रिपोर्ताज। सागर आव्हाड
कल्याणीनगर कार अपघाताने घेतलेले दोन निरपराधांचे जीव... आणि शहर हादरवून टाकणाऱ्या ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या भीषण घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात त्या घटनेनंतर वर्षभरात काय बदलले? रस्त्यांवरील शिस्त, पोलिसी उपाययोजना यांत बदल झालाच, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिक्षणासाठी मुला-मुलींना पुण्यात पाठविणाऱ्या पालकांची मानसिकता बदलली. विद्यानगरीत शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांवर खासगी गुप्तहेरांची पाळत वाढली. याचा परामर्श घेणारा हा रिपोर्ताज...
‘‘आम्ही आमच्या मुलांना गाव, शहर किंवा राज्य सोडून फक्त उच्च शिक्षणासाठी पुण्यासारख्या महानगरांमध्ये पाठवतो. पण कल्याणीनगरमधील ड्रंक ॲण्ड ड्राइव्हसारख्या प्रकरणांमुळे मन धास्तावतं,’’ मध्य प्रदेशातील पालक अर्जुन आचार्य साप्ताहिक सकाळशी बोलत होते...