व म्हणून नोंदवलं गेलं आहे. आधुनिक इतिहासकार तिच्या भूमिकेकडे अत्यंत सूक्ष्मपणे आणि चिकित्सक नजरेनं पाहतात. एकीकडे, पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान देत जागतिक राजकारणावर आपला प्रभाव पडणारी गर्ट्रुड व्हिक्टोरियन काळातील स्त्रीवादाचं प्रतीक होती. परंतु, दुसरीकडे ती ब्रिटिश साम्राज्याची एक कट्टर समर्थक आणि निष्ठावान अधिकारीही होती.

सन १९१४. कडाक्याच्या थंडीचा काळ. भोवताली पसरलेलं अथांग, रखरखीत अरबस्तानचं वाळवंट आणि त्या वाळवंटात वसलेलं हाइल हे अत्यंत दुर्गम आणि तितकंच धोकादायक शहर. अल रशीद राजघराण्याचा कडक अंमल असलेल्या या शहरात गेल्या दोन दशकांत एकाही पाश्चात्त्य व्यक्तीनं पाऊल ठेवण्याची हिंमत केली नव्हती. अशा या मृत्यूच्या छायेत एका ब्रिटिश महिलेनं उंटावर स्वार होऊन धाडसानं प्रवेश केला. पण अपेक्षेप्रमाणे तिचं स्वागत झालं नाही. हाइलच्या सत्ताधीशांनी तिला थेट एका महालात नजरकैदेत टाकलं. पुढचे अकरा दिवस अत्यंत तणावाचे होते. महालाच्या बाहेर बंदुकधारी पहारेकरी आणि अंगरक्षक तैनात होते. ही स्त्री एक ब्रिटिश गुप्तहेर आहे की फक्त भटकंती करणारी एक वेडी आहे, यावर शहराच्या राज्यकर्त्यांमध्ये खल सुरू होता. तिची एक चुकीची हालचाल तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकत होती. पण अशाही परिस्थितीत ती घाबरली नाही. जिथं पुरुष अधिकारी जाण्यास कचरत, तिथं या ‘मरुभूमीच्या राणी’नं वेगळीच खेळी खेळली. नजरकैदेत असतानाच तिनं तिथल्या जनानखान्यातील महिलांशी मैत्री केली. त्यांच्यासोबत अरेबिक कॉफीचे घोट घेत तिथल्या टोळ्यांमधील अंतर्गत वाद आणि राजकीय समीकरणांची गुपितं जाणून घेतली. आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या आणि अरबी भाषेवरील प्रभुत्वाच्या जोरावर तिनं अमिरच्या काकांचं मन जिंकलं आणि स्वतःची सुटका करून घेतली. ती तिथून बाहेर पडली, ती आपल्या डायरीत वाळवंटाचे नकाशे आणि भविष्यातील राजकारणाची हुकमी सूत्रं घेऊनच!

Loading content, please wait...