AI : ज्या अर्थाने ‘माणूस विचार करतो’ त्या अर्थाने ‘संगणक विचार करतो’ असे म्हणता येईल का?

Artificial Intelligence vs Human
Artificial Intelligence vs Human eSakal

डॉ. सदानंद मोरे

कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी नैसर्गिक-स्वाभाविक बुद्धीची बरोबरी करता येईल का, हा प्रश्न वेगळ्या शब्दात उपस्थित करायचा म्हणजे ज्या अर्थाने मानवाला बुद्धिमान म्हटले जाते, त्या अर्थाने संगणकाला बुद्धिमान म्हणता येईल का? ज्या अर्थाने ‘माणूस विचार करतो’ असे म्हटले जाते त्या अर्थाने ‘संगणक विचार करतो’ असे म्हणता येईल का?

माणसाला ‘रॅशनल अॅनिमल’ म्हणताना त्यातील अंतर्भूत ‘रिझन’ (Reason) हा शब्द मूळ ग्रीक भाषेतील ‘लोगोस’ (Logos) शब्दाचा पर्याय असल्याचे आपण पाहिले आहे.

तथापि ज्याप्रमाणे लोगोस शब्दाचा बुद्धी -रिझन असा अर्थ होतो तसाच तो शब्द भाषावाचक असल्याचेही निदर्शनास आणले होते.

इंग्रजीतील रिझन शब्दात मात्र तो अर्थ प्रतीत होत नाही. पण म्हणजे बुद्धी आणि भाषा यांच्यातील अतूट नाते संपुष्टात आले, असे मात्र होत नाही. साहजिकच आपण जेव्हा कृत्रिम बुद्धीकडे येतो तेव्हा तेथेही ती अखेर बुद्धीच असल्यामुळे तिच्या भाषेशी असलेल्या नात्याचा प्रश्न उपस्थित होतोच.

भाषा म्हटले, की लगेचच आपण बोलतो ती भाषा आपल्या पुढे उभी राहाणे स्वाभाविक आहे. ही भाषा शब्दांनी बनलेली असते हे सांगायची गरज नाही. पण शेवटी शब्द हे संकेत किंवा चिन्हे असतात.

या संकेतांच्या माध्यमातून आपण आपल्या सभोवतालच्या विश्वासंबंधीचा व्यवहार करीत असतो. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःबद्दलचाही व्यवहार करीत असतो. विश्वाबद्दलचे ज्ञान एकमेकांकडे पोहोचवीत असतो.

या विश्वाच्या ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग संख्यात्मक किंवा अंकी (Quantitative, Digital) असतो. उदाहरणार्थ दोन ठिकाणांमधील अंतर किती, असा प्रश्न उपस्थित करून आपण त्याचे उत्तर देताना अमुकअमुक मैल, योजने, किलोमीटर अशा अंकवाचक पद्धतीने देतो.

माणसाने किती पाणी पिणे आरोग्यासाठी आवश्यक आहे, याचेही उत्तर इतके इतके लिटर असे येते. हे अंक देखील शब्दांप्रमाणेच चिन्हे किंवा संकेत आहेत. मग असे म्हणणे अधिक उचित होणार नाही का, की मानव हा चिन्हनिर्मिती करणारा प्राणी आहे?

असे म्हटल्यावर मात्र पुढे असेही म्हणणे उचित होईल, की शब्द आणि अंक हे चिन्हांचे दोन प्रकार आहेत.

आता बऱ्याच वेळा आपण अंक शब्दांत (म्हणजे अक्षरी) लिहीत असतो. (जसे १००० हा अंक एक हजार असा) पण त्याचप्रमाणे शब्द अंकाप्रमाणे लिहिता येईल का?

नेहमीच्याच व्यवहारात आपण तसे करीत नाही. पण तरीही शब्दांचा अंकांशी काही एक संबंध प्रस्थापित करून त्याद्वारे शब्दांप्रमाणे व्यवहार करता येणे शक्य होईल.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निदान सुरुवातीच्या टप्प्यात तरी हेच अभिप्रेत होते. मात्र यातून एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. तो म्हणजे शब्दांना असलेल्या अर्थाची हानी होण्याचा.

सुरुवातीला संगणक हा एक प्रकारचा अधिक शक्तिशाली कॅल्क्युलेटर होता, असे म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे मानवी मेंदू करीत असलेले गणन कमी वेळात व अधिक व्यापक करणे शक्य झाले. त्याचा अनेक क्षेत्रात उपयोग करता येऊ लागला. श्रम आणि वेळ यांची बचत ही एक महत्त्वाची सिद्धी मानावी लागते यात शंका नाही.

पण मग एक प्रकारच्या चिन्ह व्यवस्थेला म्हणजे भाषिक अभिव्यक्तीला दुसऱ्या प्रकारच्या चिन्हव्यवस्थेत म्हणजे अंकीय अभिव्यक्तीत रुपांतरीत करता येईल काय, याची चाचपणी सुरू झाली.

तसे करता आले तर त्या प्रक्रियेच्यामार्फत -कदाचित ती रिव्हर्स करून -भाषिक अभिव्यक्ती अंकीय अभिव्यक्तीच्या गतीने करता येईल, हे उघड होते.

पण तसे करता आले, म्हणजे संगणकाला तसे करता आले, तर त्याने मानवाच्या दोन्ही प्रकारच्या चिन्हव्यवस्थांना आत्मसात केले असे म्हणायला काय हरकत? पण यातून असे निष्पन्न होते, की मानवाची भाषा आणि मानवाची बुद्धी यांच्यातील घनिष्ठ संबंध विचारात घेता संगणकाकडे (रोबोकडेही) बुद्धी असते असे का म्हणता येऊ नये?

असे म्हणायला हरकत नसावी पण या बुद्धीला मानवी बुद्धीप्रमाणे नैसर्गिक किंवा स्वाभाविक (Natural) न म्हणता कृत्रिम म्हणावे लागेल. यालाही हरकत नसावी.

फरक सांगताना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या प्रचलित परिभाषेत सांगता येईल. नैसर्गिक म्हणजे मानवी बुद्धीचे कार्य जेथे चालते ते स्थळ (किंवा इंद्रिय) म्हणजे अर्थातच मेंदू.

हाडांनी बनलेल्या कवटीमध्ये मांसपेशी इत्यादींनी बनलेल्या भौतिक इंद्रियाला हार्डवेअर समजून मनाला सॉफ्टवेअर म्हणायचीही एक पद्धत आहे. पण त्याच्या खोलात जायची गरज नाही.

आपण एक गोष्ट निश्चितपणे म्हणू शकतो, की धातूने बनलेल्या संगणकात प्रत्यक्ष संगणकाचे कार्य करणारे साधन सहसा सिलिकॉन या भौतिक द्रव्यापासून निर्माण केले जाते. मानवी शरीराची (मेंदूसह) रचना ही कार्बनप्रधान असते.

आता यापुढच्या मुद्याच्या प्रश्नाला हात घालायचा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी नैसर्गिक-स्वाभाविक बुद्धीची बरोबरी करता येईल का, असा प्रश्न उपस्थित करायचा.

वेगळ्या शब्दात हा प्रश्न उपस्थित करायचा म्हणजे ज्या अर्थाने मानवाला बुद्धिमान (येथे ‘रिझन’ऐवजी ‘इंटेलिजन्स’ शब्द पसंत केला जातो.

त्याची कारणमीमांसा हा एक वेगळा विषय होईल) म्हटले जाते, त्या अर्थाने संगणकाला बुद्धिमान म्हणता येईल का? ज्या अर्थाने ‘माणूस विचार करतो’ असे म्हटले जाते त्या अर्थाने ‘संगणक विचार करतो’ असे म्हणता येईल का?

अशा प्रकारचा प्रश्न पहिल्यांदा ॲलन ट्युरिंग याने उपस्थित केला. त्याचे उत्तर देताना त्यातून जिला ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हटले जाते ती कल्पना निष्पन्न झाली. ट्युरिंगची चर्चा आपण यापूर्वी केलेली आहे.

सारांशाने सांगायचे झाल्यास प्रस्तुत कसोटी किंवा परीक्षा हा एक प्रकाराचा खेळ आहे आणि ही परीक्षा माणसाची नसून संगणकाची आहे. संगणक या परीक्षेला उतरला तर त्याला मानवी अर्थाने बुद्धिमान म्हणता येईल. तो विचार करू शकतो असेही म्हणता येईल.

ट्युरिंग परीक्षेची रचना करताना एका बंद खोलीत विशिष्ट भाषा (येथे अर्थातच इंग्रजी) बोलणारा माणूस आणि संगणक असतात. पडद्यापलीकडील बाहेरील दुसऱ्या खोलीत, आतील खोलीत बसलेला माणूस ज्या भाषेत बोलतो ती समजणारा व आतील माणसाशी त्यानुसार प्रश्नोत्तररूपी संवाद करणारा, दुसरा माणूस बसलेला असतो.

या माणसाने (टाइप करून) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आत बसलेल्या माणसाने व संगणकाने द्यावयाची असतात. या उत्तरांपैकी माणसाने दिलेली उत्तरे कोणती व संगणकाने दिलेली उत्तरे कोणती हे प्रश्न विचारणाऱ्या बाहेरील खोलीमधील माणसाने ओळखायचे असते.

आता यातील गंमत पाहा. बाहेरील माणसाला आत बसलेल्या माणसाने दिलेली उत्तरे आणि संगणकाने दिलेली उत्तरे यांच्यात बरोबर फरक करता आला म्हणजे कोणती उत्तरे संगणकाने दिली आहेत हे त्याला अचूकपणे सांगता आले तर तो संगणक ट्युरिंग परीक्षा नापास झाला.

याउलट बाहेरील माणसाला वस्तुतः संगणकाकडून दिली गेलेली उत्तरे माणसाने दिली आहेत असे वाटले तर त्याचा अर्थ संगणक परीक्षा पास झाला असा घ्यावा लागतो.

थोडक्यात आपण मनुष्यच (बोलत) आहोत, अशी यशस्वी बतावणी करू शकणारा संगणक परीक्षा पास होतो. त्याने बाहेरील माणसाला बरोबर गंडवलेले असते. अशी बतावणी करता आली नाही तर तो नापास!

एआय क्षेत्राच्या मानगुटीवर बसलेले ट्युरिंग टेस्टचे हे भूत अद्याप उतरले नाही. अशा परीक्षेला उतरणाऱ्या संगणकाची निर्मिती अद्याप झाली नाही.

पण खरा प्रश्‍न अजून विचारायचा राहिलाच आहे. खरोखरच एखादा संगणक या परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळवून उत्तीर्ण झाला तर संगणकीय यांत्रिक कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेची बरोबरी केली असे म्हणायचे का?

या प्रश्‍नांचे नकारात्मक उत्तर देणारा महत्त्वाचा भाषा तत्त्वज्ञ म्हणजे जॉन सर्ल (John Searle). या सर्लने या संदर्भात केलेला विचारप्रयोग ‘चायनीज रूम अर्ग्युमेंट’ (Chinese Room Argument) म्हणून प्रसिद्ध आहे.

सर्लच्या प्रयोगातील व्यक्तीला चिनी भाषा बिलकूल येत नसते. त्याला एक बंद खोलीत बसविले जाते. तेथे अर्थातच टाइप करण्यासाठी संगणक असतोच.

या माणसाला चिनी भाषेतील अक्षरे (शब्दांसह) त्यांची आकारीक वैशिष्ट्ये आणि या अक्षरांचा इंग्रजी भाषेतील (म्हणजेच रोमन लिपीतील) अक्षरांचा सहसंबंध स्पष्ट करणारे नियम (अर्थात इंग्रजी भाषेत) एवढी सामग्री पुरवली जाते. या त्याच्या खोलीला `चायनीज रूम’ असे नाव आहे.

आता या खोलीबाहेरील व्यक्ती चिनी भाषेची जाणकार आहे. पण आतील माणसाला -त्या खोलीबाहेरील माणसाला चिनी भाषा येत नाही -हे माहिती नाही.

आता चिनी भाषा अवगत असलेला हा बाहेरील माणूस चिनी रूममधील चिनी भाषा न समजणाऱ्या व इंग्रजी समजणाऱ्या माणसाबरोबर चिनी भाषेतून संभाषण (टायपिंग करीत) करतो. त्याला आतील माणूस समर्थपणे चिनी भाषेत उत्तरे देतो, प्रतिसाद देतो!

कसा?

आतील माणसाला चिनी भाषा येत नसल्यामुळे बाहेरून टाइप करून चिनी भाषेत पाठविलेले संदेश -म्हणजे त्यांचा अर्थ -सुतराम समजत नाही.

तरीसुद्धा तो त्याच्याकडील चिनी भाषेतील चिन्हांचा संबंध इंग्रजी भाषेतील चिन्हांशी, त्याला देण्यात आलेल्या सूचना पुस्तकांतील सूचनांना अनुसरून, लावू शकतो. त्याच्याआधारे बाहेरील माणसाला चिनीतून संदेश पाठवतो.

आपल्याला जो संदेश आला आहे त्याचा अर्थ त्याला समजलेला नसतोच. तसेच त्याने उत्तरादाखल पाठविण्याच्या संदेशाच्या अर्थाविषयीही तो तितकाच अनभिज्ञ असतो. मात्र तरीही त्याने पाठवलेला संदेश अर्थपूर्ण असतो. बाहेरील चिनी जाणणाऱ्या माणसाला तो अर्थ कळतोसुद्धा!

हा काय प्रकार आहे? सर्लच्या बंद चिनी खोलीतील माणूस हा संगणकासारखा आहे. संगणकसुद्धा आपल्याला ज्यांचा अर्थ समजत नाही, अशा वाक्यांचा केवळ आकृतिबंधाच्या म्हणजेच सिन्टॅक्सच्या (Syntax) आधारे संभाषणाचा व्यवहार करू शकतो.

त्यासाठी अर्थ समजायची गरज नाही. दोन माणसे जेव्हा भाषा व्यवहार करतात तेव्हा त्यांना वाक्यांचा आकृतिबंध समजलेला असतोच, पण त्याचबरोबर ज्याला अर्थनिष्पत्तीची प्रक्रिया म्हणतात ते ‘सिमॅन्टिक्स’सुद्धा (Semantics) समजलेले असते.

याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे मन असते, आत्मभान असते. संगणकाकडे म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धारकाकडे तसे काही नसते. त्यामुळे त्याला कोणतेही ‘इंटेन्शन’ अभिप्रेतही नसते. अर्थ निष्पन्न करण्यासाठी मानवी मेंदूत जी कार्यकारण भावात्मक क्षमता असते ती संगणकाकडे नसते. अशी ही विज्ञानातील रिअॅलिस्ट भूमिका आहे.

संगणकातील भाषाव्यवहार हा इनपुट आणि आऊटपूट यांच्यातील ‘प्रोग्रॅम’ नावाच्या वस्तूने होत असतो.

चायनीज रूममध्ये बसलेल्या इंग्रजी माणसाला चिनी भाषा व लिपी समजत नसली तरी त्याला त्या भाषेतील मजकुराला त्याच्यातील शब्दांच्या (अक्षरात्म चिन्हांमधील) परस्पर आकार संबंधांच्या आधारे अर्थपूर्ण प्रतिसाद द्यायची क्षमता, त्याच्याकडील सूचनांच्या म्हणजेच प्रोग्रॅमच्या मार्फत मिळालेली असते.

सर्लच्या माईंड्स ब्रेन्स अॅण्ड प्रोग्रॅम (Minds, Brains and Programme) या गाजलेल्या पेपरमधील भाषा वापरून सांगायचे झाल्यास खोलीत बंद केलेल्या इंग्रजी भाषकासाठी ‘Chinese writing is just so many meaningless squiggles’ पण तरीही दोन भाषांमधील चिन्हांच्या संबंध लावीत अर्थपूर्ण अभिव्यक्ती करणे त्याला शक्य होते कारण ‘he can identity the symbols entirely by their shapes’ या व्यवहारातून झालेली अर्थनिष्पत्ती ही अस्सल नसून ती ‘by manipulating uninterpreted formal symbols’ने शक्य झालेली आहे.

अशा प्रकारे चिनी समजणाऱ्या माझ्यासारख्या इंग्रजी भाषकाने केलेल्या भाषा व्यवहाराच्या बाबतीत काय म्हणावे लागते ते सर्लच्या आधारे सांगायचे म्हणजे ‘In the Chinese case I have everything that A.I. can put into me by way of a programne and I understand nothing; in the English case I understand everything.’

खरे तर ट्युरिंग आणि चिनी बंद खोली या प्रयोगांच्या आधारे आपण तिसऱ्या प्रकारच्या परीक्षेची कल्पना करू शकतो. एका खोलीत एक संगणक असा ठेवायचा, की ज्यात फक्त इंग्रजी भाषा व त्या भाषेत दिला जाणारा प्रोग्रॅम ठेवला आहे.

दुसऱ्या संगणकात फक्त चिनी भाषा व चिनी भाषेतील प्रोग्रॅम आहे. आता चिनी भाषेची चिन्हव्यवस्था व चिनी भाषेतील सूचनांचा प्रोग्रॅम यांनी मुक्त असलेल्या आणि इंग्रजी मुळीच न समजणाऱ्या संगणकाने त्याला समांतर अशा इंग्रजी भाषेची चिन्हव्यवस्था व इंग्रजी भाषेतील प्रोग्रॅम यांनी युक्त असलेल्या व चिनी भाषा सुतराम न समजणाऱ्या संगणकाला पाठवलेल्या संदेशाला इंग्रजी संगणक अर्थपूर्ण प्रतिसंदेश पाठवू शकेल आणि अर्थातच याचप्रमाणे याच्या उलट प्रक्रियाही शक्य आहे.

मात्र, यात अंतभूर्त असलेली अर्थपूर्णता ही अस्सल नसून व्याज व नकली अर्थपूर्णता असेल. हा खेळ a manipulation म्हणजे फिरवाफिरवीचा असेल.

भाषाशास्त्राच्या पद्धतीने आणि सर्लच्याच उद््धरणाने सांगायचे झाल्यास... ‘the formal manipulation by themselves don't have any intentionality; they are quite meaningless, they are not even symbol manipulations, since the symbols do not symbolize anything.

In the linguistic jargon, they have only a syntax but no semantics. Such intentionality as computers appear to have is solely in the minds of those who programme them and those who use them, those who send in the inputs and those who interpret output.’

सुरुवातीचा मुद्दा चिन्हव्यवस्थेचा होता. नेहमीच्या दैनंदिन भाषांतील चिन्हांचा अंकीय चिन्हांशी संबंध प्रस्थापित करीतच संगणकीय व्यवहार चालतो असे आपण म्हटले आहे. अंकांचे महत्त्व काय ही चर्चा प्लेटोपूर्व काळापूर्वीपासून चालू आहे, याची फक्त आठवण करून देतो.

-------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com