मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त)
जगातील सर्वांत तरुण पर्वत म्हणून ख्याती असलेल्या उत्तुंग हिमालयात आपल्या देशाच्या उत्तर आणि ईशान्य सीमारेषा आहेत. आकाशाला भिडणाऱ्या हिमशिखरांचे अतिउंच सुळके, डोळे फिरवणाऱ्या खोलच खोल दऱ्या, कडाक्याच्या थंडीमुळे बहुतांश काळ बर्फाच्छादित असलेला हिमालय! या सीमांचे रक्षण करणे हे लष्करापुढील सर्वांत मोठे आव्हान. हे आव्हान पेलण्यासाठी पर्वतीय विभाग (माउंटन डिव्हिजन) स्थापन केला गेला. या पर्वतीय विभागाची यशोगाथा...
भारताच्या उत्तरेपासून ते ईशान्येपर्यंत पसरलेल्या हिमालय पर्वताच्या परिसरातच भारतीय लष्कराने आजवरची बहुतांश युद्धे लढली आहेत. स्वतंत्र भारतावर पहिले आक्रमण झाले ते याच हिमालयाच्या डोंगररांगांमध्ये.
चीनबरोबर ऑक्टोबर-नोव्हेंबर १९६२मध्ये झालेल्या युद्धाची रणभूमीदेखील हिमालयच होती आणि विसावे शतक संपताना पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली तीदेखील हिमालयातच. त्यामुळे बर्फाच्छादित, अतिउंच, खडतर अशा हिमालयाच्या पर्वतरांगांचे संरक्षण करणे भारतीय लष्करापुढे कायमच मोठे आव्हान राहिले आहे.