
डॉ. विजय पांढरीपांडे
नवे वर्ष सुरू झाले की आपण भिंतीवरचे कॅलेंडर बदलतो. आता त्याबरोबरच स्वतःलाही बदलण्याची वेळ आली आहे. आपण शांतपणे आपल्या वाईट सवयींची यादी केली, तर आपल्यालाच थक्क व्हायला होईल!
आपला कितीतरी वेळ आजकाल मोबाईलवर जातो. सोशल मीडिया सर्च हा एक नवा रोग प्रत्येकाला लागला आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण कितीतरी वेळ सोशल मीडियावर वाया घालवतात.
त्यातून हाताला लागणारी काही माहिती निश्चितच ज्ञानात भर घालणारी असते, मनोरंजन करणारी असते, नव्या जगाची ओळख करून देणारी असते; पण त्यापायी आपण आपली मूळ कर्तव्ये विसरत चाललो आहोत असे जाणवते.
दुसऱ्यांनी बदलावे, अवतीभवतीचे जग बदलावे असे आपल्याला वाटत असेल तर सुरुवात स्वतःपासून केलेली बरी. आपण बदललो, आपले आचारविचार बदलले, की अवतीभवतीचे जगदेखील आपोआप बदलेल.