Hoysaleswara Temple karnataka
Esakal
डॉ. राधिका टिपरे
होयसळेश्वरांचं मंदिर हळेबिडू या लहानशा गावात आहे. हळेबिडू ही होयसळ राजांची दुसरी राजधानी होती. भगवान शिवाला समर्पित असणारं हे मंदिर एका मोठ्या मानवनिर्मित तलावाच्या काठावर बांधण्यात आलं होतं. होयसळ राजा विष्णूवर्धनच्या राज्यकाळात, इ.स. ११२१मध्ये या मंदिराचं काम सुरू झालं होतं आणि ते ११६०मध्ये पूर्ण झालं होतं. अतिशय सुंदर स्थापत्यशैली आणि अप्रतिम शिल्पकाम यामुळे हे मंदिर त्याकाळातही खूप प्रसिद्ध होतं...
नववर्षानिमित्त दक्षिण भारतातील काही मंदिरांना भेट द्यायची म्हणून बाहेर पडलो होतो. यावेळी कर्नाटकातली काही मंदिरं आवर्जून पाहायचीच असं ठरवूनच घरातून बाहेर पडले होते. त्यात पहिल्या क्रमांकावर होतं बेलूर आणि दुसऱ्या क्रमांकावर होतं हळेबिडू. या मंदिरांना मी आतापावेतो किमान चार वेळा तरी भेट दिली आहे. परंतु मनाचं समाधान होत नाही. नेहमी वाटत राहतं, काहीतरी पाहायचं शिल्लक आहे अजून! कारण या दोन्ही मंदिरांतली शिल्पकला इतकी अप्रतिम आहे, की कितीही वेळा पाहिलं तरी मन भरत नाही. आतून, हृदयातून ओढ वाटत राहते, ‘अजून काहीतरी पाहायचंय...’. कारण ही दोन्ही मंदिरं आणि त्यातली अद्वितीय शिल्पकाव्य हा केवळ नजरेला सुख देणारा सांस्कृतिक ठेवा नाहीये, तर कुठेतरी हृदयात, मर्मबंधात जपून ठेवावं असं संचित आहे. या मंदिरांच्या भिंतीवर रचलेल्या काळ्या कातळ चिऱ्यांवर शिल्पकारांनी केवळ शिल्पाकृती निर्माण केलेल्या नाहीत; तर छिन्नी आणि हातोड्याच्या साहाय्यानं सुरेख शिल्पकाव्य रेखाटलं आहे.
बेलूरच्या चेन्नकेशव मंदिरामध्ये आजही श्रीविष्णूंची सांग्रसंगीत पूजाअर्चा केली जाते. मात्र हळेबिडूच्या होयसळेश्वराच्या मंदिरातील पूजाअर्चा अनेक शतकांपासून बंद पडली होती. त्या मानानं दुर्लक्षिलं गेलं होतं हे मंदिर. होयसळेश्वरांचं हे मंदिर हळेबिडू या लहानशा गावात आहे. हळेबिडू ही होयसळ राजांची दुसरी राजधानी होती. भगवान शिवाला समर्पित असणारं हे मंदिर एका मोठ्या मानवनिर्मित तलावाच्या काठावर बांधण्यात आलं होतं.
होयसळ राजा विष्णूवर्धनच्या राज्यकाळात, इ.स. ११२१मध्ये या मंदिराचं काम सुरू झालं होतं आणि ते ११६०मध्ये पूर्ण झालं होतं. अतिशय सुंदर स्थापत्यशैली आणि अप्रतिम शिल्पकाम यामुळे हे मंदिर त्याकाळातही खूप प्रसिद्ध होतं. त्यामुळेच उत्तरेकडच्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या नजरेत भरल्यामुळे चौदाव्या शतकात दोन वेळा या मंदिरावर मुसलमानांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात मंदिराचं अतोनात नुकसान झालं होतं. सुरुवातीला दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यानं होयसळ राज्यावर आक्रमण केलं. त्यावेळी मुसलमानांनी होयसळेश्वर मंदिर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या इतर अनेक मंदिरांचं प्रचंड नुकसान केलं होतं.