
सुजाता नेरुरकर
इडली सॅंडविच
साहित्य
दोन कप इडली बॅटर, २ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार.
सारणासाठी : तीन मध्यम आकाराचे बटाटे, १ मध्यम आकाराचा कांदा, १ टेबलस्पून आले-लसूण-हिरवी मिरची ठेचा, चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून लिंबू रस, मीठ चवीनुसार.
फोडणीसाठी : एक टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, पाव टीस्पून हिंग, ७ ते ८ कढीपत्ता पाने, पाव टीस्पून हळद.
वरून फोडणी घालण्यासाठी : दोन टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, पाव टीस्पून हिंग, कढीपत्ता पाने.
कृती
सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करावे. त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि चिरलेला कांदा घालावा. कांदा चांगला परतून घ्यावा. त्यानंतर त्यात आले-लसूण-हिरवी मिरची ठेचा घालून परतावे. परतून झाल्यावर त्यात थोडी हळद व उकडून कुस्करलेले बटाटे घालावेत. सर्व मिश्रण एकत्र करून चांगले मिक्स करावे आणि वरून कोथिंबीर घालून भाजी तयार करून घ्यावी. भाजी झाल्यावर इडली पात्रात थोडे पाणी घालून ते गरम करायला ठेवावे. इडली स्टँडला तेल लावून प्रत्येक साच्यात थोडेसे इडली पीठ घालावे. त्यावर भाजीचा एक छोटा, चपटा गोळा पसरवावा आणि पुन्हा त्यावर थोडे पीठ घालून साचा इडली पात्रामध्ये ठेवून झाकण लावावे. अंदाजे बारा मिनिटे इडल्या वाफवून घ्याव्यात. वाफवून झाल्यावर गॅस बंद करून इडल्या बाहेर काढाव्यात आणि थोडा वेळ थंड होऊ द्याव्यात. थंड झाल्यावर इडल्या एका प्लेटमध्ये नीट मांडाव्यात. दरम्यान, फोडणीसाठी एका लहान कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करावी. ही फोडणी थंड झाली की चमच्याने प्रत्येक इडलीवर थोडी थोडी घालावी. अशा प्रकारे इडली सॅंडविच तयार करून सर्व्ह करावे.