भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या, वाढती अर्थव्यवस्था आणि वैविध्यपूर्ण भूगोल असलेल्या देशात हायड्रोजन गाड्या कितपत व्यवहार्य आहेत, भारतात हायड्रोजन गाड्यांसाठी कोणती आव्हाने आणि संधी आहेत आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षा, पर्यावरणीय स्थिरता आणि आर्थिक विकासासाठी हायड्रोजन गाड्यांचे संभाव्य फायदे काय आहेत, याची पडताळणी करणे गरजेचे आहे.
प्रत्येकवेळी पेट्रोल न टाकता गाडी परत देणाऱ्या मित्राला तुम्ही एकदा तरी, ‘गाडी काय पाण्यावर चालते का?’ असे सुनावले असेल. पण खरंच गाडी पाण्यावर धावली तर? स्वप्नवत वाटणारी ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरली आहे. पाण्यावर धावणारी आणि पाणीच उत्सर्जित करणारी हायड्रोजन वाहने सध्या बाजारात दाखल झाली आहेत. सध्या हे तंत्रज्ञान प्रचंड महाग असले, तरी हेच भविष्य असणार आहे. प्रवासाचे सर्वाधिक लोकप्रिय साधन असलेल्या भारतातील हायड्रोजन कारचा प्रवासही असाच काहीसा शाश्वत आहे.
भारतासाठी हायड्रोजन कार नवी नाही, कारण हायड्रोजन फ्युएल सेलच्या आधारे वाहननिर्मितीचे प्रयत्न करणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये भारताचा समावेश होतो. या शतकाच्या सुरुवातीलाच म्हणजेच सन २०००च्या दरम्यान भारतात हायड्रोजन कारसंबंधी प्रयोग सुरू झाले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि महिंद्रातर्फे हायड्रोजनवर चालणाऱ्या तीनचाकी वाहनाची निर्मिती करण्यात आली.
तेव्हापासून भारत हायड्रोजन वाहनाच्या निर्मितीचा प्रवास करत आहे. यात अनेक अडचणी, आव्हाने आहेत आणि संधीदेखील आहेत. १६ मार्च २०२२ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हरित हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणाऱ्या देशातील पहिल्या कारचे अनावरण केले. तेव्हापासून भारतातील हायड्रोजन कार आणि वाहनांच्या निर्मिती क्षेत्राला मोठा बूस्ट मिळाला आहे.