GST and Diwali Shopping
Esakal
संपादकीय
दिवाळी झाली आणि लोक आता दिवाळीच्या सुट्या संपवून कामावर रुजू व्हायला लागलेत. दिवाळीच्या उत्साहपर्वाचा अजून प्रत्येकाच्या मनावर चांगलाच पगडा आहे. यावेळच्या दिवाळीच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘जीएसटी’च्या कपातीचा झालेला परिणाम. केंद्र सरकारने दिवाळीच्या आधी काही दिवस (२२ सप्टेंबर) जीएसटी अर्थातच ‘वस्तू व सेवा करा’त मोठी कपात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कपातीनंतर केलेल्या आवाहनामध्ये हा उत्सव ‘खरेदीचा उत्सव’ ठरावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांची अपेक्षा सर्वार्थाने अगदी खरी झाली, भारतीयांनी यावेळी सणावेळी केल्या जाणाऱ्या खरेदीला अधिक उत्साहाने प्राधान्य दिले.
खरेदीच्या या लाटेने खरोखरच देशातील बाजारपेठेला चालना मिळाली. आजपर्यंत जाहीर झालेल्या विविध संस्थांचा आकडेवारीनुसार, अगदी ट्रॅक्टरपासून किरकोळ किमतीच्या वेफर्सच्या छोट्या पाकिटापर्यंत व्हाया सोनेखरेदीच्या बाबीपासून सगळीकडे हा परिणाम जाणवला. गेल्या अनेक वर्षांत झाली नव्हती तेवढी ट्रॅक्टरची खरेदी या दिवाळीच्या आधी झाली. बळीराजा खरेतर यावेळी अतिपावसाच्या संकटाने तसा अडचणीत आहे, पण त्यानेही खरेदीची उभारी धरली.