

Women's Cricket World Cup
esakal
भारतीय महिला क्रिकेटला बीसीसीआयने २००६मध्ये आपल्या छत्रछायेखाली घेतले आणि महिला क्रिकेटला संजीवनी लाभली. आता महिला जगज्जेत्या ठरल्यानंतर देशातील महिला क्रिकेटला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे हे नक्की.
ता. २ नोव्हेंबरला नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुमारे ४५ हजार क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने ऐतिहासिक अध्याय लिहिला गेला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय महिला प्रथमच जगज्जेत्या ठरल्या.
यापूर्वी दोन वेळा करंडक निसटला होता. २००५मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकतर्फीच हार पत्करावी लागली. २०१७मधील पराभव जिव्हारी लागणारा ठरला, कारण करंडक जिंकण्याची नामी संधी टीम इंडियाने गमावली. जगप्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर यजमान इंग्लंडविरुद्ध भारतीय महिलांना फक्त नऊ धावांनी नमते घ्यावे लागले. भारताची महान महिला क्रिकेटपटू मिताली राजचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने पुष्कळ बदल अनुभवले. मिताली निवृत्त झाली. मध्यफळीतील कणखर मनोवृत्तीची तडाखेबंद बॅटर हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व आले. प्रशिक्षकपदाचा संगीत खुर्ची खेळ संपला. विश्वकरंडकाची तयारी हेच लक्ष्य नजरेसमोर ठेवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेटमध्ये थोर ठरलेले फलंदाज अमोल मुजुमदार यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आणि ती परिपूर्णही ठरली. यावेळी घरच्या मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघ खेळणार होता, साहजिकच मोठा पाठिंबा अपेक्षित होता आणि झालेही तसेच.