Premium|Guntupalli Caves: गुंतुपल्ली लेणं; कातळात रुजलेली बौद्ध श्रद्धा
अमोघ वैद्य
इथला मोडकळीला आलेला मंडप आता फक्त चार तुटलेल्या खांबांनी ओळखला जातो. हा मंडप कधी काळी ५६×३४ फूट सभागृहाचा भाग होता. शिलालेखातून समजतं, की या सभागृहाला इ.स. पहिल्या ते पाचव्या शतकात दान मिळालं. या सभागृहाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला असलेली प्रवेशद्वारं प्राचीन काळी झालेल्या भिक्खूंच्या सभांचा इतिहास जपतात, जणू त्या काळाचे मूक साक्षीदार.
प्राचीन काळात माणूस नैसर्गिक गुहा आणि कातळातील आश्रयस्थानांमध्ये राहत असे. त्याकाळात बौद्ध भिक्खू वनवासासाठी जात असत. तेव्हा पावसाळ्यात प्रवास शक्य नसताना ते अशा गुहांची निवड करत असत. त्यांचं एकट्याचं किंवा समूहाचं साधं आणि आध्यात्मिक जीवन हे धार्मिक प्रार्थना आणि ध्यानात व्यतीत होत असे. त्यामुळे त्यांनी डोंगर, जंगल आणि नदीकाठासारख्या शांत ठिकाणांना प्राधान्य दिलं, जिथं त्यांना गजबजाटापासून दूर राहता येई.
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात कमवरपुकोटाजवळ जीलकर्रागुडेम गावापासून काही अंतरावर गुंतुपल्ली लेणं वसलेलं आहे. एलुरूपासून ४० किलोमीटर अंतरावर आणि राजमुंद्रीपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरव्या टेकड्या आणि घनदाट जंगलांनी नटलेल्या या डोंगरात प्राचीन बौद्ध स्मारक कातळात कोरलं गेलं आहे. इथं पोहोचताना रस्त्यात काही ठिकाणी खड्ड्यांमुळे अडथळे येतात, पण डोंगरांच्या सावलीतून आणि हिरव्या पर्णसंभारातून जाणारा मार्ग मनाला प्रसन्न करतो. या लेण्यापासून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आणि विमानतळ राजमुंद्री येथे आहे. तिथून या शांत स्थळापर्यंत सहज पोहोचता येतं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण जणू बौद्ध भिक्खूंनी निवडलेलं शांततेचं आश्रयस्थान आहे.