psychology of willpower
psychology of willpower esakal

इच्छाशक्ती कशी वाढवावी? काय असते त्या मागचे मानसशास्त्र

कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणाऱ्या जगभरातील व्यक्तींमध्ये प्रबळ इच्छाशक्ती आणि त्यानुसारच वागण्याचे नियोजन दिसून येते.

डॉ. अविनाश भोंडवे

कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणाऱ्या जगभरातील व्यक्तींमध्ये प्रबळ इच्छाशक्ती आणि त्यानुसारच वागण्याचे नियोजन दिसून येते.

आपले ईप्सित साध्य करण्यासाठी अशा निवडक व्यक्तींच्या जीवनपटाचा आदर्श ठेवल्यास अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आपल्या ध्येयपूर्तीच्या साधनेला बळकटी आणू शकतात.

पृथ्वीतलावरच्या इतर प्राण्यांपेक्षा माणसाचा मेंदू प्रगत आहे. या प्रगत मेंदूद्वारे कार्यरत होणाऱ्या माणसाच्या बुद्धीला अनेक अद्‍भुत शक्ती प्राप्त झालेल्या आहेत. विचारशक्ती, स्मरणशक्ती, संभाषणशक्ती, कल्पनाशक्ती आणि इच्छाशक्ती.

यातल्या इतर शक्तींचे नियंत्रण आणि संवर्धन करण्याबाबत थोडी फार माहिती सगळ्यांनाच असते. पण इच्छाशक्ती म्हणजे नक्की काय? याबाबत बऱ्याचदा बरेचजण अंधारात असतात.

इच्छाशक्ती वाढवायची इच्छा तर सर्वांनाच असते, मात्र, ‘कळते पण वळत नाही’ अशीच परिस्थिती याबाबतीत दिसून येते.

इच्छा म्हणजे वासना, वांछा, आशा, आकांक्षा, मनीषा... म्हणजेच आपल्याला जे काही हवे असते ते. इच्छा कधी मनोमन असते, तर कधी ती बोलून दाखवली जाते. नववर्षाच्या सुरुवातीला केलेले संकल्प म्हणजे इच्छांचे भेंडोळेच असते.

कुणाला नियमित व्यायाम करायचा असतो, कुणाला गोड खाण्याची किंवा मांसाहार करण्याची चटक दूर करायची असते, तर कुणाला धूम्रपान, मद्यपान किंवा तत्सम व्यसनांना तिलांजली द्यायची असते.

आपल्याला जे हवे असते ते प्राप्त करण्यासाठी आपल्या शरीराला, मनाला आणि बुद्धीला जागे करणारी, त्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायला लावणारी शक्ती म्हणजे इच्छाशक्ती. इच्छाशक्ती हा मनाच्या सामर्थ्याचा एक भाग असतो.

ती एक अमूर्त शक्ती आहे. त्याची प्रचिती माणसाच्या कार्यातूनच येते. इच्छाशक्ती म्हणजे कल्पनेतली इच्छा किंवा मनोरथ नव्हेत, तर ज्यामुळे एखादी इच्छा अविरत परिश्रमाने प्रत्यक्षात आणता येते ती इच्छाशक्ती.

इच्छांची पूर्तता होण्यासाठी नैतिक शक्ती आणि निश्चय असावा लागतो. लहानसहान गोष्टींमधून इच्छाशक्तीला बळकटी मिळते. जेव्हा एखादी गोष्ट जाणीवपूर्वक नित्यनेमाने केली जाते, त्यातून इच्छाशक्ती दृढ होते.

psychology of willpower
Mental Health : एक एकटा एकाकी! एकटच विचार करत बसण्यापेक्षा या गोष्टी करा, फरक जाणवेल!

इच्छाशक्तीचे मानसशास्त्र

प्रचलित मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार इच्छाशक्ती ही एखाद्या बॅटरीसारखी असते. दिवसाच्या सुरुवातीला ती ‘फुल्ली चार्जड्’ असते. पण त्यानंतर दिवसभरात वेळोवेळी येणारे विचार, त्रासदायक भावना, मनात नसतानाही बाळगावा लागणारा संयम अशा घटनांतून बॅटरीची ऊर्जा कमी होत जाते.

दिवसभरात एकामागून एक छोट्या मोठ्या घटना घडतच जातात. त्यात पुन्हा विश्रांती घ्यायला आणि बॅटरी रिचार्ज करायला सवडही मिळत नाही आणि मग ऊर्जा कमी कमी होत जाऊन न्यूनतम पातळीवर येते.

अशा काळात संयम ठेवणे, एकाग्रता राखणे आणि मोहाचा प्रतिकार करणे अशक्यप्राय असते.

संशोधनांमध्ये या प्रक्रिया स्पष्ट होत गेल्या. प्रयोगशाळेतील चाचण्यांतून या प्रक्रिया सिद्ध झाल्या. एका संशोधनात, काही लोकांना चॉकलेट आणि कुकी भरलेली ताटे ठेवलेल्या टेबलाशेजारी बसवण्यात आले.

त्यापैकी काही जणांना प्रलोभन म्हणून समोर ठेवलेली चॉकलेट आणि कुकी खायला मज्जाव केला. उरलेल्या सहभागींना ती खायला परवानगी दिली. त्यानंतर दोन्ही गटांना काही किचकट प्रश्न आणि गणिते सोडवण्यास दिली.

ज्यांना चॉकलेट आणि कुकी खायला प्रतिबंध केला होता त्यांनी दिलेले प्रश्न सोडवताना कमी चिकाटी दाखवली, दुसऱ्या गटाला प्रश्न आणि गणितांची उकल पटापट करता आली.

तोंडाला पाणी सुटेल असे खाद्य ज्यांना नाकारले गेले त्यांना प्रश्न आणि गणिते सोडवायला खूप जड गेले, कारण आपल्या आवेगांवर लगाम घालताना त्यांच्या इच्छाशक्तीचा साठा संपला होता.

निष्कर्ष असा निघाला की ज्यांचे आत्मनियंत्रण किंवा संयम उच्च पातळीवर असतो, त्यांच्याकडे सुरुवातीला इच्छाशक्तीचा मोठा साठा असू शकतो, परंतु दबावाखाली आल्यावर तो साठा कमी कमी होत जातो.

यानंतर २०१०मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्नामधील मानसशास्त्रज्ञ व्हेरोनिका जॉबने एक संशोधन प्रकाशित केले. त्यात इच्छाशक्तीची ऊर्जा कमी होत जाते, या सिद्धांताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

इच्छाशक्ती स्वाभिमान आणि आत्मविश्वासावर अवलंबून असते हे तिने संशोधनात अनेक पुराव्यांसह दाखवून दिले. माणसाचा स्वाभिमान किंवा अहंकार (इगो) कमी जास्त होणे हे त्याच्या आत्मविश्वासावर अवलंबून असते.

psychology of willpower
Women Psychology : प्रेमात पडलेल्या महिलांच्या मनात काय सुरू असते?

जॉबने एक प्रश्नावली तयार केली. त्यामध्ये काही विधाने होती.

संशोधनातील सहभागींना या प्रत्येक विधानांवर, १ म्हणजे पूर्णपणे सहमत ते ६ म्हणजे पूर्णतः असहमत या पद्धतीने मतप्रदर्शन करण्यास सांगितले. ही विधाने अशी होती-

प्रलोभनांसह आव्हान देणारी परिस्थिती निर्माण होते तेव्हा प्रलोभनांचा प्रतिकार करणे तुम्हाला अधिकाधिक कठीण होत जाते.

खूप अवघड पातळीवरची मानसिक कामे तुमचे ऊर्जास्रोत थकवते, अशावेळेस तुम्हाला ‘इंधन’ भरणे आवश्यक वाटते.

जर तुम्ही नुकताच एका तीव्र प्रलोभनाला टाळण्यासाठी प्रतिकार केला असेल, तर तुम्हाला बळकट वाटते आणि तुम्ही नवीन प्रलोभनांना तोंड देऊ शकता.

कठीण परिस्थितीत तुमची मानसिकदृष्ट्या तग धरण्याची क्षमता तुम्हाला आणखी चालना देते. कठोर मानसिक परिश्रमानंतरही तुम्ही अधिक कार्यक्षमतेने काम करत राहता.

जर एखादी व्यक्ती, पहिल्या दोन विधानांशी अधिक सहमत असेल, तर त्या व्यक्तीची इच्छाशक्ती मर्यादित आहे. पण जर एखादी व्यक्ती, दुसऱ्या दोन विधानांशी अधिक सहमत असेल, तर त्याची इच्छाशक्ती अमर्यादित असल्याचे सांगितले गेले.

त्यानंतर जॉबने या सहभागींवर काही मानसशास्त्रीय चाचण्या केल्या. यामध्ये इच्छाशक्तीच्या साठ्यावर अवलंबून असते असे मानली जाणारी त्यांची मानसिक एकाग्रता तपासली.

यात जॉबला असे आढळले, की मर्यादित स्वाभिमान असलेल्या व्यक्ती स्वाभिमान कमी होण्याच्या सिद्धांतानुसार कार्य करतात.

या व्यक्ती तीव्र एकाग्रतेने करावे लागणारे एखादे काम, उदाहरणार्थ, लिखाणातील कंटाळवाण्या मजकुरातील दुरुस्त्या, चपखलपणे करते. या व्यक्तींना कामाआधी विश्रांती दिली, तर त्यानंतरची कामे एकाग्रतेने करणे त्यांना खूप अवघड जाते.

अमर्यादित स्वाभिमानी व्यक्तींमध्ये, स्वाभिमान/ अहंकार कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसून आली नाहीत. मानसिकरित्या थकवणारे काम केल्यानंतरही त्यांच्या मानसिक एकाग्रतेमध्ये कोणतीही घट आढळली नाही.

इच्छाशक्तीबद्दल सहभागींची मानसिकता तपासल्यावर, काहीजणांची इच्छाशक्ती सहजपणे संपुष्टात येत असल्याचे दिसून आले.

मोह आणि विचलनाचा प्रतिकार करण्याची त्यांची क्षमता त्वरित कमी होते; परंतु ‘मानसिक बळावर तग धरण्याची क्षमताच आपल्याला स्फूर्ती देते’ असा ज्यांचा मनोमन विश्वास असेल त्यांच्या पुढच्या कार्यात अधिक क्षमता दिसून येते.

म्हणजेच इच्छाशक्ती ही आत्मिक ऊर्जेवर नव्हे, तर वैयक्तिक आत्मविश्वास आणि अभिमानावर ठरते. जेव्हा अतिशय आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते तेव्हाही इच्छाशक्ती जागृत होते.

प्रतिकूल परिस्थितीचे अनुकूल परिस्थितीत रूपांतर करण्याची किमया इच्छाशक्तीमध्ये असते. कधी कधी अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी परतीचे दोर कापावे लागतात.

केवळ मनोमन मोठी महत्त्वाकांक्षा ठेवणे, हवेत किल्ले बांधणे म्हणजे इच्छाशक्ती नसते. मनातील संकल्प शरीराने पार पाडले तरच इच्छापूर्ती होते. त्यासाठी शरीराने आणि मनाने एकत्र कार्य करणे जरुरीचे ठरते.

जर शरीर थकले असेल, तर विश्रांती आवश्यकच असते. शारीरिक व्याधीतून मुक्तता मिळवण्यासाठीही मनही खंबीर असावे लागते.

psychology of willpower
Female Psycology : महिला पुरुषांचे कपडे का घालतात? हे आहे लॉजिक

मेंदूतील प्रक्रिया

इच्छा निर्माण होणे आणि इच्छापूर्तीसाठी मनाच्या तसेच शरीराच्या हालचाली घडवणे हे कार्य साहजिकच मेंदूमार्फत होते.

कवटीच्या आत असलेल्या मेंदूच्या, कपाळामागील भागाला फ्रॉन्टल लोब म्हणतात. त्याच्या अगदी पुढच्या भागातील विभागाला प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स म्हणतात. हा विभाग अमूर्त कल्पना, तर्कशुद्ध विचार, संभाषण कौशल्य आणि अवघड गोष्टींमध्ये संयमपूर्ण निर्णय घेण्यात कार्यप्रवण असतो. आपल्या कामातील महत्त्वाची असूनही कंटाळवाणी, कठीण, भीती वाटणारी कामे पार पाडण्यास मदत करतो.

प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्सचे हे कार्य त्याच्या तीन उपविभागांकडून समायोजित होत असते. यातला व्हेंट्रोमीडियल हा भाग, अवघड कामांसाठी असलेल्या अनेक पर्यायांपैकी एक पर्याय निवडायला सुचवितो, ही निवड योग्य किंवा अयोग्य कशीही असू शकते.

निवडलेला एखादा पर्याय योग्य नसल्यास, तो अमलात आणण्यापासून मेंदूच्या कार्यकारी प्रणालीला ऑर्बायटल हा दुसरा विभाग रोखतो. डॉर्सोलॅटरल हा तिसरा विभाग, आपल्या उद्दिष्टांची आठवण आपल्याला करून देतो.

प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स आणि त्याच्या तीन उपविभागांच्या एकत्रित कार्यावर इच्छाशक्ती अवलंबून असते. या तिन्ही विभागांच्या कार्यक्षमतेच्या उच्च, मध्यम, अल्प पातळीनुसार आपल्या इच्छाशक्तीची मर्यादा ठरते.

इच्छाशक्ती सुधारण्याचे उपाय

इतर मानसिक आणि बौद्धिक शक्तींप्रमाणेच इच्छाशक्ती वाढवण्यासाठी कोणतेही औषध नसते. पण त्यासाठी काही मानसोपचार आणि व्यावहारिक उपाय करता येतात.

ध्यानधारणा ः योग्य पद्धतीने केलेल्या मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणेमुळे, प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्समधील मज्जापेशींच्या संदेशवहनात सुधारणा होते, असे जगभरातील अनेक संशोधनामधून दिसून आले आहे.

मेडिटेशन वर्तमानक्षणात राहण्याची वृत्ती जोपासते. त्यामुळे त्याप्रमाणे निर्णय घेण्याची आणि ते सातत्याने करत राहण्याची प्रवृत्ती वृद्धिंगत होते. साहजिकच त्यातून इच्छाशक्ती वाढते.

psychology of willpower
Budget 2024 Health: गर्भाशय कॅन्सरसाठी ९ ते १४ वयाच्या मुलींना मोफत लसीकरण, बजेट मध्ये मोठी घोषणा!

नियोजन ः इच्छाशक्ती वाढवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक काही बदल घडवावे लागतात. यात-

  • आपली ठोस उद्दिष्टे लिहून काढणे,

  • ती आपण कशा प्रकारे पार पडणार आहोत याची व्यावहारिकदृष्ट्या योग्य योजना बनवणे.

  • ही उद्दिष्टे आपण काळाच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे दर आठवड्यामध्ये, दर महिन्याला, दर वर्षाला कशी पार पडणार आहोत हे पक्के करणे.

  • त्याचप्रमाणे आपले दैनंदिन जीवन हळूहळू, पण कायमस्वरूपी योजनाबद्ध बनवावे लागते.

  • दर टप्प्याला त्या योजनेच्या पूर्ततेचा आढावा घ्यावा लागतो.

  • आपण ही उद्दिष्टे पार पाडूच, असा आत्मविश्वास सातत्याने बाळगावा लागतो.

  • महत्त्वाच्या टप्प्यावर उद्दिष्टे साध्य झाल्यावर आपण स्वतःला काही ‘बक्षीस’ देणे अपेक्षित असते.

  • आपली उद्दिष्टे पार पडताना आपल्या योजनेमध्ये आडकाठी आणणाऱ्या, आपल्याला योजनेपासून दूर नेणाऱ्या, ठरलेल्या गोष्टी करण्यापासून वंचित करणारे मोहाचे प्रसंग ओळखून त्यांना बाजूला सारावे लागते.

कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणाऱ्या जगभरातील व्यक्तींमध्ये प्रबळ इच्छाशक्ती आणि त्यानुसारच वागण्याचे नियोजन दिसून येते.

आपले ईप्सित साध्य करण्यासाठी अशा निवडक व्यक्तींच्या जीवनपटाचा आदर्श ठेवल्यास अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आपल्या ध्येयपूर्तीच्या साधनेला बळकटी आणू शकतात. इच्छाशक्ती वाढवण्याचा असादेखील एक यशस्वी मार्ग आहे.

-----------------

psychology of willpower
Mental Health : ओव्हरथिंकिंग करताय? मग, जाणून घ्या आरोग्यावर होणारे 'हे' दुष्परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com