- प्रतिनिधी
तारुण्यात हृदय म्हणजे काहीतरी तरल... रोमँटिक. आजच्या भवतालात मात्र हृदयाभोवतीच्या नाजूक, ललितकोमल भावविभोरतेला अगदी तरुण वयातही ‘हृदयविकाराचा झटका’ असा विपरीत अर्थ मिळतोय की काय अशी भीती दाटून येत असल्याचं कुठूनकुठून ऐकायला येत असतं. हृदयाला चालना न मिळणे; त्यामुळे अकाली कमी होणारी हृदयाची कार्यक्षमता आणि त्याची परिणती म्हणून उद्भवणारे हृदयविकार...
हृदय आणि फुप्फुसाचे नाते
बाळ आईच्या पोटात असताना दुसऱ्या महिन्यापासून बाळाचे हृदय धडधड करू लागते. आणि तिथून ती धडधड अव्याहत सुरू असते, शेवटच्या श्वासापर्यंत. आयुष्यभर कार्यरत असणारे हृदय विश्रांती घेते ते फक्त दोन ठोक्यांमधल्या काही क्षणांर्धांमध्ये. मग हृदयाच्या ठोक्यांचा वेग जितका जास्त तितका हृदयाच्या विश्रांतीचा कालावधी कमी.
प्राणवायूशिवाय हृदय क्षणभरदेखील राहू शकत नाही, कोणतेच काम करू शकत नाही. आपण जेव्हा नुसते शांत बसलेलो असतो तेव्हा आपल्या हृदयाचे मिनिटाला ७० ते ७२ ठोके पडतात. त्यावेळी फुप्फुसाकडून ३०० मिलिलिटर प्राणवायू रक्तात मिसळला जातो. आपण धावायला लागलो की हृदयाच्या ठोक्यांचा वेग मिनिटाला १८० ते २०० वेळा असा होतो. त्यावेळी फुप्फुस ३ हजार ते ६ हजार मिलिलिटर प्राणवायू रक्तात मिसळत असते.