Teenage Parenting: किशोरवयीन मुलांशी संवाद साधताना या ८ पद्धतींचा करा वापर

किशोरवयात पालक-मुलांमधलं अंतर निसर्गनियमाप्रमाणे वाढत जात असतं..
Teenage Parenting
Teenage Parentingesakal

किशोरवय आणि जीवनकौशल्ये: डॉ. वैशाली देशमुख

किशोरवयात पालक-मुलांमधलं अंतर निसर्गनियमाप्रमाणे वाढत जातं. आपल्यापलीकडे असलेल्या विश्वाचं मुलांना हळूहळू भान यायला लागतं, त्याचबरोबर ‘स्व’च्या जाणिवेचा शोधही ती घेत असतात.

अशा वेळी आस्था आणि स्व-जाणीव ही दोन जीवनकौशल्यं त्यांना त्यांच्या वादळी टप्प्यावर आधार तर देतातच, शिवाय पालकांबरोबरचं त्यांचं ताणलेलं नातं टिकवून ठेवायलाही मदत करतात.

मा र्गरेट मीड या मानववंशशास्त्रज्ञ होत्या. त्यांच्याविषयी एक गोष्ट सांगतात. त्यांच्या एका विद्यार्थ्यानं त्यांना विचारलं, ‘पूर्वी मानव इतर प्राण्यांसारखाच जंगली होता.

मग मानवी संस्कृती सुरू कधी झाली? तुमच्या मते त्याची पहिली खूण कोणती?’ आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या उत्तरात मडकी, दागिने, हत्यारं यापैकी काही पुरावे नव्हते, तर होतं एक उत्खननात सापडलेलं, जुळून आलेलं मानवी मांडीचं हाड!

तुटलेलं मांडीचं हाड जुळायला साधारणपणे किमान सहा आठवड्यांच्या विश्रांतीची गरज असते. पण जंगलाच्या कायद्यात हे कसं जमायचं? तिथं तर प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यासाठी आणि स्वतःचं खाणं मिळवण्यासाठी झगडत असतो.

कुणासाठी थांबणं, त्यांची सेवा करणं हे त्या जगण्या-मरण्याच्या लढाईत अवघड. त्यामुळे जखमी प्राण्याचा मृत्यू ठरलेलाच! पण ज्या अर्थी हे पंधरा हजार वर्षांपूर्वीचं जुळून आलेलं हाड सापडलं, त्या अर्थी तेव्हा कुणीतरी त्या जखमी व्यक्तीची काळजी घेतली असणार, कदाचित आपला जीव धोक्यात घालून शुश्रूषा केली असणार.

कुणालातरी त्या व्यक्तीविषयी सहानुभूती वाटली. आणि त्यामुळेच तो रुग्ण हाड जुळेपर्यंत तग धरू शकला. सुसंस्कृत मानवी वर्तणुकीची सुरुवात इथं दिसते असं मार्गरेट यांचं उत्तर होतं, असं म्हणतात.

ज्या व्यक्तीनं जखमीला वाचवलं, त्यानं परिस्थितीचा आणि आपल्या स्वतःच्या क्षमतेचा नीट अंदाज घेतला असणार, त्यामुळे शेवटी हे मिशन यशस्वी होऊ शकलं. याच दोन जीवनकौशल्यांविषयी आज बोलूया- आस्था (Empathy) आणि स्व-ओळख किंवा स्वतःच्या सामर्थ्याविषयी जाणीव (Self-awareness).

आपल्याला इतरांनी समजून घ्यावं, ही प्रत्येकाची गरज असते. माणसा-माणसांतले बंध या आस्थेतूनच बळकट होतात. मार्गरेट मीडनं म्हटल्याप्रमाणे माणुसकीचा, मानवी समाजरचनेचा पाया यामुळेच घातला गेलाय.

हे जाणलेल्या व्यक्ती दुसऱ्यांच्या बाजूनं विचार करू शकतात आणि त्यांच्या भावना समजू शकतात. पण सहानुभूती (Sympathy) दाखवणाऱ्यांसारखे ते त्या भावनांच्या पुरात वाहून जात नाहीत, परिस्थितीला सुयोग्य असा निर्णय घेऊ शकण्याइतका विवेक आणि तटस्थता त्यांच्यामध्ये असते.

आपल्या आणि इतरांच्या अस्तित्वाची सावध जाणीव ही नेहमीच माणसाला एका उन्नत अवस्थेपर्यंत पोहोचायला मदत करते. म्हणून तर सगळे तत्त्वज्ञानी आणि संत या सनातन सत्याची, आत्मशोधाची आस धरतात.

किशोरवयात पालक-मुलांमधलं अंतर निसर्गनियमाप्रमाणे वाढत जातं. मुलांचं बोलणं दुर्मीळ होतं आणि जेव्हा ती बोलतात, तेव्हा चरे ओढल्यासारखी टोकदार बोलतात. आपल्यापलीकडे असलेल्या विश्वाचं त्यांना हळूहळू भान यायला लागतं, त्याचबरोबर ‘स्व’च्या जाणिवेचा शोधही ती घेत असतात.

अशा वेळी ही दोन जीवनकौशल्यं त्यांना त्यांच्या वादळी टप्प्यावर आधार तर देतातच, शिवाय पालकांबरोबरचं त्यांचं ताणलेलं नातं टिकवून ठेवायलाही मदत करतात. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जाणीव मुलांना अधिक आत्मविश्वासपूर्ण, अधिक स्थिरचित्त बनवते. त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या प्रवासाला पूरक ठरते.

शाळेत होणारी दादागिरी, संगतीचे दुष्परिणाम, शरीरप्रतिमा, व्यसनं अशा खास किशोरवयाशी संबंधित प्रश्नांचं मूळ आणि उपाय, दोन्हींमध्ये स्व-जाणीव आणि सहसंवेदना महत्त्वाची भूमिका बजावतात.

काही प्रसंग पाहू...

शाळेमध्ये दोन मुलं मिळून एक नवीन आलेल्या मुलाला त्रास देतायत. तो मुलगा अगदी घाबरून गेलाय.

खरंतर मुद्दामहून दादागिरी करणारी, त्यातून विकृत आनंद मिळवणारी मुलं फार थोडी असतात. खूपदा असं होतं की गटाच्या मानसिकतेतून दादागिरी केली जाते. जो तसं करणार नाही, त्याला चिडवलं जातं किंवा गटाबाहेर टाकलं जातं.

शिवाय आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत हे असं वागणं म्हणजेच मर्दपणा असा मुलांचा समज झालेला असतो. एखाद्याला जरी वाटलं की आपण असं वागू नये, तरी आपण ते का म्हणतोय हे तो इतरांना पटेल असं समजावून देऊ शकत नाही.

दुसरं असं, की इतरांच्या भावना समजून घेण्याची सवय किंवा कौशल्य नसल्यानं दादागिरी करणाऱ्या मुलांच्या लक्षातच येत नाही, की आपण जे करतोय त्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते आहे.

काही वेळा हे लक्षात येतं पण त्यासाठी आपण काय करावं, आपली कळकळ कशी व्यक्त करावी यांविषयीची शब्दसंपत्ती आणि निर्णयक्षमता तोकडी पडते.

एकूणच या प्रकरणात, सहसंवेदना आणि स्व-जाणीव या दोहोंची दादागिरी करणाऱ्या आणि सहन करणाऱ्या अशा दोन्ही घटकांत कमतरता असते.

त्यामुळे नियम, शिक्षा, हकालपट्टी असे उपाय इथे उपयोगी पडत नाहीत असं दिसून आलंय. मात्र मुलांमध्ये आस्थेचं संवर्धन करणं हे उपयुक्त ठरू शकतं असं दिसून आलंय.

एका किशोरवयीन मुलीचं आजकाल तिच्या आई-बाबांबरोबर सतत भांडण होतं.

या चित्रात काही नवीन नाही. का होतात ही भांडणं? अनेक कारणं आहेत. तिच्या वयाला आणि विकासाला अनुसरून या मुलीची स्व-हक्काची जाणीव तीव्र असणार.

पण काही बाबतीत आपल्याला योग्य निर्णय घेणं जमणार नाही, किंवा काही मुद्दे आपल्या लक्षात येत नाहीत याची मात्र तिला जाणीव नाहीये.

जेव्हा आई-बाबा रागावतात, तेव्हा त्यांची काळजी तिला समजते, पण त्यांच्या सततच्या सांगण्याचा इतका राग येतो की त्यात तिचं हे शहाणपण वाहून जातं. मग आपलं म्हणणं आई-बाबांपर्यंत कसं आणि कोणत्या शब्दांत पोहोचवायचं याविषयी ती गोंधळून जाते.

आई-बाबांचा मेंदू आता पुरेसा विकसित झालाय, त्यांच्या लक्षात येतोय तिच्या वागण्याचा अर्थ काही प्रमाणात; पण तिचं उद्दाम, अरेरावी बोलणं, चेहऱ्यावरचा माज हे बघून कितीही प्रयत्न केले तरी त्यांना तिला समजून घेणं, तिच्याशी शांतपणे, प्रेमानं बोलणं अवघड जातंय.

आपण मागच्या एका लेखात (संवाद-सेतू -प्रसिद्धीः २७ जानेवारी) संवादाविषयी, खास करून ऐकून घेण्याविषयी बोललो. ते इथे खूप उपयोगाला येईल.

मुलगी काहीही सांगायला किंवा विचारायला लागली, की हातातलं काम बाजूला ठेवून तिचं म्हणणं मनापासून, पूर्णपणे ऐकून घेतलं तर तिला आस्था कशी असते याची एक झलक मिळेल. संवादाला सुरुवात होईल, वादंगांची निदान तीव्रता बोथट होईल.

एक किशोर हट्ट धरून बसलाय, की त्याला मित्रांबरोबर दूरच्या सहलीला जायचं आहे. आई-बाबा नकार देतायत.

या मुलाला आता मित्र जवळचे वाटायला लागले आहेत, त्यांची मान्यता महत्त्वाची वाटते आहे. घरापासून, आई-वडिलांपासून विलग होण्याच्या; स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित करण्याच्या त्याच्या वाटचालीचा तो भाग आहे.

तिथे त्याला त्याचं प्रौढपण अनुभवायला मिळतंय. आपण जायला नाही म्हटलं तर मित्र किती नाराज होतील, कदाचित त्यांचा प्लॅन रहित करायला लागेल याची त्याला कल्पना आहे, कारण त्यांचं भावविश्व तो जवळून ओळखतो.

असं सगळं असताना आपले आई-वडील उगीच आडमुठेपणा का करतायत हेच त्याला कळत नाहीये.

त्याचे आई-बाबा का नकार देत असतील हे आपल्यासारखे इतर प्रौढ लगेचच जाणतील. त्यांना आपल्या सुपुत्राच्या मर्यादांची जाणीव आहे.

तिकडे मित्रांच्या नको त्या आग्रहाला तो बळी पडण्याची शक्यता आहे, दूरच्या सहलीला आपापले जाण्याइतके ते सगळे अजून सक्षम नाहीत, काही इमर्जन्सी आली तर पंचाईत होईल अशा सगळ्या येऊ शकणाऱ्या समस्यांची त्यांना जाणीव आहे.

आपण जबाबदारी घेऊ शकतो हे मुलानं आत्तापर्यंत कधी दाखवून दिलं नसेल, त्यामुळे त्यांना त्याच्याविषयी खात्री वाटत नाहीये. पण आपला मुलगा आता लहान राहिलेला नाही, त्याला त्याची मतं आणि प्राधान्यक्रम आहेत याचा स्वीकारही इथे दिसत नाही.

म्हणजे मुलाला आपल्या हक्कांची आणि पालकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव आहे. पण त्याकडे एकमेकांच्या नजरेतून पाहता येत नाहीये.

पालकांना मुलाच्या दृष्टीनं असलेलं या गोष्टीचं महत्त्व आणि गांभीर्य संभाव्य धोक्यांच्या तुलनेत तितकसं भावत नाहीये. आणि मुलाला आपल्या मर्यादांची आणि कुवतीची जाणीव नाहीये.

एकूण हे सगळं वाचून असं वाटेल की आईबाबांनी देऊन टाकावी एकदाची परवानगी, किंवा देऊन टाकावा ठामपणे नकार.

यातलं एक ते काहीतरी करतीलच. पण त्यांच्या नात्यातला गोडवा आणि ऊब टिकवायची असेल तर सहसंवेदनेचं अस्तर त्या प्रक्रियेला लावावं लागेल.

Teenage Parenting
Teenage Love : न कळत्या वयातच तुमच्या मुलांचं पाऊल घसरतंय?

किशोरवयीन मुलांना स्वतःविषयी आणि इतरांविषयी सजग करण्यासाठी यातल्या काही गोष्टी वापरता येतात:

  • मुलांवर वयानुरूप आणि त्यांच्या कुवतीनुसार छोट्या छोट्या जबाबदाऱ्या टाकणे. त्यातून आपल्याला काय जमतं हे त्यांना कळतं आणि छोट्या छोट्या अपयशांशी तोंडओळखही होते.

  • मैदानी खेळांमध्ये भाग, मुख्यत्वेकरून समूहखेळांमध्ये घेतलेला सहभाग मुलांना आपल्या क्षमतांची ओळख करून घ्यायला मदत करतो. त्याच वेळी मुलं इतरांच्या भावना, विचार ओळखायला; त्यांचा आदर करायला शिकतात.

  • काही मुलांना डायरी लिहायला आवडतं. त्यातूनही ती दिवसभरातल्या घटनांकडे डोळे आणि मन उघडं ठेवून बघायला शिकतात; त्याविषयी माइंडफुल होतात.

  • चांगल्या मित्र-मैत्रिणी मुलांना मोकळेपणानं व्यक्त होण्याची संधी देतात, स्पष्टपणे चांगलं-वाईट काय हे सांगतात, मुलांना ते पटतंही.

  • आपण म्हणजे फक्त आपलं शरीर नव्हे; तर आपले विचार, भाव-भावना आणि आपली वर्तणूक हेही असतात; असा ‘स्व’बद्दलचा सर्वांगीण दृष्टिकोन पालक मुलांपर्यंत पोहोचवू शकले तर नकारात्मक शरीरप्रतिमेच्या दुष्टचक्रात मुलं अडकणार नाहीत, स्वतःच्या इतर पैलूंकडेही लक्ष देतील.

  • रडणाऱ्या मुलाला ‘रडू नकोस’ असं सांगण्याआधी ‘तुला त्रास होतोय का?’ असं जेव्हा पालक विचारतात, तेव्हा आस्थेचं प्रात्यक्षिक होतं.

  • ‘तिला काय वाटलं असेल?’ / ‘तू तिथे असतास तर तुझ्या मनात काय विचार आले असते?’ / ‘अशा परिस्थितीत तुझ्या दोस्तांनी काय केलं तर तुला आधार वाटेल?’ अशा धर्तीवर मुलांशी बोलावे.

  • दिवसातला थोडा तरी वेळ एकांतात, स्वतःबरोबर घालवण्याची सवय लावावी. सतत इतरांच्या मत-मतांतरांच्या गराड्यात असताना मुलांना आपले स्वतःचे दृष्टिकोन लक्षातच येत नाहीत. योगासनं, श्वासाचे व्यायाम हेही मुलांना स्वतःच्या आत डोकावायला मदत करतात.

घटनांच्या सनसनाटी वृत्तांकनाच्या पलीकडे जाऊन गप्पा/चर्चा. उदा. ‘घरातून पळून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींना पोलिसांनी शोधून परत आणलं’ अशी बातमी असेल, तर त्या मुलींनी असं पाऊल का उचललं असेल?

त्यांच्या आई-वडिलांच्या मनात काय विचार आले असतील? बाहेर पडल्यावर काय धोके असू शकतात आणि त्यांना आपण तोंड देऊ शकू का याचा मुलींनी विचार केला असेल का? यावर त्यांच्या मैत्रिणींची प्रतिक्रिया काय असेल? शाळेत परत आल्यावर इतर मुलांनी त्यांच्याशी कसं वागलं तर त्यांना बरं वाटेल?’ अशा मुद्द्यांवर मुलांचं विचारचक्र चालू होऊ देत.

त्यातून मुलं सहसंवेदनेनं इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बाळगायला लागतील आणि ‘आपण तिथे असतो तर?’ असा स्वतःला जोखण्याचाही प्रयत्न करतील.

सहसंवेदनेमध्ये ऑक्सिटोसिन हे संप्रेरक महत्त्वाची भूमिका बजावतं. प्रेमळ, मायेचा स्पर्श; सहज, निर्हेतुक गप्पा; कुणीतरी आपली घेतलेली काळजी; आपण कुणाची तरी घेतलेली काळजी अशा अनेक क्रिया या संप्रेरकाचा स्राव वाढवतात.

कुटुंबातील व्यक्तींची वर्तणूक, माध्यमांमधलं चित्रण, आजूबाजूची परिस्थिती आणि काही प्रमाणात जनुकीय प्रभाव हे कोण किती संवेदनशील असू शकतं हे ठरवतात.

यात स्वतःवर मनापासून प्रेम करणारे, मुलांच्या यशाची रास्त पोचपावती देणारे पण अतिरेकी पोकळ कौतुक न करणारे, स्वतःशी प्रामाणिक राहणारे पालक आले.

तसंच मूल्यांना महत्त्व देणारा; विशाल, मानवतावादी दृष्टिकोन बाळगणारा न्याय्य समाजही आला.

यासाठी खूप सारा संयम आणि वेळ लागेल. कारण ही वृत्ती हळूहळू अंगी बाणवत, मुरत जाते.

--------------------

Teenage Parenting
Teenage Love : न कळत्या वयातच तुमच्या मुलांचं पाऊल घसरतंय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com