

Immanuel Kant
esakal
डॉ. सदानंद मोरे
अलेक्झांडर पोपने विंडसर वनावर लिहिलेली कविता मला महत्त्वाची वाटते. कांटच्या काही कल्पना तिच्यात प्राथमिक किंवा बाळबोध स्वरूपात अनुस्यूत आहेत. कांटने ती कविता वाचून या कल्पनांवर ‘पॉलिश’ केले किंवा झिलई चढवून त्या ‘Sophisticated’ केल्या असे मला म्हणायचे नाही. मात्र युद्ध संपवून शांतता प्रस्थापित होणे ही एक तऱ्हेची दैवी योजना आहे. त्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन एका सत्ताधिशाकडे/न्यायाधिशाकडे सूत्रे दिली पाहिजेत, असा संदेश पोपच्या कवितांमधून नक्कीच मिळतो.
शाश्वत शांतीच्या वादविश्वात (Discource) इमॅन्युअल कांट या जर्मन तत्त्ववेत्त्याचे स्थान सर्वांत महत्त्वाचे मानले जाते याबाबत शंका घ्यायचे काही कारण नाही. मात्र कांटचा याविषयीचा विचार समजून घ्यायचा असेल, तर प्रथमतः एक बाब लक्षात ठेवली पाहिजे, की त्याचा हा विचार काही सुटा आणि स्वतंत्र नव्हता. तो त्याच्या अत्यंत व्यापक अशा तत्त्वज्ञानातील एक स्वतंत्र व परिपूर्ण व्यवस्थेचा वा दर्शनाचा भाग होता. त्याची ही व्यवस्था केवळ तत्त्वज्ञान विषयातील समस्यांनाच भिडते असे नसून, मानवी जीवनाच्या वैचारिक आणि व्यावहारिक अशा सर्वच अंगोपांगांना स्पर्श करणारी नव्हे, तर कवेत घेणारी आहे.
अर्थात, कोणताही दार्शनिक व्यवस्था स्थापत्यकार (System Builder) आभाळातून पडत नसतो. त्याच्या व्यवस्थेच्या काही विटा त्याने स्वतःच तयार केल्या असल्या, तरी काही त्याला त्या काळातील तात्त्विक समूहाच्या वारशातून प्राप्त झालेल्या असतात. त्यांचा उपयोग तो करून घेत असतो. म्हणजेच त्याच्यावर कोणाचा ना कोणाचा प्रभाव असतोच. निदान काही महत्त्वाच्या प्रभावशाली पूर्वसुरींची वा समकालीनांची दखल घेत-घेतच त्याला पुढे जावे लागते. कांट या प्रकाराला अपवाद असण्याचे कारण नाही.