विलायती वाचताना: डॉ. आशुतोष जावडेकर
इंग्रजी व्याकरण, भाषा आणि साहित्य यांचा सांधा कसा आहे, काय खुब्या त्यात आहेत, वाचक म्हणून आपण कुठल्या गोष्टी बारकाईने बघितल्या पाहिजेत याविषयी थोडंसं. जो वाचक व्याकरणाविषयी सजग असतो त्याला वाचनाचा अधिक आनंद मिळतो हे नक्की. बदलत्या शतकांमध्ये अनेक उत्तम लेखक-कवींच्या साक्षीने इंग्रजीसारख्या जुन्यापान्या भाषेने व्याकरणाला आणि व्याकरणाने शिस्तीने इंग्रजीला कसं सावरून धरलं आहे, कसं एकमेकांना श्रीमंत केलं आहे हे बघणंदेखील किती आनंदाचं! विलायती आनंद म्हणूया हवं तर!
व्याकरण आणि भाषा यांचं नातं मजेशीर असतं. व्याकरण म्हणजे शिस्त, घट्ट चौकट आणि नेमकेपणा. आणि भाषा? ती तर नदीसारखी प्रवाही, विस्तारत जाणारी आणि मुख्य म्हणजे प्रत्येक घाटापाशी वळताना बदलणारी गोष्ट असते. पण तरी व्याकरण आणि भाषा विरुद्ध स्वभावाची सख्खी भावंडं असावीत अशी असतात! इंग्रजी तर फार मोठी भाषा. तिचं व्याकरण काळानुसार कसं बदलत गेलं याचा अभ्यास करायला जन्म लागावा!