सलील उरुणकर
`एआय तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या कामाची गती वाढवणे, अधिक अचूकतेने काम करणे हे पत्रकारांना आणि पीआर प्रोफेशनल्सला शक्य होत आहे. एआय तंत्रज्ञान पत्रकारांना मदत करू शकते, पण ‘पत्रकारिता’ करू शकत नाही, हे माध्यमकर्मींना जितके लवकर समजेल तेवढ्या सकारात्मकतेने या तंत्रज्ञानाला आत्मसात करण्याची त्यांची तयारी होईल.
कोणतेही नवे तंत्रज्ञान आले, की सर्वसाधारपणे दोन टोकाचे मतप्रवाह आढळून येतात. नव्या तंत्रज्ञानामुळे होणारे बदल कसे सर्वकाही उलथवून टाकणारे आहेत, हा एक. तर त्याच तंत्रज्ञानामुळे कशा नव्या संधी निर्माण होणार आहेत, हा दुसरा मतप्रवाह असतो.
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटलिजन्स म्हणजेच एआय) या तंत्रज्ञानाचा उपयोग माध्यमांमध्ये, विशेषतः वृतपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच वृत्तसंकेतस्थळांमध्ये होऊ लागल्यापासून असे अपेक्षित दोन मतप्रवाह दिसू लागले.
काही वृत्तवाहिन्यांनी वृत्तनिवेदनासाठी एआयचा उपयोग केला, तर काही माध्यम समूहांनी एआयचा वापर भाषांतर, आशय संपादित करण्यासाठी, तसेच तांत्रिक कारणांसाठी (प्रत्येक युझरला त्याच्या आवडीच्या बातम्या दाखविण्यासाठी) प्रभावीपणे केला.