निसर्गात समायोजन करण्यासाठी अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानवाकडे वेगळे इंद्रिय आहे का?

निसर्गाशी समायोजन करण्याच्या प्रक्रियेत मानवाने केवळ स्वतःत बदल करीत राहण्यापेक्षा, निसर्गाशी सुसंगत राहील असेच आपले वर्तन ठेवण्यापेक्षा म्हणजेच निसर्गाच्या मर्यादेत राहण्यापेक्षा, निसर्गातच बदल घडवत तो आपल्याला अनुकूल कसा होईल यावर भर दिला.
human
humanesakal

डॉ. सदानंद मोरे

निसर्गाशी समायोजन करण्याच्या प्रक्रियेत मानवाने केवळ स्वतःत बदल करीत राहण्यापेक्षा, निसर्गाशी सुसंगत राहील असेच आपले वर्तन ठेवण्यापेक्षा म्हणजेच निसर्गाच्या मर्यादेत राहण्यापेक्षा, निसर्गातच बदल घडवत तो आपल्याला अनुकूल कसा होईल यावर भर दिला.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रादुर्भावाने शक्य झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे एक अर्थक्रांती होऊन भांडवलशाही उत्पादन व्यवस्था व लोकशाही राज्यव्यवस्था उदयास आली व तिच्यावरील प्रतिक्रिया म्हणून मार्क्सच्या तत्त्वज्ञानावर आधारित साम्यवादी-कम्युनिस्ट क्रांती झाली; तिच्यातून मार्क्सला अभिप्रेत असलेली समाजसत्तावादी राज्यव्यवस्था अस्तित्वात आली.

मार्क्स पारंपरिक लोकशाहीकडे भांडवली अर्थव्यवस्थेचे पिल्लू म्हणूनच पाहतो, हे लक्षात घ्यायला हवे. वेगळ्या प्रकारे सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल, की औद्योगिक क्रांती नावाची जी गोष्ट विज्ञान-तंत्रज्ञानामुळे शक्य झाली तिचीच ही दोन अपत्ये होत. म्हणजेच याबाबतीत मार्क्सचे मत अधिक गांभीर्याने घ्यावे लागते.

मार्क्सला अनुसरत आणलेल्या व्यवस्थेचे अनेक देशांमध्ये दिवाळे वाजले हा मुद्दा वेगळा आहे. त्याच्याकडून जी पद्धतीशास्त्रीय मर्मदृष्टी प्राप्त झाली तिचे महत्त्व त्यामुळे कमी होत नाही.

इतिहासात जेव्हा जेव्हा सामाजिक-राजकीय व्यवस्थेत बदल झालेला दिसतो तेव्हा तेव्हा त्यापूर्वी आर्थिक व्यवस्थेत बदल झाला होता, असेही दिसून येते; आणि मुळात असे आर्थिक परिवर्तन तरी कसे घडते, तर उत्पादनाच्या व्यवस्थेत परिवर्तन घडल्यामुळे आणि अर्थातच हे उत्पादनव्यवस्थेतील परिवर्तन काही आपोआप घडत नसते.

त्यात कोणत्या तरी वैज्ञानिक शोधाचा वाटा असतो. चाकाचा शोध, अग्नीचा शोध, शेती करायचा शोध या गोष्टी आपल्याला आताच्या काळात फुटकळ वाटत असतील; पण त्यांनी त्यांच्या-त्यांच्या काळात क्रांतिकारक परिवर्तने घडवून आणली होती, हे विसरता कामा नये.

अर्थात, शेती करणाऱ्या लोकांना काटेकोर अर्थाने विज्ञान माहीत होते असे समजायचे कारण नाही; पण अजाणतेपणाने, स्पष्टीकरण हाताशी नसताना दोन वस्तूंमधील वा घटनांमधील कार्यकारणसंबंध समजणे हा तर विज्ञानाचा पाया मानावा लागतो.

human
International Tiger Day : वाट चुकलेल्या वाघोबाला शोधून काढणारी RFID Technology म्हणजे नक्की काय?

काही विद्वान इतिहासकाळात याच्याही मागे जाऊन यापूर्वी घडलेल्या क्रांतींचा विचार करू पाहतात. एवढ्या वैविध्यपूर्ण प्राणिसृष्टीत माणूसच का बोलू लागला? या प्रकाराला भाषेचा शोध म्हणायचा का? असे प्रश्न ते उपस्थित करतात. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

भाषेचा उपयोग करता येणे म्हणजे बोलता येणे हा बदल क्रांतिकारक असला, तरी खरे तर तो उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा एक भाग किंवा टप्पा मानता येतो. (ती काही मानवाने जाणूनबुजून वा ठरवून केलेली क्रांती नव्हे.

तिचा संबंध उत्क्रांतिवादातील नैसर्गिक निवड (Natural Selection) तत्त्वाशी आहे, असेही मानले जाते.) भाषेचा उपयोग हा सुरुवातीला बोलता येण्यापुरता मर्यादित होता.

बोलण्याचे रूपांतर लिहिण्यात म्हणजेच चिन्हव्यवस्थेत करणे ही एक क्रांतीच होय आणि तिच्याबाबतीत आपण नैसर्गिक निवडीसारख्या उत्क्रांतीतत्त्वावर अवलंबून राहू शकत नाही.

ना तो अपघात होता, ना ती निसर्गाने ‘तगेल तो जगेल’ या सूत्रानुसार केलेली निवड होती. ती माणसाने जाणीवपूर्वक केलेली, ठरवून केलेली क्रांती होती. बोलण्यातील भाषा जतन करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्मरण. तेही वैयक्तिक पातळीवरील.

स्मरणशक्तीला मर्यादा असल्यामुळे जे बोलले जाते त्याचा पुनरुच्चार करीत ते आठवणीत साठवणे हा पुढचा जाणीवपूर्वक गाठलेला टप्पा. याला पाठांतर, घोक असे काहीही म्हणा. भारतात वेदवाङ्‌मयाचे जतन झाले ते याच पद्धतीने.

संबंधितांनी स्मरणाचे तंत्रच तयार केले. त्याला अष्टविकृती म्हणतात. (घनपाठ, जटापाठ, मालापाठ इत्यादी). लिखाणातही अगोदरच्या काळातील तंत्र अवघड व थोड्यांनाच जमणारे होते.

दगडांवर, झाडांच्या सालींवर, ढपल्यांवर तीक्ष्ण टोकदार उपकरणाने खोदून, कोरून काढणे ही सुरुवात. इंग्रजी भाषेतील to Write हे क्रियापद घ्या.

आपल्या डोळ्यांसमोर लगेचच पेन नावाचे उपकरण येते व या पेनामधील शाईने कागदावर रेषांच्या माध्यमातून एक आकृतिबंध दृश्यमान केला जातो.

पूर्वी जेव्हा पेनच अस्तित्वात नव्हते तेव्हा दौत (Inkpot) नावाच्या पात्रात शाई नामक द्रवपदार्थ ठेवला जायचा. लिहिण्याचे उपकरण (लेखणी टाक, बोरू) त्यात बुडवून अक्षरे लिहिली जायची.

त्या उपकरणाला लगटून आलेली शाई संपली, की त्याला पुन्हा पात्रात बुडवून लिहिण्यासाठी सज्ज केले जायचे. पेनामध्ये बरेच लेखनद्रवण साठवणे शक्य झाल्यामुळे दौतीची वगैरे कटकट संपली. हा झाला ‘Write’ चा अर्थ.

मात्र लिहिण्याची ही क्रिया कागद व शाई नसताना वेगळ्या प्रकारची असणार हे सांगायला नको. म्हणून तर ‘to Write’चा व्युत्पत्तीनुसार मूळ अर्थ पाहिला तर ‘to scratch or carve symbols into a surface’ अशी नोंद मिळेल. शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्र यांच्या सरफेस म्हणजे पृष्ठभागावर चिन्हे (किंवा अक्षरे) अक्षरशः कोरली जायची ते ‘Writing.’

माणसाला कागदावर लिहिता येऊ लागणे ही एक क्रांतीच होती. त्यामुळे ज्ञानप्रसाराला अधिक वाव व गती मिळाली आणि त्यापुढील टप्पा म्हणजे अर्थातच मुद्रणतंत्राचा शोध. पुस्तक छापण्याच्या कलेचा शोध. खरेतर त्याबद्दल अधिक काही सांगायची गरज नाही.

या तंत्रातही आधी शिलाछाप मग मातृका (Type) खिळाछाप असा क्रम आहे. शेवटी त्याचे पर्यवसान संगणकाधारित डीटीपीमध्ये (DTP -Desktop Publishing) झाल्याचे आज आपण पाहतो. ही एक अत्यंत महत्त्वाची क्रांती होय.

(खरेतर ध्वनीच्या उच्चारांवर आधारित भाषेच्या उगमाच्याही मागे जात मुळातच जड द्रव्यात जीव (Life) कसा निर्माण झाला, असा प्रश्न विचारता येईल.

या प्रकाराकडे केवळ एक अपघात किंवा योगायोग म्हणून बघता येईल काय? आणि त्याहीपुढे जाऊन या सजीवात आत्मजाणीव केव्हा आणि कशी निर्माण झाली हेही विचारता येईल; पण ते तूर्तास नको.)

human
AI Jobs: AIच्या जगात नोकरी शोधताय? चक्क देशाच्या अर्थमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला; म्हणाल्या...

मुद्दा वेगळाच आहे. वाणीपासून ते डीटीपीपर्यंतच्या ज्या टप्प्यांचे वर्णन केले त्या सर्वांचा संबंध भाषेशी, चिन्हव्यवस्थेशी पोहोचतो हे वेगळे सांगायला नकोच.

या अगोदर क्रांतिकारक समजल्या जाणाऱ्या ज्या टप्प्यांचा उल्लेख करण्यात आला होता, ते सर्व माणसाला भाषेचा वापर करता यायला लागल्यानंतरचे होते, की त्यातील (निदान वाणी इत्यादी) काही त्यापूर्वीचे, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो.

अग्नीचा काय किंवा चाकाचा काय, वापर ही एकट्या माणसाची कृती नसून ती सामूहिक स्तरावर, विशिष्ट प्रकारची प्राथमिक का होईना समाजरचना अस्तित्वात आल्यावरच शक्य झाली असणार असे म्हणता येते आणि अशा कृतीसाठी सामंजस्य व सहकार्य लागते.

संप्रेषणही (Communication) लागते आणि ते भाषेशिवाय शक्य होत नाही!

आणि सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भाषानिर्मिती हा क्रांतिकारक टप्पा मानला, तर त्यासाठी पहिल्यांदा आदिमानवाच्या शरीरात काही रचनात्मक बदल झाले असतील का?

एक गोष्ट तर अगदीच स्पष्ट आहे. भाषेसाठी म्हणून एखाद्या स्वतंत्र इंद्रियाचा प्रादुर्भाव मानवप्राण्यात झाला नाही. ज्या मुखाने तो बोलतो त्यातील इंद्रिये वानरासह अनेक प्राण्यांमध्येही आढळून येतात.

त्यांचा उपयोग खाण्या-पिण्यासाठी केला जातो; जो मानवही करीत होता. म्हणजेच प्राण्यांच्या शरीरातील मुख नामक इंद्रियाची नैसर्गिक रचना बोलणे (भाषाप्रयोग) या कार्यासाठी झाली नव्हती.

माणूस हा एकमेव प्राणी ठरला, की ज्याने त्याचा -त्याच्या अंतर्गत उपेंद्रियांचा उपयोग विविध ध्वनी निर्माण करून त्यांचा संबंध वेगवेगळ्या वस्तूंशी लावण्यासाठी म्हणजेच भाषा नावाची संकेतव्यवस्था निर्माण करण्यासाठी केला.

या भाषेमुळेच त्याला त्यानंतर उत्क्रांतीमधील क्रांतिकारक टप्पे गाठता आले.

या ठिकाणी आपण एका निर्णायक मुद्द्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. अपवाद वगळता मानवी व्यवहारांसंबंधी शास्त्रीय चर्चा करणाऱ्या सर्वच ज्ञानशाखांनी डार्विनप्रणित उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मान्य केलेला दिसतो.

साहजिकच मानवी व्यवहारांची चर्चा करताना या ना त्या पायरीवर उत्क्रांतिवादाच्या चौकटीत जाऊन बोलावे लागणे क्रमप्राप्त ठरते.

जेव्हा नैसर्गिक निवडीचा मुद्दा येतो तेव्हा निसर्गच सारे काही करतो व प्राणी निष्क्रिय असतात असे नसते. सर्वच प्राण्यांची निसर्गाशी जुळवून घेण्याची धडपड चालू असते. या प्रक्रियेला Adaptation -समायोजन असे म्हणूया.

जी प्राणिजात अशा प्रकारे निसर्गाशी समायोजन करण्यात यशस्वी ठरते ती टिकते. म्हणजेच तिची निवड होते. खरेतर नैसर्गिक निवड हा एक भाषिक संकेत नाही. वस्तुतः निसर्ग काहीच करीत नसतो. ना तो कोणाला निवडतो, ना वगळतो.

तो एक प्रकारचे तटस्थ अधिकरण आहे. त्याने निवडले असे म्हणणे हे त्याचे एका प्रकारचे मानवीकरण होय. ते अलंकारिक बोलणे आहे. स्वयंवर मांडले गेलेली राजकन्या तिच्या पसंतीच्या एखाद्या राजपुत्राच्या गळ्यात वरमाला घालून त्याला निवडल्याचे जाहीर करते तसा हा प्रकार नाही.

अशा राजकन्येला एखादा राजपुत्र चक्क घोड्यावर बसवून तिला पळवून नेतो, तसे काहीसे येथे घडते. निसर्ग पक्षपाती नाही. त्याने उपलब्ध करून दिलेल्या साधनसामग्रीमधील जास्तीत जास्त साधनसामग्री ताब्यात घेऊन जो तिचा उपयोग करून घेतो तो प्राणी म्हणजेच ती प्रजाती टिकते.

यालाच ‘Survival of the Fittest’, बलिष्ठांचे टिकून राहणे, असे म्हणतात. सुरुवातीला मानव अन्य प्राण्यांप्रमाणेच निसर्गाने उपलब्ध करून दिलेली फळे, कंदमुळे खाऊन प्रसंगी प्राण्यांची शिकार करून जिवंत राहत असणार.

यासाठी तोसुद्धा अन्य प्राण्यांप्रमाणेच आपल्या हातापायांसारख्या निसर्गदत्त इंद्रियांवर अवलंबून असणार आणि केवळ याच पद्धतीने जगायचे झाले तर तो केवळ निसर्गदत्त अवयवांच्या साह्याने उर्वरित प्राणिसृष्टीशी स्पर्धा करीत तिच्यावर मात करून तिला मागे टाकील अशी परिस्थिती मुळीच नव्हती.

बल, चापल्य आणि तीक्ष्णपणा यांचा विचार केला तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असे कितीतरी प्राणी सृष्टीत आढळतात. मग दुर्बल म्हणता येईल असा प्राणी ‘सर्व्हायव्हल’च्या लढ्यात ‘फिटेस्ट’ कसा ठरला? थोडे पारिभाषिक व्हायचे तर समायोजन प्रक्रियेत त्याने इतरांना कशाच्या बळावर मागे टाकले?

human
AI : ज्या अर्थाने ‘माणूस विचार करतो’ त्या अर्थाने ‘संगणक विचार करतो’ असे म्हणता येईल का?

या प्रश्नाचे उत्तर शोधताना काहींना त्याच्याकडील जाणीव (Consciousness) या घटकावर भर द्यावा लागतो; परंतु त्याचा अर्थ परिस्थितीची जाणीव आणि स्वतःची जाणीव असा घ्यायचा झाला, तर या दोन्ही जाणिवा इतर प्राण्यांनाही कमी-अधिक प्रमाणात असतात.

अशा प्रकारची स्व-जाणीवच नसेल, आत्मभान नसेल तर स्वसंरक्षणाची प्रेरणाच उत्पन्न होणार नाही आणि हे स्वसंरक्षण निसर्गाच्याच नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर करायचे असल्यामुळे परिस्थितीची जाणीवही तितकीच महत्त्वाची ठरते.

आपण आहोत आणि आपल्याला या प्रकारच्या परिस्थितीच्या संदर्भात अधिष्ठानावर जगायचे-तगायचे आहे, या दुहेरी जाणिवेतूनच प्राण्यांची सर्व धडपड होत असते. ही धडपड म्हणजे समायोजन होय.

आपल्याला किती अंतरापर्यंत उडी मारता येईल हे क्षमतेचे ज्ञान त्याच्या आत्मजाणिवेचा भाग असतो, तर उडी मारून जेथे पाय (कदाचित चारही) टेकवू तेथे दलदल नाही हा परिस्थितीच्या जाणिवेचा भाग असतो. या दोन्ही जाणिवा जेवढ्या यथार्थ तेवढे समायोजन अधिक यशस्वी.

या दोन्ही जाणिवांच्या आधारे आपल्यात व परिस्थितीत कोणाला किती बदल घडवून आणता येतो हा पुढचा मुद्दा.

प्राण्यांची नैसर्गिक क्षमता जन्मतःच ठरलेली असते, तसेच या क्षमतेच्या बळावर तो निसर्गात काय बदल घडवू शकेल, कोणत्या साधनसामग्रीचा किती उपयोग करून घेऊ शकेल याचा विचार केला, तर तो निसर्गाचा उपयोग करताना निसर्ग जसा आहे तसाच त्याचा उपयोग करून घेऊ शकतो.

निसर्गालाच बदलायची व या बदलाद्वारे त्याला आपल्यासाठी अनुकूल करून घेण्याची क्षमता त्याच्याकडे नसते. म्हणजेच त्याच्या समायोजनप्रक्रियेत निसर्गाच्या अनुकूलनाचा भाग नसतो.

थंडी-पावसापासून रक्षण व्हावे म्हणून प्राणी फार तर गुहा किंवा कपार शोधून तिच्यात जाऊन बसेल.

म्हणजेच परिस्थितीची व कार्यकारणभावाची तेवढ्यापुरती जाणीव त्याच्याकडे असेल. पक्षी फार झाले तर निसर्गातूनच उपलब्ध होणाऱ्या पदार्थांचा उपयोग करून घरटे बांधू शकेल; पण पक्ष्यांचे लाखो वर्षांपूर्वीचे घरटे आणि आताचे घरटे यांच्यात काडीमात्रही फरक झाल्याचे दिसत नाही.

कदाचित मानव गुहेत वास्तव्य करीत होता तेव्हाही पक्षी झाडावर घरटे बांधीत असतील. नंतर माणूस गुहेतून बाहेर पडून निसर्गाच्या अनुकूलनाची सीमा वाढवीत-वाढवीत शे-दोनशे मजल्यांची इमारत बांधू लागला.

त्या सर्व काळात पक्ष्याचे घरटे तसेच राहिले आहे. फरक पडलाच असेल तर तो एवढाच, की झाडांची संख्याच घटल्याने किती तरी वेळा त्याला माणसाने बांधलेल्या इमारतीत जागा शोधून तेथे घरटे बांधावे लागते!

याचा अर्थ असो होतो, की निसर्गाशी समायोजन करण्याच्या प्रक्रियेत मानवाने केवळ स्वतःत बदल करीत राहण्यापेक्षा, निसर्गाशी सुसंगत राहील असेच आपले वर्तन ठेवण्यापेक्षा म्हणजेच निसर्गाच्या मर्यादेत राहण्यापेक्षा, निसर्गातच बदल घडवत तो आपल्याला अनुकूल कसा होईल यावर भर दिला.

समायोजन करताना माणसासह सर्वच प्राणी आपल्या बाह्य अवयवांचा उपयोग करताना दिसतात यात शंका नाही. समायोजनाचे असे वेगळे इंद्रिय असते का?

भाषेचे असे वेगळे इंद्रिय नसते; पण उपलब्ध इंद्रियांचा उपयोग करून मानवाने भाषेची निर्मिती केली तसा उपयोग इतरांना करता आला नाही, तसेच समायोजनाचे वेगळे इंद्रिय नसताना माणसाने ज्याचा उपयोग करून ते साध्य केले त्याला ‘इंटेलिजन्स’ (Intelligence) म्हणावे अशी एक साधी सोपी, सरळ सुटसुटीत व्याख्या करायला काय हरकत आहे?

--------------------

human
Artificial Intelligence : बापरे! अपहरणासाठी झाला AI चा दुरुपयोग; आवाजाचे क्लोनींग करून...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com