डॉ. सदानंद मोरे
दुसऱ्या महायुद्धाने विस्कटलेली जगाची आर्थिक घडी पूर्ववत करण्यासाठी ब्रेट्टन वुड्स येथे अर्थतज्ज्ञ व राजकीय सत्ताधीशांच्या प्रतिनिधींची परिषद भरली होती. तिच्यात जगाच्या आर्थिक पुनर्रचनेचा विचार करून त्यासाठी संस्थात्मक यंत्रणांची उभारणी करण्यात आली. साम्यवादी अर्थव्यवस्थेचे मॉडेल समोर असल्यामुळे रशियाने ही परिषद पद्धतशीरपणे टाळली. खरेतर हीच शीतयुद्धाची सूचक अशी नांदी होती. असे काही गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात झाले असे म्हणता येईल का?
इतिहासाच्या जडणघडणीतील विशिष्ट व्यक्तीचे- म्हणजे जिला नायक, हिरो म्हटले जाते तिचे स्थान वा कार्य हा पहिल्यापासूनच चर्चेचा विषय राहिला आहे. आपणही त्याची चर्चा केली आहे. मानवी समाजातील वीरपूजनाची वृत्ती सर्वत्र दिसून येते. ही बाब कोणीही नाकारू शकत नाही. मग भले नायककेंद्री इतिहासाची कितीही चिकित्सा वा समीक्षा करा.
तरीसुद्धा एक मुद्दा उरतोच. ज्याला आपण इतिहास घडवणारा वीरनायक असे म्हणतो, तो स्वतः ज्या समाजातून आलेला असतो त्याचे प्रतिनिधित्व करतो. त्या समाजाच्या इच्छा, आकांक्षा, गरजा, भावभावना त्याच्यात प्रतिबिंबित होत असतात किंवा त्याच्यातून व्यक्त होत असतात. असे नसेल तर तो समाज त्याला नेता किंवा प्रतिनिधी म्हणून स्वीकारणारच नाही आणि त्याला एकट्याला इतिहास घडविता येणे तर सर्वथैव अशक्य असते.