

Himalayan Glacial Lake Outburst Flood
esakal
सारंग खानापूरकर
हिमालयातील तलाव फुटणे ही केवळ एक अल्पकालीन आपत्ती नसून, तो हिमालयीन परिसंस्थेवर उमटणारा एक कायमस्वरूपी ओरखडा आहे. यामुळे पर्वतांची रचना, मातीची सुपीकता, जलस्रोत आणि जैवविविधता यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. जागतिक तापमानवाढ नियंत्रित करणे आणि हिमालयातील संवेदनशील भागात शाश्वत विकास धोरणे राबवणे हाच या वाढत्या संकटापासून या अद्वितीय परिसंस्थेला वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे.
जगाची ‘तिसरी ध्रुवीय भूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमालय पर्वतरांगांमध्ये हवामान बदलामुळे अतिशय वेगाने बदल घडून येत आहेत. तापमानवाढीमुळे हिमनद्या अभूतपूर्व वेगाने वितळत असून पर्वतीय भागात हजारो नवे नैसर्गिक बर्फाळ तलाव निर्माण झाले आहेत. जेव्हा या हिमतलावांचे खडक, माती, गाळ आणि बर्फाच्या मलब्यापासून तयार झालेले नैसर्गिक बंधारे पाण्याचा अतिरिक्त दाब किंवा भूस्खलनामुळे अचानक फुटतात, तेव्हा ‘ग्लेशियर लेक आऊटबर्स्ट फ्लड’ म्हणजेच, हिमनदीच्या तलावाचा स्फोट घडून पूर येतो. नेपाळमध्ये नुकतीच झालेली दुर्घटना अशाच प्रकारची होती. अशा प्रकारच्या घटनेत कोट्यवधी लिटर पाणी, अवाढव्य खडक, चिखल आणि बर्फ अतिशय वेगाने सखल भागाकडे वाहून येतात. अशा घटना केवळ मानवी वस्त्या आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करत नाहीत, तर हिमालयातील अत्यंत संवेदनशील अशा नैसर्गिक परिसंस्थेचीच मोठी हानी करतात. हे नुकसान कशाप्रकारे होते, त्याचा थोडक्यात आढावा घेऊ.