
डॉ. अविनाश भोंडवे
करोनरी हार्ट रीडिसीजमुळे स्मृतिभ्रंश आणि संज्ञानात्मक कमजोरी होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. १० लाखांपेक्षा अधिक प्रौढ व्यक्तींच्या आरोग्य नोंदींचे शास्त्रीय पुनरावलोकन केलेल्या संशोधनात, करोनरी हार्ट रीडिसीज असलेल्या रुग्णांना, तो नसलेल्या लोकांच्या तुलनेत स्मृतिभ्रंश होण्याचा धोका २७ टक्क्यांपेक्षा जास्त असतो, असे आढळून आले.
प्रत्येक माणसाच्या शरीरात हृदय असते, ते कुठे असते? काय कार्य करते? त्याचे आजार काय असतात? वगैरे गोष्टी वैद्यकीय शास्त्राला माहिती आहेत. कारण एक्स-रे काढला तर हृदय दिसते, ईसीजीमध्ये त्याच्या कार्याची कल्पना येते, एको-कार्डिओग्रॅममध्ये त्याची रचना कळते. पण माणसाला जसे हृदय असते, तसेच मनही असते, असे आपण मानतो. काही लोक हृदयालाच मन समजतात. त्यामुळे कठोर मनाच्या माणसाला पाषाणहृदयी म्हटले जाते.
खरेतर माणसाचे हे मन नक्की कुठे असते? ते कसे असते? याबाबत एक्स-रे, ईसीजी, एकोसारखी कोणतीही प्रत्यक्ष चाचणी नसते. वैज्ञानिकांच्या मते मात्र मनाची बरीच कार्ये मेंदूच्या काही विशिष्ट भागात चालतात.
शरीरातील इतर अवयवांप्रमाणे मेंदूचे कार्य रक्तप्रवाह असेल, तर योग्य पद्धतीने चालते. मानसिक कार्ये मेंदूशी निगडित असल्याने माणसाच्या मनाचे आरोग्य मेंदूप्रमाणेच हृदयाच्या आरोग्याशी निगडित असते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.