भूषण महाजन
दिवाळीपर्यंत किंवा त्याआधी जीएसटी कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यात कायद्याचे सुलभीकरण व दोन दरात आकारणी असू शकेल. वित्त निवेशक ५ व १८ टक्के दराची अपेक्षा करीत आहेत. दुचाकी वाहनांवर असलेला २८ टक्के जीएसटी जाचकच आहे. किमान १०० सीसी व त्याखालील वाहनांवर १८ टक्के कर लागू झाल्यास नक्कीच वाहनांची मागणी सुधारेल.
गेल्या सप्ताहात (ता. ११ ते १४ ऑगस्ट) प्रथमच शेअर बाजाराने सकारात्मक संकेत दिले. २७ जून २०२५ रोजी २५६५४ अंशाला निफ्टीने स्पर्श केला आणि नवा उच्चांक करते की काय अशी शंका आणि हूल दिली. आम्ही सकाळ मनीच्या जुलै २०२५च्या अंकातील लेखात ‘शिखराच्या शेवटच्या टप्प्यातील आव्हाने’ ह्या मथळ्याखाली नवा उच्चांक शेअर बाजाराला सहजी जमणार नाही, असे भाकीत केले होते. दुर्दैवाने ते खरे होताना दिसते आहे.
मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून जी अखंड पडझड सुरू आहे, ती थांबल्यासारखे वाटते. परंतु, पूर्ण विश्वासाने सांगता येत नाही. कारण, अजूनही बाजार मंदीवाल्यांच्या कह्यात आहे. कदाचित थोडी उसळी घेऊन निफ्टी पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे करू शकते. निफ्टी २३५०० ते २४००० ह्या दरम्यान थांबेल, असा अंदाज आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा व मूल्यांकनाचा अंदाज घेत घेत स्थिर राहू शकते. तोपर्यंत तरी गुंतवणूकदारांना ह्या वादळवाटेनेच चालायचे आहे.