
अर्थविशेष । भूषण महाजन
अमेरिका मंदीच्या उंबरठ्यावर उभी आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी नसली, तरी स्लो डाउन आहे. भारत विकासदराला चालना देण्याचा प्रयत्न करतोय. मान्सून, महागाई, व्याजदर सारेच घटक प्रसन्न आहेत. पण कच्च्या तेलाच्या किमतींमुळे समीकरण बदलू शकते. आता सरकार काय धोरण आखते ते बघणे उद्बोधक ठरेल.
सोळा तारखेच्या सप्ताहात अमेरिकेच्या तालावर नाचत, जागतिक संकेत पाळत आणि घडामोडींचा मागोवा घेत शेअर बाजार खाली-वर होत होता. एक पथ्य मात्र निफ्टीने कटाक्षाने पाळले, ते म्हणजे २४५०० अंशाच्या खाली जायचे नाही आणि २५२०० अंशाच्या वर जायचे नाही. शुक्रवारी (ता. २० जून) शेअर बाजाराने चांगला बंद दिला आणि आशा पुन्हा पल्लवित झाल्या. तात्पर्य असे की गेला महिनाभर निफ्टी घड्याळाच्या लंबकासारखी एका टप्प्यात फिरत आहे.
१६ मे ते २० जून ह्या दरम्यान निफ्टीने २४०००चा तळ व २५१००चा वरचा बंद दिला आहे. ह्या टप्प्यातून ज्या दिशेला ती बाहेर पडेल तिथे बाजार जाईल. मिड व स्मॉल कॅप निर्देशांकदेखील १० जूनपासून अनुक्रमे ३००० व १००० अंश खाली आले व आपापल्या आधारपातळीवर आहेत. आपली इच्छा जरी तेजीची असली, तरी ती पूर्ण होणार की नाही ते आज सांगता येत नाही.