

The Changing Face of Mumbai
esakal
सौरभ सद्योजात
मुंबईत येऊन ठेपलेल्या जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीला आमची मुम्बईत उमटणारा श्वास जवळचा वाटू शकेल. रस्त्याच्या कडेला वाढणाऱ्या अनौरस पोरापासून ते दिग्गज दिग्दर्शकापर्यंत आणि पाण्यानं झोपडपट्टीचा श्वास कोंडला जाण्यापासून ते लॉकडाउनच्या भयावह पायपिटीपर्यंत कित्येक विषयांना हात घातलेला आहे.
यहाँ जीना भी जादू है -
यहाँ ख़्वाब भी टाँगों पे चलते हैं
उमंगें फूटती हैं, जिस तरह,
पानी में रक्खे मूँग के दाने
चटकते हैं तो जीभें उगने लगती हैं
यहाँ दिल ख़र्च हो जाते हैं अक्सर -
चकाकणारी आणि चकवा देणारी मुंबई. तिच्या उदरात स्वप्नांची बीजं पेरून माणसं कामाला लागतात आणि त्याचा महावृक्ष होईल, या आशेनं त्या स्वप्नाच्या भवताली आपली बस्तानं बसवतात. एकेक व्यक्ती म्हणजे एकेक स्वप्न आहे इथे. त्याचं म्हणून एक अस्वस्थ वर्तुळ आहे त्याच्या सभोवती. अशा जीवनाच्या आकृतिबंधाचं प्रतिबिंब, गुलजारांच्या वरील ओळींत लख्ख दिसून येतं. एखादं धटिंगण पोर अंगचटीला येतं तसा इथला समुद्र, निद्रानाशानं पछाडलेली मनं, दारिद्र्याच्या दर्पानं फणफणणारे फुटपाथ आणि श्रीमंतीच्या गर्वानं आकाश छेदणाऱ्या इमारती असं वैविध्य अंगावर वागवणारं शहर म्हणजे मुंबई! तिन्हीत्रिकाळ धडधडत राहणाऱ्या या शहराचं नवंकोरं आख्यान, आमची मुम्बई या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध कवी, गीतकार आणि साहित्यिक असणाऱ्या गुलजारांनी वाचकांसमक्ष आणलं आहे. या भल्याथोरल्या ग्रंथात ३६ कविता आणि २५ लघुकथा आहेत. यात स्वातंत्र्योत्तर कालखंडातली मुंबई, तिच्या बदलत गेलेल्या अवस्था आणि चेहरा गुलजारांनी अत्यंत तपशीलवार आणि संवेदनशीलपणे रेखाटल्याचा दिसून येतो.