सुनील चावके
सन २०२४ प्रमाणेच २०२५ ही राजकीयदृष्ट्या अतिशय उत्कंठावर्धक ठरू शकते. राजकीय आघाडीवर फारशी आव्हाने उरणार नसली, तरी आर्थिक विषमता, बेरोजगारी, महागाई , जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मुद्द्यांवरून भाजपला संभाव्य जनरोषाला सामोरे जावे लागू शकते. २०२५ वर भाजपचे वर्चस्व असेल की विरोधी पक्षांचे हे याच मुद्द्यांवर अवलंबून असेल.
सन २०२४ ने केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीच्या नावाखाली एकजूट झालेल्या विरोधी पक्षांना समान संधी दिली. पण त्याचा फायदा उठवला भाजप आणि रालोआतील मित्रपक्षांनी.
२०२५ साल भाजप-रालोआच्या बाजूने झुकते माप देईल, असे आत्ता तरी वाटत आहे. कारण केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपच्या मित्रपक्षांना मागच्या वर्षीच्या तुलनेत फारसा संघर्ष करावा लागणार नाही.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर पांगापांग झालेल्या ‘इंडिया’ आघाडीतील मित्रपक्षांची संघर्ष करण्याची क्षमता क्षीण होत जाईल असे चित्र दिसते आहे.