

Indian Defense Indigenization 2026
esakal
परकीय देशांवर आणि आयात केलेल्या शस्त्रास्त्रांवर विसंबून न राहता, भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांत (लष्कर, हवाईदल आणि नौदल) आता स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे दाखल होत आहेत. २०२५-२०२६ या काळात भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात नवी शस्त्रास्त्रे दाखल झाली आहेत. यामुळे भारताची सामरिक ताकद कैकपटींनी वाढली आहे. येत्या राष्ट्रीय सशस्त्र सेना दिनानिमित्त...
युद्ध आता केवळ सीमेवरील काटेरी कुंपणापुरते मर्यादित न राहता, आजचे युद्ध तंत्रज्ञानाच्या वेगाने आकाशात, सायबर जगात आणि समुद्राच्या अतिखोल तळाशीही घोंगावत आहे. रशिया-युक्रेन, इस्राईल-हमास, इस्राईल-अमेरिका-इराण यांच्यात सध्या सुरू असलेल्या संघर्षाने जगाला एक मोठा धडा दिला आहे, तो म्हणजे केवळ सैनिकांची मोठी संख्या आणि पारंपरिक शस्त्रे आता युद्ध जिंकून देऊ शकत नाहीत. आधुनिक युद्ध जिंकण्यासाठी अचूकता, वेग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि हायटेक तंत्रज्ञानाची नितांत गरज आहे.
भारताची भौगोलिक परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे. एका बाजूला विस्तारवादी धोरण राबवणारा आणि सीमेवर सतत कुरघोड्या करणारा चीन, तर दुसऱ्या बाजूला दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान आहे. अशा ‘टू-फ्रंट वॉर’सारख्या (दोन्ही आघाड्यांवर युद्ध) संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी देशाला केवळ बचावात्मक राहून चालणार नाही, तर शत्रूला त्याच्याच हद्दीत धडकी भरवण्याची ताकद निर्माण करावी लागेल. ही गरज ओळखून गेल्या काही वर्षांत ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमांतर्गत भारताने संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली आहे.
परकीय देशांवर आणि आयात केलेल्या शस्त्रास्त्रांवर विसंबून न राहता, भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांत (लष्कर, हवाईदल आणि नौदल) आता स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे दाखल होत आहेत. २०२५-२०२६ या काळात भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात नवी शस्त्रास्त्रे दाखल झाली आहेत. यामुळे भारताची सामरिक ताकद कैकपटींनी वाढली आहे.